सन २००८ मध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू केलेली आयपीएल स्पर्धा कमालीची यशस्वी झाली. बघता बघता या स्पर्धेचे बारा सत्र संपले असून तेराव्या सत्राला नियोजित वेळेच्या ५ महिने २० दिवस उशीराने सुरुवात होत आहे. आयपीएल आज संपूर्ण क्रिकेट विश्वातील सर्वात यशस्वी टि-२० लिग स्पर्धा गणली जाते. याचे कारण म्हणजे यात मिळणारा अमाप पैसा, जगभरातील अग्रणी खेळाडूंचा सहभाग, स्पर्धेत असलेली चुरस व प्रेक्षकांना बघावयास मिळणारी बॅट व बॉलची तुंबळ लढाई. शिवाय या स्पर्धेत अनेक नवनवीन विक्रमांची होणारी रेलचेल क्रिकेट रसिकांना आपोआप आकर्षित करत आहे. म्हणतात ना विक्रम हे मोडण्यासाठीच असतात, परंतु काही असे विक्रम आहेत की ते कितीही प्रयत्न केले तरी सहजा सहजी तुटत नाही. आजच्या या लेखात आपण मागील बारा सत्रात बनलेल्या काही मोडायला अवघड असलेल्या काही विक्रमांविषयी जाणून घेऊया.
आपल्याला माहिती आहे की, सहा चेंडूच्या एका षटकात जास्तीत जास्त ३६ धावा निघू शकतात. परंतु आयपीएलच्या इतिहासात एक गोलंदाज असा आहे की, त्याने आपल्या एका षटकात ३७ धावा बहाल करून एका षटकात सर्वाधिक धावा देण्याचा नामुष्कीजन्य विक्रम स्वतःच्या नावे ओढवून घेतला. आता तर तो मोडला जाणे ही मुश्कील झाले आहे. त्या सनसनाटी षटकाविषयी थोडक्यात असे की, सन २०११ च्या सत्रात आरसीबीचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने आरसीबी कडून खेळताना कोची टस्कर्सचा गोलंदाज प्रशांत परमेश्वरन याच्या गोलंदाजीवर एका षटकात ३७ धावा कुटल्या. त्यामध्ये गेलने ३ चौकार व ४ षटकार ठोकले तर परमेश्वरनने गेलवर आणखी कृपादृष्टी दाखवत एक चेंडू नो बॉल टाकून अधिकृतरित्या ३७ धावांची रास ओतली.
आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त निर्धाव (डॉट) चेंडू टाकण्याचा विक्रम ऑफस्पिन गोलंदाज हरभजन सिंगच्या नावावर आहे. हरभजन १२ पैकी १० सत्रात मुंबई इंडियन्ससाठी तर शेवटचे दोन सत्र चेन्नई सुपर किंग्जकडून खेळले. या दरम्यान हरभजनने एकूण १६० सामन्यात ५६२.२ षटके म्हणजे ३३७४ चेंडू टाकले त्यातील १२४९ चेंडू निर्धाव (डॉट) टाकत फलंदाजांना जखडून टाकले व १५० फलंदाजांना बाद केले. आयपीएलमध्ये हरभजनचा इकॉनॉमी रेट ७.०५ असा होता.
चेन्नईला तीन विजेतेपद मिळवून देण्यात आपल्या बॅटने करिश्मा करणारा डावखुरा फलंदाज सुरेश रैना आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज असला तरी त्याच्या नावावर एक वेगळाच विक्रम असून तो तुटणे काहीसे अशक्यच वाटते. रैना मागील सर्व १२ आयपीएल सत्र खेळला असून त्यातील १० सीएसकेसाठी तर २ सत्र गुजरात लायन्सचा कर्णधार म्हणून खेळला आहे. रैना फलंदाजी गोलंदाजी बरोबरच अव्वल दर्जाचा क्षेत्ररक्षकही आहे. त्याच्या सुंदर क्षेत्ररक्षणाच्या जोरावर अनेक धावा रोखल्या असून बरेच फलंदाज धावबादही झाले आहेत. इतकेच नाही तर त्याने आयपीएलचे १९३ सामने खेळून १०२ फलंदाजांना झेलबाद केले. हा यष्टीरक्षक सोडून सर्वाधिक झेल घेणाऱ्या निव्वळ क्षेत्ररक्षकाचा आयपीएल विक्रम असून भविष्यात तो मोडण्याच्या जवळपासही कोणी दिसत नाही.
आयपीएलच्या बारापैकी १० सत्रात चेन्नईचा संघ सहभागी झाला असून उर्वरीत दोन सत्रात त्यांच्यावर मॅच फिक्सिंगमुळे बंदी घालण्यात आली होती. तरीही त्यांनी १० पैकी ८ सत्रात अंतिम फेरीत प्रवेश केला असून ३ वेळा अजिंक्यपद मिळविले आहे. विशेष म्हणजेे त्यांनी सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धात त्यांनी किमान प्लेऑफ फेरी गाठली आहे. असा कारनामा करण्यात इतर कुठलाही संघ यशस्वी ठरला नाही.
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद होण्यात हरभजनसिंग संयुक्तरित्या आघाडीवर असून तो १३ वेळा शुन्याचा धनी बनला आहे. हरभजनसह यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलही १३ वेळा शुन्यावर बाद झाला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहीत शर्मा आतापर्यंत १२ वेळा शुन्यावरच बाद झाला असून तो हरभजन व पार्थिवला मागे सारतो का ? हे पाहणे मनोरंजक ठरेल
आयपीएलच्या एका सत्रात सर्वाधिक वैयक्तिक धावा बनविण्याचा रेकॉर्ड आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर असून कोहलीने सन २०१६ च्या सत्रात ९७३ धावा केल्या आहेत. कोहलीचा हा विक्रम लवकर मोडला जाण्याची शक्यता कमीच दिसते.
लेखक : -
डॉ. दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

