आयपीएल -१३ च्या दहाव्या दिवशी दहावा सामना खेळला गेला आणि या दहा दिवसात हा दुसरा सामना होता की, तो निर्धारीत खेळात बरोबरीत संपला व त्याचा निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हर नावाचा एक एक षटकांचा सामना खेळला गेला. गत विजेता मुंबई इंडियन्स व अद्याप एकदाही विजेता न बनलेला रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू यांच्यात सोमवारी रात्री अबुधाबीच्या शेख जायेद स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा धाडसी निर्णय घेतला. धाडसी म्हणण्याचं कारण म्हणजे नाणेफेक जिंकणारा संघ अद्याप एकही सामना या सत्रात जिंकलेला नाही.
मुंबईने मागील सामन्यातील संघात एक बदल केला. तर आरसीबीने दोन बदल करून अनुभवी डेल स्टेन व उमेश यादवला बाहेरचा रस्ता दाखविला.
आरसीबीने धुवाँधार खेळ करून २०१ धावा फलकावर लावल्यावर रोहीत शर्माचा आरसीबीला प्रथम फलंदाजी देण्याचा निर्णय चुकल्याचं वाटत होतं. पण नंतर त्याच रोहीतने त्याचा तो निर्णय खरंच चुकीचा होता हे सिद्ध करून दाखविलं. दुबई, शारजाच्या तुलनेत अबुधाबीचं मैदान मोठं असून येथे फटकेबाजी करण सहज सुलभ नव्हतं. शारजा - दुबईमध्ये हमखास षटकार ठरणाऱ्या चेंडूवर रोहीत येथे बाद झाला व तेथेच मुंबईच्या आव्हानाला छेद जायला सुरुवात झाली. भरवशाचा सुर्यकुमार यादव, क्विंटन डिकॉक, हार्दिक पांड्या स्वस्तात परतल्यानंतर मुंबईचा पराभव पक्का झाला होता. परंतु सौरव तिवारी अनफिट असल्यामुळे संघात स्थान मिळालेल्या इशान किशनने संधीचं सोनं करत झंझावाती ९९ धावा केल्या. त्याला शतक पूर्ण करण्यास कमी पडलेली एक धावच मुंबईला विजयापासून दूर ठेवून गेली. इशानसह अनुभवी पोलार्डनेही अवघ्या २० चेंडूत ६० केल्याने सामना निर्धारीत वेळेत बरोबरीत सुटला.
त्यानंतर बरोबरीत सुटलेल्या सामन्याचा निकाल लावण्यासाठी टायब्रेकरचा आधार घ्यावा लागला. त्यात आरसीबीने बाजी मारून दोन गुण हस्तगत केले व मुंबईला गुणतालिकेतून खाली ढकलले. आरसीबीने मिळविलेल्या विजयाचे शिल्पकार ठरलेल्या खेळाडूंच्या कामगिरीवर एक नजर टाकूया.
मिळालेल्या जीवदानांचा लाभ उठवत ऑस्ट्रेलियन सलामीवीर आरोन फिंचने शानदार खेळी साकारली. ३५ चेंडूच्या त्याच्या डावात त्याने ५२ धावा करताना ७ चौकार व एक षटकार खेचून आरसीबीला मजबूत सुरूवात करून दिली. तसेच पहिल्या गड्यासाठी देवदत्त पडीक्कल सोबत ८१ धावांची भागीदारी रचली.
आपला तिसराच आयपीएल सामना खेळणाऱ्या वीस वर्षीय सलामीवीर देवदत्त पडीक्कलने दुसरं अर्धशतक नोंदविताना चाळीस चेंडूत २ षटकार व पाच चौकार मारत ५४ धावा बनविल्या व फिंचनंतर एबीडी डिव्हीलर्ससही
(६२ धावांची ) अर्धशतकी भागीदारी करून आरसीबीची मजबूत पायाभरणी केली.
३६० डिग्री अंशात स्वतःचं शरीर वळवू शकणाऱ्या एबीडी डिव्हीलर्सने केवळ २४ चेंडूत चार चौकार व चार षटकार मारून ५५ धावांची नाबाद खेळी करत संघाला दोनशे पार नेले.
स्वतःच्या नावाप्रमाणेच सुंदर व किफायतशीर गोलंदाजी करून पॉवर प्ले मध्ये कसलेल्या फलंदाजांना बांधून ठेवत ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदरने चार षटकात केवळ १२ धावा खर्चून एक फलंदाज बाद केला.
नवोदित वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने टाय झालेल्या मुळ सामन्यात चार षटकात ४३ धावा उधळल्या. मात्र सुपर ओव्हरमध्ये त्याने केवळ सात धावा देऊन पोलार्डचा बळी ही मिळवत बलाढय मुंबईला वेसन घातली व आससीबीला सामना जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावली.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com


