आठ दिवसात आंदोलनाची दिशा ठरविणार...!
हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.१४,मराठा समाजाला शिक्षण व शासकीय सेवांमध्ये त्वरीत संरक्षण देण्यात यावे, अन्यथा आठवडाभरानंतर समाजाच्या वतीने पुढील आंदोलनाची दिशा ठरविणयत येईल. कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर समाजाला भविष्यात आंदोलन करण्याची गरज पडू नये, याची खबरदारी शासनाने घ्यावी, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने सोमवारी दिला.
मराठा आरक्षणाला न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे मराठा समाजातून रोष व्यक्त होत आहे. त्या अनुषंगाने मराठा समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीच्या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करून स्थगिती उठविण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, राज्याला असलेल्या घटनात्मक अधिकारांचा वापर करून मराठा समाजाला शिक्षण आणि शासकीय सेवामध्ये लागू असलेले एसईबीसी आरक्षण अखंडित ठेवण्यासाठी त्वरित आदेश काढण्यात यावा, मराठा आरक्षण स्थगितीबाबत निर्णय होत नाही तो पर्यंत मराठा समाजाच्या वाट्याला येणार्या शासकीय नोकर भरती मधील सर्व जागा रिक्त ठेवण्यात याव्यात किंवा सर्व प्रकारच्या नोकरभरती स्थगित करण्यात याव्यात या सर्व मागण्यांचा आठवडाभरात विचार करण्यात यावा, अन्यथा आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल. कोरोना साथरोगाच्या पार्श्वभुमीवर समाजाला भविष्यात आंदोलन करण्याची गरज पडू नये याची खबरदारी शासनाने घ्यावी, असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी,स्वयंसेवक, समन्वयक उपस्थित होते.

