सावळीविहीर(प्रतिनिधी) :
शिर्डी व परिसरात आज अनंत चतुर्थीला श्री गणेशाचे कोरोनामुळे साधेपणाने परंतु मोठ्या उत्साहात विसर्जन करून यावर्षीच्या गणेशउत्सवाची सांगता झाली.
शिर्डी शहरांमध्ये व शिर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत सुमारे अकरा ते बारा गावात यावर्षी एक गाव एक गणपती ची स्थापना करण्यात आली होती. शिर्डी शहरात श्री मारुती मंदिरा मध्ये एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली होती.
आज या श्रीं च्या गणेशाचे विधीवत विसर्जन करण्यात आले.तसेच घरोघर श्री गणेशाची स्थापना करण्यात आली होती.त्यानंतर आज अनंत चतुर्थीला अनेक गणेश भक्तांनी श्री गणेशाचे विसर्जन विधिवत घरी पूजा ,अर्चना, आरती करून व कृत्रिम रित्या विसर्जन केले. आपल्या घरात प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या श्रींच्या मूर्तीला आपल्या परिसरात तैनात असलेल्या शिर्डी नगरपंचायत कर्मचारी यांच्याकडे विसर्जनासाठी श्रीगणेशाची मूर्ती सुपूर्त करण्यात येत होत्या. कोरोनामुळे यावर्षी शिर्डी नगरपंचायत व पोलीस प्रशासन यांनी तसे आवाहन केले होते.
विसर्जनासाठी गर्दी होऊ नये म्हणून शिर्डी नगरपंचायतीनेही वेगवेगळ्या ठिकाणी दत्तनगर, गणेशवाडी, कालिकानगर ,श्रीराम नगर ,नगरपंचायत कार्यालय जवळ वाहनांसह, ट्रॅक्टर व कर्मचारी यांना तैनात ठेवून घरगुती गणेश मूर्तीं कृत्रिम रित्या येथे गणेशभक्त देवुन विसर्जन करीत होते.दिवसभर ,रात्री उशिरापर्यंत श्री चे कृत्रिम विसर्जन सुरू असल्याचे दिसून येत होते.या सर्व गणेश मूर्त्यांची नंतर विधिवत पूजाअर्चा करून एकत्रितपणे विधीवत पुजा करुन विसर्जन करण्यात आले.अनेक ठिकाणी स्वतःच्या विहिरीवर व पाटावर ही विसर्जन करताना गणेशभक्त दिसून येत होते.
मात्र कोरोनामुळे सर्वच श्री गणेशाचे विसर्जन कुठेही मिरवणूक न काढता शांततेने व साध्या पद्धतीने करण्यात येऊन उत्साहात या वर्षीच्या गणेशोत्सवाची शिर्डी व परिसरात सांगता आज मंगळवारी झाली.येथे गणेश उत्सवा दरम्यान पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.कुठेही अनुचित प्रकार न घडता कायदा-सुव्यवस्था शांततेत राहून साधेपणाने हा या वर्षीचा गणेश उत्सव साजरा झाला व श्रींचे विसर्जन शांततेत पार पडले.

