shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

धनंजय मुंडेंची कार्यअहवाल सादर करण्याची परंपरा अखंडपणे सुरूच..!!


  • कोरोनावर मात केल्यानंतर जून ते ऑगस्ट या दरम्यानच्या कामकाजाचा लेखाजोखा खा. शरदचंद्र पवार व राज्यातील जनतेसमोर मांडला..!! 

केज  तालुका प्रतिनिधी (प्रकाश मुंडे):- राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दरमहिन्याला सामाजिक न्याय विभाग, पालकमंत्री म्हणून बीड जिल्हा स्तरावर व परळी या त्यांच्या मतदारसंघात केलेले महत्वपूर्ण कामकाज, घेतलेले निर्णय व कोरोना विषय उपयोजना आदींचा लेखाजोखा अहवाल स्वरूपात मांडण्याची सुरू केलेली परंपरा अखंडित ठेवली आहे. 


धनंजय मुंडेंचे पवार साहेबांकडून कौतुक..!
मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यापासून अविरतपणे कार्य अहवाल सादर करून त्याद्वारे पक्षाला, राज्य सरकारला तसेच राज्यातील तमाम जनतेला जाहीरपणे आपली कामे अहवाल स्वरूपात सादर करण्याची अभिनव परंपरा जपल्याबद्दल ना. मुंडे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरदचंद्र पवार यांनी विशेष कौतुक केले आहे; तसेच पुढेही ही परंपरा अबाधित ठेवावी असेही श्री. पवार म्हणाले.


यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरदचंद्र पवार यांच्याकडे धनंजय मुंडे यांनी कोरोनावर मात केल्यानंतर जून ते ऑगस्ट २०२० या काळात केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा अहवाल स्वरूपात सादर केला आहे. हा कार्य अहवाल राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री तथा रा. कॉ. चे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील, अन्य पक्षश्रेष्ठी यांनाही सादर केला जाणार असून, त्यांच्या कार्यालयाच्या वतीने राज्यातील जनतेसाठी प्रसिद्धीस देण्यात आला आहे.

परळी, बीड व मुंबई असा सातत्याने प्रवास, अनेक लोकांशी थेट संपर्क यादरम्यान जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंडेना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळी लॉकडाऊनच्या काळात केलेल्या कामकाजाचा त्यांनी रुग्णालयाच्या कोरोना वॉर्डातून अहवाल सादर केला होता. कोरोनावर मात करून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे परत कामाला लागले.

लॉकडाऊनच्या कठीण काळात वंचित - निराधार, दिव्यांग आदींच्या मदतीला सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून भरीव मदत करता आली, प्रत्येक जिल्ह्यात उभारलेल्या कोरोना मदत कक्षाद्वारे हजारो दिव्यांग बांधवांना मदत करता आली, बीड जिल्ह्यातील पीक विम्याचा गंभीर प्रश्न सोडवून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विक्रमी पीकविमा प्रस्ताव भरले, जिल्ह्यातील शासकीय कापूस खरेदीने मागील दहा वर्षातला उच्चांक गाठला; याबाबत मुंडेंनी अहवालाच्या सुरुवातीला व्यक्त केलेल्या मनोगताद्वारे समाधान व्यक्त केले आहे. तर शेतकरी कर्जमाफी व त्याला अनुसरून सुरू असलेले पिककर्जाचे वाटप, त्यावर असलेले बारीक लक्ष तसेच बँकांची उदासीनता यावर चिंताही व्यक्त केली आहे.

दरम्यान ना. धनंजय मुंडे यांनी सादर केलेल्या जून ते ऑगस्ट २०२० च्या ४९ पानी अहवालामध्ये ना. मुंडे यांनी विभागामार्फत नुकतेच घोषित केलेले नवउद्योजकांसाठीचे १०० कोटींचे पॅकेज, स्वाधार योजनेतील आर्थिक तरतूद, बीएएनआरएफ अधिछात्रवृत्ती, यासह विभागातील महत्वाचे निर्णय, बैठका आदींची सविस्तर माहिती दिली आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील कोविडची सद्यस्थिती, नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या जम्बो कोविड हॉस्पिटलची माहिती, यासह पीकविमा, कापूस खरेदी आदी सर्वच बाबींवर प्रकाश टाकला आहे.

परळी या त्यांच्या मतदारसंघात परळी शहर बायपाससह महत्वाच्या तीन रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळाली असून त्यासाठी ३३० कोटी रुपये निधी उपलब्ध करण्यात आला आहे, त्यांची निविदा प्रक्रिया आदी बाबीही या अहवालात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसात या रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात व्हावी, परळी एमआयडीसीच्या कामाला वेग यावा या बाबींचा उल्लेख ना. धनंजय मुंडे यांनी खा. शरदचंद्र पवार यांच्याशी अहवाल सादर करतेवेळी केला.
   

close