shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मी ‘कॅट’मध्ये जाणार नाही – संदीप बिष्णोई


पिंपरी :-  एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच बदली झाल्याने पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (कॅट) मध्ये धाव घेतल्याची चर्चा होती. बिष्णोई यांनी तयार केलेला तक्रारीचा मसुदा देखील माध्यमांच्या हाती लागला होता. त्यामुळे बिष्णोई कॅट मध्ये जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र, या चर्चेवर पाणी टाकत आपण कॅटमध्ये जाणार नसल्याचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी स्पष्ट केले.

नियमानुसार किमान एक वर्ष आणि जास्तीत जास्त तीन वर्ष एखादा अधिकारी संबधित पदावर राहू शकतो. त्यानंतर त्याची बदली करता येते. या नियमाला छेद देऊन बिष्णोई यांची बदली केल्याचा ठपका ठेवत बिष्णोई यांनी कॅटमध्ये धाव घेतली असल्याचे म्हटले जात होते. मात्र, बिष्णोई यांनी आपण कॅटमध्ये जाणार नाही, असे सांगत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरांमधील वाढती गुन्हेगारी, राजकीय घडामोडी, पिंपरी-चिंचवड शहरातील औद्योगिक वसाहत याचा पुणे शहर पोलीस आयुक्तालयावर ताण येत होता. त्यामुळे पुणे शहर आयुक्तालयातील आणि पुणे ग्रामीण मधील काही पोलीस स्टेशन मिळून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली. 28 मे 2018 रोजी याबाबतचे आदेश देण्यात आले होते.

पहिले आयुक्त म्हणून आर के पद्मनाभन यांची नियुक्ती झाली. त्यांनी पहिल्या वर्षभरात आयुक्तालयाची घडी बसवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची बदली करून त्यांच्या जागी संदीप बिष्णोई यांची 11 जुलै 2019 रोजी नियुक्ती करण्यात आली.

पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्त पदावर अपर पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी बसतील, असे आयुक्तालयाच्या निर्मितीच्या आदेशात म्हटले होते. सुरुवातीला आलेले दोन्ही आयुक्त (आर के पद्मनाभन, संदीप बिष्णोई) अपर पोलीस महासंचालक दर्जाचे होते. मात्र, नुकत्याच झालेल्या राज्यातील बदल्यांमध्ये पिंपरी-चिंचवडचेही आयुक्त बदलले आहेत.

यामध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाचे असलेले भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी कृष्ण प्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कृष्ण प्रकाश यांनी शनिवारी (दि. 5) पोलीस आयुक्त पदाचा पदभार संदीप बिष्णोई यांच्याकडून स्वीकारला आहे.
close