गडचिरोली ता.७ :- गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन व्ही. कल्याणकर यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने विद्यापीठ प्रशासनातर्फे सोमवारी विद्यापीठाच्या सभागृहात त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. मात्र हा पाच वर्षाचा काळ अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अतिशय वाईट गेला असा आरोप करीत दोन्ही संघटनांनी निरोप समारंभावर बहिष्कार टाकत अनुपस्थिती दाखवली.
सोमवारी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कल्याणकर यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात नवनियुक्त प्रभारी कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांचे स्वागतही आयोजिलेले होते. हा समारंभ विद्यापीठाच्या प्रशासकीय यंत्रणेचा भाग असल्याने विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी त्यात उपस्थित राहणे अगत्याचे होते. परंतु विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी संघटनेने एक पत्र जारी करून सर्व कर्मचाऱ्यांना कुलगुरूंच्या निरोप समारंभावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. निरोप समारंभपूर्वी संघटनेने आपल्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित केली. त्यात बहिष्कार टाकण्यामागची भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली. त्या भूमिकेचे सर्वांनी समर्थन करीत निरोप समारंभावर बहिष्कार टाकला. त्यामुळे विद्यापीठातील पदव्युत्तर विभागाचे प्रमुख , काही प्राध्यापक, मोजके सिनेट सदस्य व आदिष्ट यांच्या उपस्थितीत मावळते कुलगुरू डॉ. कल्याणकर यांचा निरोप समारंभ आणि नव्या कुलगुरूंचा स्वागत समारंभ पार पाडला. या समारंभानंतर विद्यापीठ अधिकारी व कर्मचारी संघटनेने स्वतंत्रपणे नवे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांचे स्वागत केले.
डॉ. नामदेव कल्याणकर यांची कुलगुरू पदाची पाच वर्षांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त राहिली. प्राध्यापक व अन्य कर्मचाऱ्यांची पदभरती जमीन खरेदी तसेच इतर बाबतीतही त्याच्यावर सिनेटच्या सभेतच आरोप झाले. विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी ही त्यांचे संबंध सौहादपूर्ण राहिले नाही. याचाच परिपाक म्हणून डॉ. कल्याणकर यांना आपल्या निरोप समारंभात अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती पहाव्या लागली. अशी चर्चा होऊ लागली आहे.

