बीड / प्रतिनिधी ( प्रकाश मुंडे) : - दर तीन वर्षांनी धोंड्याच्या महिन्यात पुरुषोत्तमपुरी येथे मोठी यात्रा भरते . भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी देशभरातून हजारो भाविक या ठिकाणी येतात . परंतु यावर्षी दि .१८ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर दरम्यान धोंड्याचा महिना असताना ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय मंदिर संस्थान व गावकऱ्यांनी घेतल्याची माहिती सरपंच अशोक धिरडे यांनी दिली . याबाबत विभागीय आयुक्त व पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे .
" यावर्षीचा अधिकमास हा दि .१८ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या दरम्यान आहे . या काळात भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता होती . परंतु कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीचे अध्यक्ष उत्तमराव गोळेकर , विजय गोळेकर , बाबासाहेब गोळेकर , श्रीहरी मोरे , रामप्रसाद गोळेकर भाऊसाहेब गोळेकर , श्रीपाद गोळेकर , सुधाकर धिरडे , जिंबक धिरडे , दत्तात्रय शिंदे , शिवाजी गोळेकर , महादेव थोरात यांच्यासह सरपंच अशोक धिरडे यांनी गावकऱ्यांशी चर्चा करुन यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला . याबबातचे निवेदन विभागीय आयुक्त औरंगाबाद , जिल्हाधिकारी , पोलिस अधीक्षक , उप विभागीय अधिकारी माजलगांव यांना देण्यात आले आहे . या काळात भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येणार नसून बाहेरगावाहून कोणत्याही भाविकांनी या ठिकाणी येऊ नये असे आवाहन ग्रामपंचायत व मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे .
माजलगांव तालुक्यात पुरुषोत्तमपुरी येथे गोदावरी नदीकाठी इ.शके १२१८ शतकातील हेमाडपंती बांधकाम असलेले भगवान विष्णूचा अवतार पुरुषोत्तमाचे देशातील एकमेव मंदिर आहे . या ठिकाणी दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात ( धोड्यांचा महिना ) पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भावीक येतात .
शके १२१८ मध्ये राजा रामदेवराय यादवयांच्या यादव काळातील घडामोडीचे हे मुख्य केंद्र होते म्हणून याला धार्मिक सह ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे . याच काळात राजारामदेवराय यांनी विष्णूचा अवतार लक्ष्मी पुरुषोत्तमाचे हेमाडपंती मंदिर बांधलेले असून बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या विटा पाण्यावर तरंगतात . मंदिर पूर्वाभिमुख असून आतील गाभाऱ्यात काळ्या पाषाणात लक्ष्मी पुरुषोत्तमाची उभी मूर्ती हाती शंख चक्र गदा पद्म धारण केलेली तीन फूट उंचीची आहे . पुरातन काळात या परिसरात दंडकारण्य होते .
सादोळा या गावी शार्दुळ नावाचा राक्षस रयतेला त्रास देत असे भगवान विष्णूने पुरुषोत्तमाचा अवतार धारण करून आपल्या हातातील चक्राने राक्षसाचा वध केला व ते चक्र गोदावरी नदीत धुवून काठल्याने या तीर्थाला चक्रतीर्थ असे म्हणतात अशी आख्यायिका या स्थळाबाबत सांगितली जाते .
दर तीन वर्षांनी या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते . या वर्षी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मंदिर संस्थान व गावकऱ्यांनी बैठक घेऊन ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे . या स्थळाला मोठे धार्मिक महत्त्व असतानाही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अद्याप विकासकामे झालेली नाहीत . पुरुषोत्तमपुरी येथे जाण्यासाठी मुख्य रस्त्यापासून बारा किलोमीटर आत जावे लागते . हा रस्ता एकेरी असल्याने महिनाभर वाहतुकीची कोंडी होते . तसेच रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास होतो . या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी वर्षानुवर्षांपासून होत असली तरी प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे . यावर्षी तर यात्राच होणार नाही . परंतु प्रशासनाने किमान रस्ता दुरुस्त करावा तसेच गावातील मंदिर परिसराचा विकाससाठी सादर केलेल्या आराखड्यानुसार कामे करावीत अशी मागणीही सरपंच अशोक धिरडे यांनी केली आहे .

