जुन्नर। प्रतिनिधी
आज जुन्नर तालुका हे पर्यटनाचं एक प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. याला जसा जुन्नर तालुक्याला लाभलेला पौराणिक, ऐतिहासिक वारसा व अवर्णनीय असा निसर्गरम्य भूप्रदेश कारण आहे. तसेच स्वातंत्र्योत्तर काळात व महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर जुन्नरच्या तत्कालीन पुढारी मंडळींनी वेळोवेळी घेतलेले राजकीय व समाजहीत जोपासणारे विकासाचे निर्णय, दाखवलेला समंजसपणा, जुन्नर तालुक्याचा झालेला सर्वांगीण विकास हे सुद्धा महत्वाचे कारण आहे. अणे माळशेज - कल्याण हा राज्य महामार्ग उपलब्ध झाला व मुंबईची बाजारपेठ अतिशय जवळ आल्यानंतर या तालुक्याने घेतलेली विकासाची झेप अवाक् करणारी आहे. माळशेज घाट म्हटले की एका नावाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल तो म्हणजे जुन्नरचे तत्कालीन 'अपक्ष आमदार श्री. विठ्ठलराव नारायणराव आवटे' उर्फ वि.ना. आवटे. राजुरी गावचे मुंबईच्या क्राॅफर्ड मार्केट्मधील दिग्गज आणि सुप्रसिद्ध फळ व्यापारी कै. नारायणराव आवटे यांचे सुपुत्र.
त्यावेळी 'आवटे आणि कंपनी' व 'ढोबळे आणि कंपनी' या जुन्नर तालुक्यातील मुंबई क्राॅफर्ड मार्केट व मस्जिद बंदर परिसरातील दोन प्रथितयश व्यवसायिक शक्ती होत्या. मुळचेच गर्भश्रीमंत असलेल्या आवटे कुटुंबातील श्री. विठ्ठलराव आवटे यांचे एल्. एल्. बी. पर्यंत शिक्षण झाले होते. पदवी असूनही व्यावसायाचा प्रचंड व्याप असल्याने वडिलांच्या आग्रहास्तव वकीली न करता ते व्यवसायच सांभाळत होते. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. यशवंतरावजी चव्हाण यांनी १९६० साली मुंबईसह 'स्वतंत्र महाराष्ट्र राज्य मंगल कलश' मुंबईत आणला आणि चहूकडे विकासाचे वारे वाहू लागले. मार्केटपासून जवळच मंत्रालय असल्याने या सर्व मंडळीची नेहमीच एकत्र उठबस असायची. अशातच स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरची पहिली विधानसभा निवडणूक - १९६२ जाहीर झाली. सहाजिकच जुन्नर तालुक्याच्या राजकारण व निवडणुकीवर मार्केटच्या या व्यवसायिकांचा फार प्रभाव असायचा. जुन्नर विधानसभेची ही निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड गाजली.
जुन्नरचे तत्कालीन प्रस्थापित आमदार स्व. शिवाजीरावदादा काळे हे सर्व शक्तिमान नेते होते. जनसामान्यांशी जोडलेला नेता म्हणून त्यांची ख्याती होती, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. परंतु निवडणुकीच्या तोंडावर 'दार्याघाट की माळशेज घाट?' हा मुद्दा ऐरणीवर आला आणि स्थानिक नेते व जनता यांची दोन वेगवेगळ्या मतप्रवाहात विभागणी झाली. जुन्नरच्या पूर्व पट्ट्यातील स्थानिक युवानेते श्री. रामचंद्र पा. आवटे, श्री. दशरथशेठ काकडे, श्री. हरीभाऊशेठ गुंजाळ, श्री. श्रीकृष्णशेठ तांबे (झांबरशेठ) या तरूण तडफदार मंडळींनी 'माळशेज घाट झालाच पाहिजे' ही मागणी घेऊन मोर्चेबांधणी सुरू केली. आपली ही मागणी शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्यासाठी मंत्रालयात उठबस असलेला एक उच्च विद्या विभूषित तरूण श्री. विठ्ठलराव आवटे यांना अपक्ष उमेदवार म्हणून तयार केले. जनसामान्यांच्या मनामनांत काॅग्रेस आणि फक्त काॅग्रेस विराजमान असताना अपक्ष निवडणूक लढणे हा बालिशपणा होता.
प्रत्यक्ष मतदानापर्यंत माळशेजची मागणी आणि तिचे तुमच्या-आमच्या जीवनावर होणारे दैनंदिन सकारात्मक परिणाम यांची अतिशय प्रभावीपणे मांडणी केली गेली. उच्चशिक्षीत असूनही विठ्ठलराव आवटे यांचे साधे, सरळ, विनम्र व्यक्तिमत्व जनतेला फारच भावले. जुन्नरचे मातब्बर नेते आमदार श्री. शिवाजीरावदादा काळे व माळशेज मागणीचे प्रखर पुरस्कर्ते अपक्ष श्री. वि. ना. आवटे असे स्वरूप या लढतीला प्राप्त झाले. यामुळे सर्व कार्यकर्ते व नेते यांचे मनोधैर्य वाढले आणि परिणामी 'झोपडी' हे निवडणूक चिन्ह असलेले श्री. वि. ना. आवटे महाराष्ट्र विधानसभेत जुन्नरचे विजयी अपक्ष आमदार म्हणून सन्मानाने विराजमान झाले. एका अर्थाने हा जनतेने अणे - माळशेजच्या बाजूने दिलेला कौल आहे हे आनंदाने स्विकारत श्री. शिवाजीरावदादा काळे यांनीही श्री. वि. ना. आवटे यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाणसाहेबांना अपक्ष म्हणून निवडणूक जिंकलेल्या वि. ना. आवटेंबद्दल कौतुक आणि आपुलकी वाटे, शिवाय विशेष मर्जीही होती. जुन्नर तालुक्यासाठी माळशेज घाटाबरोबरच वीज, रस्ते, पाणी याही समस्या महत्वाच्या होत्या. कुशाग्र बुद्धीच्या आमदार श्री. वि. ना. आवटे यांनी 'माळशेज घाट' हा प्रश्न प्राथमिकतेने मांडला. कारण घाट झाला तर इतर सोयी - सुविधाही होतील हे ते जाणून होते, स्व. यशवंतरावजी चव्हाणांकडून त्यांना फार मोठी आशा होती. परंतु भारत - चीन युद्ध झाले आणि सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेला, यशवंतरावजी भारताचे संरक्षण मंत्री झाले. राज्यात श्री. वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले. जुन्नरचे आमदार श्री. वि. ना. आवटे यांना निराशा येणे स्वाभाविक होते. संरक्षण मंत्री झाले तरी यशवंतरावांची राज्याच्या राजकारणावर पकड व वरचष्मा होताच.
श्री. काकासाहेब वाघ व श्री. बळीराम हिरे हे नाशिकच्या राजकारणातील दोन वजनदार नेते होते. काकासाहेब वाघ हे आमदार श्री. वि. ना. आवटे यांचे सख्खे साडू होते. एकदा नाशिकच्या दौ-यावर असताना संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण काकासाहेबांच्या घरी जेवणासाठी थांबणार होते. काकासाहेबांनी आमदार श्री. वि. ना. आवटे यानांही जेवणासाठी निमंत्रित केले होते. जेवण आटोपल्यानंतर यशवंतरावजी चव्हाण काकासाहेबांना म्हणाले. 'तुमचे हे पाहुणे विधानसभेत अपक्ष बसतात, मला काही ते फारसं योग्य वाटत नाही. त्यांना काँग्रेसमध्ये सामील करून घ्या. ' काकासाहेबांनी वि. ना. आवटेंकडे उत्सुकतेने पाहिले. आता मात्र आमदार वि. ना. आवटे यांनी नेमकी वेळ साधली आणि यशवंतरावांकडे बघत म्हणाले, 'माळशेज घाट होईल या विश्वासाने जुन्नरच्या जनतेने मला निवडून दिले आहे. आपण मनावर घेतले तर माळशेज घाट नक्की होईल. मी आता या क्षणी काँग्रेसमध्ये प्रवेश करायला तयार आहे.' संरक्षण मंत्री हसले व म्हणाले, 'माळशेज चा प्रश्न मार्गी लावण्याचा मी नक्की प्रयत्न करीन.' काकासाहेबांनी कपाटातून एक शाल काढली, यशवंतरावांनी ती शाल आमदार श्री. वि. ना. आवटे यांचे अंगावर टाकून त्यांचा काँग्रेस पक्ष प्रवेश व माळशेज घाट यांना तत्वत: मंजुरी दिली.
मुंबईतील कुलाबा मतदारसंघाचे खासदार श्री. भाऊसाहेब राऊत हे एक मोठे नेते होते. मूळचे मुरबाडचे असलेले खासदार श्री. भाऊसाहेब राऊत यांची संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांचेबरोबर विशेष जवळीक होती. या खासदार महोदयांचा जुन्नरकरांच्या 'माळशेज घाट झाला पाहिजे' या मागणीला पाठिंबा होता. यामुळे आडबाजूचे मुरबाड प्रकाशात येऊन तेथेही विकास साधला जाणार होता. त्यामुळे जुन्नर आणि मुरबाडची नेते मंडळी एकत्रितपणे मंत्रालयात अणे - माळशेजसाठी भेटीगाठी, बैठका, शिष्टमंडळे असे चित्र दिसू लागले. तेव्हाचे बांधकाम मंत्री मा. शंकरराव चव्हाण यांना अणे - माळशेजचे महत्व पटले व ते अनुकूल झाले. मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक यांनीही अणे - माळशेजला तात्काळ मंजुरी दिली आणि प्रत्यक्ष कामालाही सुरूवात झाली. अणे - माळशेजमुळे जुन्नरकरांसाठी विकासाची कवाडे खुली होणार होती. आमदार श्री. वि. ना. आवटे यांचा काँग्रेस पक्ष प्रवेश यशस्वी झाला होता. मुंबई आता अतिशय जवळ येणार होती. आमदार श्री. वि. ना. आवटे यांच्यावर जुन्नरच्या जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ ठरला होता. अनेक वेळा मोर्चे, धरणे अंदोलने, रास्ता रोको करणारे वर उल्लेख केलेले तरूण तडफदार श्री. रामचंद्र पा. आवटे, श्री. हरीभाऊशेठ गुंजाळ, श्री. दशरथशेठ काकडे, श्री. श्रीकृष्णशेठ तांबे, आणि ज्येष्ठ नेते श्री. शिवाजीरावदादा काळे, श्री. निवृत्तीशेठ शेरकर व आमदार श्री. वि. ना. आवटे आणि त्यांना निवडून आणणारे असंख्य कार्यकर्ते हे सर्वच अणे - माळशेजचे शिल्पकार ठरले होते. याच दरम्यान जुन्नर तालुक्यातील अनेक गावे वीजेच्या लख्ख प्रकाशात उजळून निघायला सुरूवात झाली होती. पुढे यथावकाश २ मे १९७४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक यांचे शुभहस्ते उद्घाटन करून अधिकृतपणे अणे - माळशेज - कल्याण हा राज्य महामार्ग जनतेसाठी खुला झाला.
आज 'पहिला पर्यटन तालुका जुन्नर' आणि 'माळशेज घाट' यांची ओळख जगभर झाली आहे. परंतु राजकारणाच्या या सर्व व्यापतापात आमदार श्री. वि. ना. आवटे यांची व्यवसायात मात्र पिछेहाट झाली. मुंबई मधील 'आवटे आणि कंपनी' हा व्यवसाय व आवटे बिल्डींग विकावी लागली, सरळमार्गी स्वभाव, अतिविश्वास अंगलट आला. त्यामुळे ते निराशही झाले. १९६७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी फारसे प्रयत्नही केले नाहीत. परंतु सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात मात्र ते कार्यरत राहिले. राजुरी गावात स्वत: संस्थापक असलेल्या शैक्षणिक संस्थेत सात - आठ वर्ष विना - मोबदला इंग्रजी विषयाचं अध्ययन त्यांनी केलं. काल 'शिक्षक दिन' आपल्या वडिलांची ही आठवण सांगताना त्यांचे चिरंजीव श्री. दिपक आवटे यांनाही गहिवरून आले. खरंतर आमदारातील अशा एका अनोख्या शिक्षकाला आपणही सलाम केला पाहिजे. त्यांनी सुरू केलेल्या दूध उत्पादक संस्थेत आजही रोज तीस - पस्तीस हजार लिटर दूध संकलीत होते. आमदारांच्या घरी असंख्य कार्यकर्ते, समस्या घेऊन येणारी जनता यांची नेहमीच गर्दी असे. परत जायला वाहन नसल्याने अनेकांचा आमदारांच्या घरीच मुक्काम होत असे. रोजचा चाळीस - पन्नास लोकांचा स्वयंपाक व्हायचा. पत्नी सौ. सुंदरमाई या स्वत: इतरांचे मदतीने सर्वांची राहण्या - जेवणाची व्यवस्था बघत असे. आमदार श्री. विठ्ठलराव आवटे यांच्या यशात त्यांची पत्नी सौ. सुंदरमाईंचा फार मोठा वाटा होता. सुंदरमाईंचे वडील श्री. सदाशिवराव विरकर (धुमाळ) हे पुणे येथे तत्कालीन कलेक्टर या हुद्द्यावर कार्यरत होते. श्री. विठ्ठलराव व सौ. सुंदरमाई या दाम्पत्यांना एक कन्या व दोन चिरंजीव असा परिवार होता. आमदार श्री. वि. ना. आवटे यांचा राजकीय वारसदार म्हणून धाकटे चिरंजीव श्री. दिपक आवटे यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. राजुरी गावचे उपसरपंच ते १९९५ साली झालेली जुन्नर तालुक्याची पंचायत समिती निवडणूक जिंकत शिवसेनेचे पहिले सभापती पद असा श्री. दिपक आवटे यांचा यशस्वी राजकीय प्रवास आहे. असे हे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले, जुन्नरला लाभलेले एक गुणी राजकारणी व्यक्तिमत्व मधुमेह व रक्तदाब या विकारांशी झुंज देत १९८३ साली काळाच्या पडद्याआड गेले. परंतु माळशेज घाटाच्या रूपाने त्यांची आठवण मात्र सतत येत राहिल.
लेखन
श्री.संजय नलावडे, धोलवड (मुंबई)
मोबाइल नं. - ८४५१९८०९०२
निसर्गरम्य जुन्नर-भूमी गुणीजनांची
🛎️🛎️🛎️🛎️🛎️🛎️🛎️🛎️🛎️

