कांतीलाल कडू यांच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट..!
......................................................
राजेश बाष्टे अलिबाग प्रतिनिधी:-
सद्यःस्थितीत तसूभरही हलगर्जीपणा परवडणारा नाही. आरोग्य सेवेला अधिक बळकटी देण्याची गरज आहे. सामान्यांच्या अपेक्षा सरकारकडून असतात. त्या पूर्ण करताना सरकारनेही मागे हटता कामा नये. पनवेलच्या आरोग्य यंत्रणेला अधिक गती देवून सर्वसामान्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी यंत्रणेतील त्रुटी भरून काढण्यावर तातडीने लक्ष द्यावे, असे निर्देश राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्य सचिव संजय कुमार यांना दिले आहेत.
पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. भक्तीकुमार दवे आणि नेरे विभागीय अध्यक्ष सचिन पाटील यांच्यासह आज, शुक्रवारी (ता. 09) सकाळी 11 वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेवून पनवेलच्या आरोग्यविषयी धोरणाबाबत 15 मिनिटे सविस्तर चर्चा केली. त्यानंतर कोश्यारी यांनी मुख्य सचिवांना पनवेलसंदर्भात आदेश दिले.
पनवेल महापालिकेच्या रखडलेल्या आकृतीबंधासह, प्रत्येक शहरात हॉस्पीटलची निर्मिती, सद्यःस्थितीत तातडीने आरोग्य सेवकांच्या रिक्त जागा भरणे, वैद्यकीय आधिकार्यांना उचित पगार, मानधन देवून त्यांचे मनोधैर्य वाढविणे, पनवेल उपजिल्हा रूग्णालयातील रिक्त जागा भरून अस्थितज्ज्ञ, नेत्र शल्यचिकित्सक, जनरल सर्जन, महिला प्रसुती तज्ज्ञ, त्वचा रोग तज्ज्ञ, क्ष-किरण तज्ज्ञ याशिवाय मॉड्युलर ऑपरेशन थिअटर, सोनोग्राफी मशिन, नवजात शिशू कक्षाची निर्मिती, सुरक्षेसाठी सीसीटिव्ही कॅमेरे बसविणे, आदींबाबत कांतीलाल कडू, डॉ. भक्तीकुमार दवे आणि सचिन पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे लेखी निवेदन देवून चर्चा केली.
कोश्यारी यांनी अतिशय प्रेमपूर्वक ही चित्तरकथा ऐकल्यानंतर तातडीने राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना आदेश देवून पनवेलच्या आरोग्यविषयी सर्व समस्या दूर करण्यासाठी त्यांना निर्देश देतोे, असे कडू यांना त्यांनी आश्वासित केले.त्यात खेळीमेळीच्या वातावरणात राजकीय, सामाजिक आणि आरोग्यविषयक चर्चेचा सारीपाट मांडल्यागत राज्यपाल कोश्यारी यांनी कडू यांना मागदर्शन केले. तसेच खासगी हॉस्पीटलकडून होणार्या रूग्णांच्या लूटीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळेच अडचणीत आहेत. मात्र, खासगी हॉस्पीटलकडून रूग्णांची लूट होत असल्याची व्यथा कडू यांनी त्यांच्या कानावर टाकली. त्यावेळी खासगी डॉक्टरांनी परिस्थितीचा गैरफायदा न घेता आरोग्य सेवेतून माणुसकी साधावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.
एमएमआरडीए क्षेत्राप्रमाणे पनवेलला .........
राज्य सरकारने एमएमआरडीए क्षेत्रात थेट आयएएस दर्जाचा आयुक्त संबंधित महापालिकांना दिला आहे. परंतु, अपवाद फक्त पनवेल महापालिका असल्याने सीओ केडरच्या अधिकार्यांकडून पदभार काढून घेत आयएएस अधिकार्याची नियुक्ती करावी, असा युक्तीवाद कांतीलाल कडू यांनी केल्यानंतर आपली रास्त मागणी असल्याने सरकारने त्वरीत विचार करावा, असे आपण त्यांना सुचित करू, असे कोश्यारी यांनी सांगितले.
महाराष्ट्र सारस्वतांची खाण...!!
ज्येष्ठ पत्रकार, कवी, सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून स्फुरलेली पुस्तके राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेट दिल्यानंतर त्यांनी पुस्तकांवर हलकीशी नजर फिरवत उत्स्फूर्तपणे दाद देत महाराष्ट्रात कवी, लेखक, साहित्यिक मोठ्या प्रमाणात आहेत. महाराष्ट्र ही सारस्वतांची खाण असल्याचा अभिमान व्यक्त करत कडू यांना शाबासकी दिली.

