हिंगोली। प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.२६,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर आणि १६५ वर्षाची दसरा महोत्सवाची परंपरा कायम राखत यंदा हिंगोली दसरा महोत्सवातून प्रदूषणमुक्त रावण दहन चा सामाजिक संदेश दिला आहे. पर्यावरणाचे रक्षण करून अश्या प्रकारचे कार्यक्रम आगामी भविष्यासाठी महत्वाचे आहेत असे प्रतिपादन खासदार हेमंत पाटील यांनी केले.
हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाला १६५ वर्षाची ऐतिहासिक परंपरा आहे. दरवर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते .नऊ दिवस नवरात्री महोत्सव आणि दसऱ्याच्या दिवशी प्रसिद्ध रामलीला मैदानात रावण दहनाने महोत्सवाची सांगता केली जाते, यादरम्यान हिंगोली शहरातील सांस्कृतिक प्रेमीकडून रामलीला आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते .परंतु यंदा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशभरातील सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे हिंगोलीचा दसरा होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु दसरा महोत्सव समितीने शासकीय नियमांचे पालन करून प्रदूषणमुक्त आणि समाजात सकारात्मक संदेश जाईल अश्या स्वरूपाचा दसरा महोत्सव साध्या पद्धतीने खाकीबाबा मठात साजरा केला यावेळी खासदार हेमंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती, सोबतच हिंगोली जिल्हा शिवसेना उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, जिल्हा समन्वयक दिलीप बांगर, सहसंपर्क प्रमुख डॉ. रमेश शिंदे,नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, शिवसेना शहर संघटक किशोर मास्ट, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे,तहसीलदार पांडुरंग माचेवाड व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी खासदार हेमंत पाटील म्हणाले की, हिंगोलीच्या दसरा महोत्सव समितीने आपली परंपरा कायम ठेवली आहे. कार्यक्रमातून समाजात सकारात्मक संदेश जाऊ शकतात. दरवर्षी या दिवशी मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करण्यात येते परंतु यंदा या अतिषबाजीला फाटा देऊन प्रदूषणमुक्त रावणदहन कार्यक्रम घेतला आहे.यामुळे यंदाच्या महोत्सवातून चांगला संदेश गेला आहे. कोरोना सारख्या विषाणूमुळे सर्व जग हैराण असताना शासनाने घालून दिलेले नियम पाळण्यात आले आहेत ही बाब कौतुकास्पद आहे, जगभरात सर्वांना भेडसावणारी समस्या म्हणजे प्रदूषण आहे.
मोठ्या प्रमाणात जल,वायू आणि ध्वनी प्रदूषण होत आहे यावर उपाय योजना करण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले जातात.आपल्याकडे दसरा,दिवाळी दरम्यान मोठ्या प्रमाणात फटाके फोडून ध्वनी आणि वायू प्रदूषण होत असते यावर नियंत्रण मिळवायचे असेल तर फटाक्याविना दसरा दिवाळी सण साजरे करून प्रदूषण टाळले पाहिजे आणि मला वाटत आपल्या दसरा महोत्सवातून ही सकारात्मक बाब सुरू झाली आहे असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले .

