shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अपयशी सुरुवातीने मॉर्गनचा आयपीएल नेतृत्वाचा श्रीगणेशा...!!

आयपीएलच्या तेराव्या सत्राच्या ३१ व्या सामन्यात शुक्रवारी रात्री दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडीयमवर गतविजेता मुंबई इंडियन्स व माजी विजेत्या कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात एक निरस सामना पार पडला. त्यामध्ये मुंबईने सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व राखत केकेआरला खेळाच्या प्रत्येक सत्रात निष्प्रभ केले. या सामन्यातील दोन गुणांसह मुंबईने गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप मारताना धावगती इतर संघांपेक्षा सरस ठेवली.

या सामन्यापूर्वी केकेआरच्या नेतृत्वात बदल करण्यात आला असून कर्णधार दिनेश कार्तिकची राजवट बरखास्त झाली का करण्यात आली ? हा पडद्यामागचा प्रकार शाहरूख खान व संघ प्रबंधनालाच ठाऊक. वरकरणी मात्र कार्तिकने नेतृत्व सोडल्याचे दाखविण्यात आले असले तरी अंदर की बात गुलदस्त्यातच राहीली. 

कार्तिकचे नेतृत्व सोडण्याइतके वाईट नक्कीच नव्हते. पहिल्या टप्प्यातील सात सामन्यानंतर केकेआर पहिल्या चार संघात टिकून होती. परंतु कार्तिकच्या ऐवजी कर्णधारपदी आलेल्या इंग्लंडच्या विश्वविजयी संघाचा कर्णधार आयोन मॉर्गनला आपल्या पहिल्याच आयपीएल नेतृत्वाच्या सामनात मुंबई इंडियन्सकडून सडकून मार खावा लागला. त्यामुळे त्याचाही भ्रमनिरास झाला.

स्पर्धेच्या दरम्यान आयपीएल संघाचा कर्णधार बदलण्याचा हा काही पहिलाच प्रसंग नव्हता किंवा नसेलही. परंतु सन २०१३ साली मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणाऱ्या अपयशी रिकी पाँटींगला बदलून रोहित शर्माला कर्णधार करण्याचा संघ प्रबंधनाचा निर्णय जबरदस्त फलदायी ठरला. पाँटींगच्या नेतृत्वात तळाला असणाऱ्या मुंबईने रोहीतच्या करामती नेतृत्वाच्या जोरावर जोरदार मुसंडी मारत थेट विजेतेपदच मिळविले आणि त्यानंतर आणखी तीन जेतेपद पटकावून रोहीतने इतिहास घडविला. 

आज तो आपणा सर्वांसमोर आहे. रोहीत सारखी जादूई करामत अजून कोणताही आयपीएल संघाचा कर्णधार करू शकला नाही.मुंबईने केकेआरवर मिळविलेल्या एकतर्फी विजयात जोरदार कामगिरी करणाऱ्या मुंबईच्या करामती शिलेदारांच्या कलाबाजीवर एक नजर टाकूया.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार व मुंबईचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डिकॉकने एकट्याने केकेआरच्या नाकात दम आणला. डिकॉकने आपल्या ७८ धावांच्या धडाकेबाज खेळीसाठी केवळ ४४ चेंडूंचा सामना करत नऊ चौकार व तिन षटकारांची उधळण करत संघाला विजयी करूनच नाबाद परतला.

मुंबईच्या फिरकी गोलंदाजीला हिन ठरविणाऱ्या टिकाकारांच्या टिकेवर जोरदार उत्तर देताना फिरकीपटू राहुल चाहरने जोरदार मारा करताना केकेआरच्या फलंदाजीचा जीवच काढून घेतला. केकेआरचे फलंदाजीचे आधारस्तंभ असलेल्या शुभमन गिल व दिनेश कार्तिकला त्याने सलग दोन चेंडूंवर बाद केले. राहुलने आपल्या चार षटकांच्या गोलंदाजीत केवळ १८ धावा दिल्या.

जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराहाने किफायतशीर गोलंदाजी करताना केकेआरच्या फलंदाजीचा कणा असलेला आंद्रे रसेलचा काटा काढताना चार षटकात फक्त २२ धावा दिल्या.       

मुंबईचा कर्णधार रोहीत शर्मा केवळ ३५ धावा काढून बाद झाला परंतु डिकॉक सोबत पहिल्या गडयासाठी केलेली ९४ धावांची भागीदारी मुंबईच्या विजयासाठी महत्वपूर्ण ठरली.अकरा चेंडूत २१ धावांची नाबाद खेळी करणाऱ्या अष्टपैलू हार्दिक पांडयाने तीन चौकार व एक षटकार मारताना संघाला आठ गडी राखून विजय मिळवून देणारी मोलाची कामगिरी केली.
             
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
 क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close