सावळीविहीर (प्रतिनिधी)
नगर-मनमाड महामार्गावर मोठ मोठाले खड्डे पडले असून या खड्ड्यात काही दिवसापूर्वी माती मिश्रित मुरूम टाकल्याने आणखीन मोठी दैना या रस्त्याची झाली आहे. या मातीमिश्रित मुरुमामुळे मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण झाली आहे. या धुळीच्या प्रदूषणाने या नगर-मनमाड रस्त्याच्या लगत असणाऱ्या दुकानदार व रहिवाशांना मोठा त्रास होत असून आरोग्यास ते हानीकारक होत आहे.
त्यामुळे हा रस्ता त्वरित चांगला करावा, अन्यथा आता वाहनधारका प्रमाणेच या रस्त्याच्या लगत असणारे रहिवाशी, शेतकरी व दुकानदार संतप्त झाले असून त्यांनीही आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सध्या नगर-मनमाड हा महामार्ग चर्चेचा विषय बनत चालला आहे. कारण या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे मोठे पडले आहेत. काही दिवसापूर्वी या खड्ड्यांमध्ये माती मिश्रित मुरूम टाकण्यात आला. मात्र पहिल्याच पावसाने हा मुरूम बाहेर निघून मोठमोठे दगड बाहेर आले.
त्यामुळे मालट्रकांचे टायर फुटणे सुरू झाले व तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांमुळे कडक ऊन पडताच या रस्त्याला धुळीचे मोठे साम्राज्य निर्माण झाले आहे. ही धूळ रस्त्यालगतच्या असणाऱ्या दुकानदार ,रहिवाशी यांना मोठी त्रासदायक ठरत आहे.नगर-मनमाड रस्त्यालगत अनेक गावे, शहरे आहेत.तसेच अनेक दुकाने, रहिवासी यांची घरी आहेत. मात्र या रस्त्याच्या खड्ड्यांमुळे व वाहनांची ये-जा मुळे मोठी धूळ उडत आहे.या धुळीने सर्व दुकाने व लगतचे रहिवासी यांना बेजार केले आहे. शिवाय दुकानदारांचा मालही धुळीमुळे कोणी ग्राहक घेण्यास तयार नाही.
रहिवाशांनाही आपल्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहनधारकांना वाहन चालवताना जशी कसरत करावी लागते. तत्याच प्रमाणेआता या नगर-मनमाड रस्त्यालगत असणार्या रहिवासी ,दुकानदार,शेतकरी यांनाही मोठी धुळीपासून बचाव करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. अनेक छोटे मोठे व्यावसायिक या रस्त्याच्या कडेला छोटाशी टपरी किंवा हातगाडी लावून व्यवसाय करतात . मात्र फळे, भाजीपाला तसेच वडापाव ,भजी,भेळवाले यांनाही या धुळीपासून मोठा त्रास होत आहे.
ग्राहकही या धुळीमुळे या छोट्या व्यवसायाकडे पाठ फिरवत आहे.त्यामुळे शासनाने हा नगर मनमाड रस्ता त्वरित चांगला करावा, अन्यथा वाहनधारकांप्रमाणे या रस्त्याच्या लगत असणारे दुकानदार, शेतकरी ,रहिवासी आता ठिकठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही या रहिवाशी व दुकानदार यांनी दिला आहे.

