shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चेन्नई सुपर किंग्ज सन २०१० ची पुनरावृत्ती करेल ?

सोमवारी रात्री अबुधाबीच्या शेख जायेद स्टेडीयमवर तेराव्या आयपीएल सत्रातले दोन तळाचे संघ राजस्थान रॉयल्स व चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात एक निरस व एकतर्फी सामना संपन्न झाला. तशी दोन्ही संघांसाठी या सामन्यात करू किंवा मरूची परिस्थिती होती. त्यातच चेन्नईचा महापराक्रमी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसाठी हा ऐतिहासिक सामना होता. ऐतिहासिक म्हणण्याचे कारण म्हणजे एम.एस हा आयपीएल मध्ये २०० सामने खेळणारा पहिला खेळाडू बनला. 

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईच्या संघाने  चालू सत्रातील निच्चांकी धावसंख्या नोंदविली. त्या धावा  चेन्नईच्या गोलंदाजांना आपले कौशल्य दाखविण्यास अपुऱ्या होत्या. तरीही दिपक चाहर व जोश हेझलवुडने त्यांच्या परीने जोरदार प्रयत्न केला. पण खेळपट्टीकडून फिरकी गोलंदाजांना विशेष लाभ न झाल्याने चेन्नईच्या प्रयत्न व आशांवर पाणी पडले. त्यातच त्यांचे क्षेत्ररक्षण स्पर्धेत सहभागी सर्व संघांमध्ये खालच्या दर्जाचे ठरल्याने त्यांच्या अडचणीत भर पडले. नको तेथे जास्त धावा देणे, चेंडू अडविताना क्षेत्ररक्षकांकडून ढिलाई होणे, झेल सुटणे व खेळाडूंचा फिटनेस ह्या त्यांच्यासाठी चिंतेच्या गोष्टी ठरल्या. चेन्नईच्या संघाचा विचार केला तर या संघात निवृत्त व वयस्कर खेळाडूंचा मोठा भरणा असल्याने त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागली.        
  
आयपीएलमधील इतर संघ नवोदित व होतकरू खेळाडूंवर अधिक जोर देत असताना चेन्नई आपल्या जुन्या ध्येय धोरणांना चिटकून बसल्याने मागील १० पैकी ७ सामन्यात चेन्नईला पराभवाचे जोरदार झटके बसले. आता तर त्यांच्या पुढे राहीलेले चार सामने सरस धावगतीसह जिंकणे आवश्यक आहे. चेन्नईच्या संपूर्ण संघाची सध्याची मानसिकता बघता हे कार्य त्यांच्यासाठी महाकठीण ठरणार आहे. 

चेन्नईला अनुभवी सुरेश रैना व हरभजनसिंगची अनुपस्थी प्रकर्षाने जाणवली. तसेच अंबाती रायडू, ड्वेन ब्राव्हाेची तंदुरूस्ती त्यांच्या मुळावर आली तर ज्याच्या कडून मोठया अपेक्षा होत्या तो कर्णधार धोनी फलंदाजीत सफसेल अपयशी ठरल्याने चेन्नईला पराभवाची मालिकाच बघावी लागली. 

निव्वळ धोनीच्याच बाबत बोलायचे ठरले तर त्याने स्वतःच आत्मविश्वास गमावल्याचे जाणवत असल्याने इतर खेळाडूंकडून तो चांगली कामगिरी करून घेण्यात अपयशी ठरत आहे. शिवाय तो स्वतः फलंदाजीत वरच्या क्रमांकावर येत नसल्याने व इतर फलंदाजही जबाबदारीने खेळत नसल्यामुळे त्यांच्या प्रथम फलंदाजी करूनही धावा होत नाहीत तर धावांचा पाठलाग करतानाही ते अपूरे पडत असल्याने चेन्नईला कधी नव्हे ते या सत्रात फार मोठया नामुष्कीला सामोरे जावे लागत आहे. त्यांचा फाफ ड्यू फ्लेसीसच काय तो फलंदाजीत चमक दाखवत आहे. एवढीच एकमेव जमेची बाजू त्यांच्याकडून फलंदाजीत होत आहे. अनुभवी शेन वॉटसन, केदार जाधव यांचे अपयशी ठरणं चेन्नईच्या अडचणी वाढविणाऱ्याच ठरले. शिवाय धोनी फलंदाजीत सॅम करनचा मधल्या फळीत उपयोग करून घेत नसल्याने त्यांना फिनिशिंगचा प्रश्नही भेडसावत आहे. तसेच फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजा, कर्ण शर्मा व पियुष चावलाही रद्दी झाल्यासारखे वाटत आहे.

चेन्नई संघाला या सत्राच्या सुरुवातीलाच कोरोना व्हायरसने घेरल्यामुळे संपूर्ण संघाचीच घडी कोलमडली होती. त्यात भर पडली ती रैनाच्या संघ सोडून जाण्याने व हरभजनचे संघातून अंग काढून घेण्याने. तीन वेळच्या आयपीएल विजेत्या या संघाला प्रथमच या स्पर्धेत प्राथमिक फेरीतूनच बाद व्हायची वेळ आली आहे. सन २०१६ व १७ चा बंदीचा काळ वगळता या संघाने खेळलेल्या प्रत्येक सत्रात प्ले ऑफ फेरी गाठली आहे. 

सन २०१० मध्ये चेन्नईने पहिले पाच सामने गमावल्यानंतरही जोरदार मुसंडी मारत थेट विजेतेपदच पटकविले होते. यंदाही तशीच परिस्थिती होती व चेन्नई संघाकडून पुन्हा तशाच चमत्काराची अपेक्षा होती. परंतु त्यावेळच्या आणि आताच्या संघ, खेळाडूंची क्षमता, मानसिकता व परिस्थितीत फार मोठा फरक असल्याने यंदा तरी चेन्नईकडून चमत्काराची शक्यता धुसर वाटते. त्यामुळे सध्या चेन्नईवर ओढवलेले संकट बघून चेन्नईच्या समर्थकांनाच नव्हे तर समस्त क्रिकेटप्रेमींना वाईट वाटत आहे.

लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
 क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close