नेहमीप्रमाणे तेराव्या आयपीएल सत्राची सुरुवात झोकात करून नंतर बेभरवशी खेळ करत हाती आलेले सोपे विजय सहज पराभवात रूपांतर करण्यात पटाईत असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबने सलग तिन सामने जिंकत पाचव्या क्रमांकावर मुसंडी मारली असल्याने प्ले ऑफ मध्ये जाण्याच्या त्यांच्या आशा अद्यापही जिवंत आहेत. पंजाबच्या खेळाची खास बाब म्हणजे मागील दोन सामन्यात त्यांनी गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्सला हरविले आहे.
मंगळवारी रात्री तेराव्या आयपीएल सत्रातील ३८ वा सामना दुबईच्या दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर किंग्ज इलेव्हन पंजाब व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यापूर्वी पंजाब गुणतालिकेत सहाव्या स्थानावर होते. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबने शिखर धवनच्या विक्रमी शतकानंतरही २० षटकात ५ बाद १६४ धावा केल्या. आयपीएल इतिहासात सलग दुसरे शतक ठोकणारा पहिला फलंदाज बनलेल्या शिखर धवनच्या नाबाद १०६ धावा वगळल्या तर इतर फलंदाजांंच्या व अवांंतर मिळून केवळ ५८ धावा आहेत. यावरून धवनच्या झुंजार खेळीचे महत्व अधोरेेखीत होते.
प्रस्तुत लेखात पंजाबच्या विजयाचे शिल्पकार ठरलेल्या खेळाडूंच्या कामगिरीवर एक नजर टाकूया.
छोटया चणीचा व ब्रायन लाराची प्रतिकृती म्हणून ओळखला जाणारा विंडीजचा डावखुरा फलंदाज निकोलस पुरनही पंजाबकडून चालू सत्रात सातत्याने चांगली फलंदाजी करत आहे. या सामन्यात त्याने चौथ्या क्रमांकावर खेळताना एक महत्वपूर्ण खेळी करून कर्णधार राहुल व मयंक अग्रवालच्या अपयशी सुरुवातीनंतर पंजाबचा बुरूज सांभाळला. पूरनने २८ चेंडू खेळताना सहा सणसणीत चौकार व ३ दणदणीत षटकार ठोकून दणकेबाज अर्धशतक झळकवत पंजाबच्या विजयाचा शिल्पकार बनला. त्याने मॅक्सवेल सोबत चौथ्या विकेसाठी ६९ केलेली भागीदारी या विजयात मोलाची सिध्द झाली. विशेष म्हणजे पूरनच्या या वादळी खेळीमुळे शिखर धवनचे शानदार शतक झाकोळले गेले.
पंजाबने १०.७५ कोटी रूपये खर्च करून खरेदी केलेल्या ग्लेन मॅक्सवेलने या सामन्यात आपल्या अष्टपैलू भूमिकेला खऱ्या अर्थाने न्याय देताना पंजाबच्या विजयात बॅट व बॉलने महत्वाचे काम केले. पंजाबकडून गोलंदाजीचे आक्रमण सुरू करणाऱ्या फिरकी गोलंदाज मॅक्सवेलने चार षटकात ३१ धावा देत रिषभ पंतचा महत्वाचा बळी मिळविला. शिवाय फलंदाजीतही २४ चेंडूत ३ चौकारांसह ३२ धावा फटकवित या सत्रात प्रथमच आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडली.
जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी या सत्रात सातत्याने उत्कृष्ठ मारा करत आहे. या सामन्यातही तो आपले कर्तव्य निसरला नाही. चार षटकांच्या आपल्या निर्धारीत कोटयात त्याने केवळ २८ धावा देत अष्टपैलू मार्कस स्टोईनस व शिमरन हेटमायरला चालते केले.या सत्रातील आपला तिसरा सामना खेळणाऱ्या युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलने केवळ तेरा चेंडूच खेळले. परंतु या छोटेखानी डावात गेलने तीन षटकार व २ चौकार मारून २२३.०७ च्या स्ट्राईट रेटने २९ धावा बनविल्या. गेलची ही खेळी शेवटी पंजाबसाठी फायदेशीर सिध्द झाली.
फिरकी गोलंदाज मुरूगन आश्विनने आपल्या चार षटकात किफायतशीर गोलंदाजी करून दिल्लीच्या फलंदाजांना जखडून ठेवताना केवळ ३३ धावा खर्च केल्या. परंतु या दरम्यान त्याने दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरला बाद करून महत्वाचं कार्य केलं.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

