shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पंजाब व केकेआरने सन्मान राखला...!!

तेराव्या आयपीएल सत्रात शनिवारी दोन सामने खेळविण्यात आले. स्पर्धेत प्रत्येक संघाने निर्धारीत १४ पैकी १० किंवा ११ सामने खेळले असून प्लेऑफ मध्ये पोहोचण्याची प्रत्येक संघात चढाओढ असून सर्वांचा आवडता व लाडका संघ चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे व त्यांचे आव्हान सध्या तरी संपल्यासारखेच वाटते.  मुंबई, दिल्ली,आरसीबी १४ गुणांसह पहिल्या ३ क्रमांकावर असून या तीन संघाचे प्लेऑफ मधील स्थान जवळ जवळ पक्के आहे. तर कोलकाता, पंजाब, हैद्राबाद यांना अजूनही संधी आहे तर राजस्थान रॉयल्सचीही धुगधुगी कायम आहे.

याच पार्श्वभूमिवर शनिवारी कोलकाता नाईट रायडर्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पहिला सामना तर किंग्ज इलेव्हन पंजाब व सन रायझर्स हैद्राबाद यांच्यात दुसरा सामना झाला.दिल्लीचे या सामन्यापूर्वी १० सामन्यात १४ गुण असल्याने ते काहीसे निश्चिंत होते. तर केकेआरला पुढील प्रत्येक सामना जिंकणं अनिवार्य असल्याने त्यांच्याकडून जोरदार प्रतिकाराची अपेक्षा होती व ती त्यांनी पूर्णही केली. तर दुसऱ्या सामन्यातील पंजाब व हैद्राबाद यांना जिंकण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे त्यांच्या कडून तिव्र प्रतिकाराची अपेक्षा होती व त्यांनी निकराची लढाई केली सुध्दा.

चालू सत्रातील ४१ व्या सामन्यात केकेआरने धावांचा डोंगर उभे करून दिल्ली पुढे महासंकट उभे केले. केकेआरकडून यंदा प्रथमच सलामीला खेळणाऱ्या नितिश राणाने सासऱ्याच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी केकेआरसाठी सामना जिंकून देणारी खेळी साकारली. तर आक्षेपार्ह गोलंदाजीमुळे संघाबाहेर राहीलेल्या सुनिल नारायणनेही फलंदाजीत हात अजमावले.

केकेआरकडून खेळणारा मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्तीने जादूई मारा करताना चार षटकात केवळ २० धावा देऊन दिल्लीचा अर्धा संघ उखडला. या चालू सत्रातला सामन्यात ५ बळी घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. तर तेरा आयपीएल सत्रातीत केकेआर कडून सामन्यात पाच बळी घेणारा तो दुसरा गोलंदाज बनला. यापूर्वी अशी कामगिरी फक्त सुनिल नारायणनेच केकेआरसाठी केली आहे.

दिल्लीवर मोठा विजय मिळवून केकेआर १२ गुणांसह चौथ्या स्थानी पोहोचले. केकेआरने हेच सातत्य पुढील सामन्यात राखले तर प्ले ऑफ मध्ये पोहोचणारा चौथा संघ तोच ठरू शकतो. तर या पराभवाने दिल्लीच्या विजय अभियानाला खिळ बसली आहे. परंतु ते एक विजय मिळवून प्ले ऑफ गाठू शकतात.

दुसऱ्या सामन्यात सन रायझर्सने पंजाबला १२६ धावांत रोखले खरे परंतु चांगल्या सुरूवातीनंतरही ते विजयी लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरल्याने प्ले ऑफ फेरी गाठणे त्यांच्यासाठी यंदा दिवास्वप्नच ठरण्याची शक्यता आहे. सलग चौथ्या विजयासह पंजाबने आपले आव्हान राखले जरी असले तरी त्यांच्यासाठी पुढील मार्ग फार खडतर ठरणार आहे. केकेआरला चौथ्या क्रमांकावरून खाली ओढून स्वतः प्ले ऑफ फेरी गाठणे पंजाबला कठीण जाणार आहे.

या सामन्यात दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी समाधानकारक कामगिरी केली असली तरी फलंदाजांची झालेली परवड पुढील सामन्यात खास करून पंजाबची झाली तर त्यांच्या भवितव्यासाठी घातक ठरेल. सन रायझर्स हैद्राबादचा सुर्य या पराभवाबरोबरच मावळतीच्या दिशेने झुकल्याचे सकृतदर्शनी तरी दिसत आहे.
 लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close