shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लाखोंचे नुकसान होत असताना शेतकऱ्याला घरी बनवावे लागत आहेत पेढे???... अमोल शिंदे..!!


निसर्ग आणि व्यवस्था यांच्या अवकाळी फटक्याने शेतकरी बेजार....

दि.१६/१०/२०२० महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे अमोल शिंदे यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली की,२०२० संकटाची मालिका घेवून आले.आज १५ ऑक्टोबर देशाचे माजी राष्ट्रपती,थोर शास्त्रज्ञ डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस.कलाम साहेबांनी २०२० मध्ये जगातील सर्वात युवा असणारा भारत देश जगात पुढे असावा हे स्वप्न पाहिले.तेव्हापासून २०२० वर्ष सातत्याने खूप विशेष वाटायचे.पण हे वर्ष सुरू झाले आणि हे वर्ष पार करून २०२१ गाठणे हेच मोठे ध्येय बनले ते covid 19 या जागतिक महामारी मुळे....



सगळे जग थांबले असताना जगाचे पोट भरणारा शेतकरी मात्र थांबला नाही.त्याने या संकटात प्रचंड आर्थिक नुकसान सहन करून ही न डगमगता कार्य सुरू ठेवले. कोरोना आटोक्यात येतोय असे वाटत असताना नवीन शेतीविषयक धोरणांनी शेतकऱ्यांना धक्का दिला.तो निराश झाला.पण थांबला नाही....

जग सर्व लॉक डाऊन मध्ये वर्क फ्रॉम होम करत असताना बळीराजा "वर्क फ्रॉम फार्म" करत होता. लॉक डाऊन मध्ये स्वतः पिकवलेला शेतीमाल कोरोना काळात घरोघरी पोहच करत होता.शेतात भाजीपाला,द्राक्षे,ऊस अशी पिके चांगली आणण्यासाठी मेहनत घेत होता.पुन्हा एकदा साखर कारखाने सुरू होत आहेत.आलेला ऊस जाईल.भाजीपाल्याला चांगला दर मिळेल, द्राक्ष छाटण्या सुरू झाल्या.आता संकटे संपली,दिवाळी गोड होईल असे वाटत असताना गेल्या दोन दिवसात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला.शेतात उभा असलेला ऊस पूर्ण आडवा झाला.भाजीपाला तर पाण्यात बुडून गेला.टोमॅटो,दोडके,कारली यांचे कष्टाने उभा केलेले माळे कोलमडून पडले.द्राक्ष बागायतदार तर डाऊनी,कुजवा यांच्यामुळे पुरता बेजार झाला.इतकेच काय १२ वी परीक्षा उत्तीर्ण होऊन शेतात काम करत CET परीक्षेचा अभ्यास करत असलेल्या मुला - मुलींना सर्व रस्ते बंद झाल्याने परीक्षा केंद्रावर परीक्षेला जाता आले नाही.एकीकडे शेतकरी बापाने शेतीचा पेपर कष्टाने लिहिला पण निसर्गाने त्यावर पाणी फेरले व दुसरीकडे CET परीक्षा देवून पुढील उज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलांच्या आडवे ओढ्याचे पाणी आले व परीक्षाच देता आली नाही.दोन्ही ठिकाणी नियतीच्या या एकतर्फी परीक्षेने शेतकरी हवालदिल झाला आहे.....

" इतक्या संकटात शेतकरी आहे तो चौफेर संकटात आडकला आहे.तरी त्याच्या घरी पेढे बनत आहेत??* त्याचे कारण असे,गेले दोन दिवस झालेल्या पावसाने पूर्वभागातील सर्व ओढ्याना पुर आला.सर्व रस्ते बंद.त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या घरी असणाऱ्या गाई,म्हैशीचे दूध विकत घेणारे गवळी व डेअरी दूध न्यायला आले नाहीत.मोठ्या प्रमाणात असणाऱ्या दुधाचे करायचे काय???खरेतर या दुधाच्या पैशावर अनेक शेतकऱ्यांचे घर चालते.पण नाईलाजाने एकीकडे शेतीचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यास अन्नाचा घास गोड लागत नसताना,दूध खराब होऊ नये म्हणून अनेक शेतकऱ्यांच्या घरी आज बासुंदी व पेढे बनले. एरवी घरात खायला दुध कमी ठेवून चार पैसे खर्चाला मिळावेत म्हणून गवळ्याना दूध घालणाऱ्या शेतकऱ्याला काळजावर दगड ठेवून पेढे करावे लागले.  "
कितीही या पेढ्यात साखर घातली तरी ते शेतकऱ्याला ते गोड लागणार नाहीत.पेढे खायची कुठे आहे परिस्थिती??दुधात साखर घालायला लागणाऱ्या पैशाचा भार नाईलाजाने तो सहन करतोय.दूध खराब करायचे नाही. म्हणून चुलीवर शेतकऱ्याची माऊली दुःखाचा आवंढा गिळत दूध आटवत आहे. २०२० ने जाता जाता ही शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला.निसर्गाचा प्रकोप,व्यापाऱ्यांची दलाली,सरकारची बदलती धोरणे यांनी उद्ध्वस्त होत असलेल्या शेतकऱ्याची यंदाची दिवाळी गोड करण्यासाठी सरकार काही करेल का?ही आशा या शेतकऱ्याला आहे.मायबाप सरकारने  लवकरात लवकर शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून त्याच्या हातात मदतीचा थोडा आधार द्यावा..
एकावर एक येणारी संकटे झेलत शेतकरी म्हणत आहे..मोडला असला संसार, तरी मोडला नाही कणा,पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा.. असे परखडपणे आपले मनोगत त्यांनी व्यक्त केले
चालू परिस्थितीत शेतकऱ्यांची व्यथा अमोल शिंदे यांनी व्यक्त केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक शिक्षक पतसंस्थेचे माजी संचालक भारत ननवरे यांनी केले
close