shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राजस्थान जिंकले, मुंबई हरले चेन्नई बाहेर गेले..!!

तेरावे आयपीएल सत्र आता उत्कंठा, उत्सुकता व मनोरंजनाची परिसीमा ओलांडून सहभागी संघाना त्यांचे भवितव्य ठरवताना झुंझताना क्रिकेट रसिकांना मनस्वी आनंद आहे. त्याच पार्श्वभूमिवर रविवारी झालेल्या दोन सामन्यांनी स्पर्धेचे चित्रच बदलून टाकले.

रविवारच्या पहिल्या सामन्यात तळाच्या चेन्नई किंग्जचा सामना प्ले ऑफमध्ये पोहचण्याची शक्यता शंभर टक्के खात्री असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू बरोबर झाला. या सामन्यापूर्वी चेन्नईची अवस्था अतिशय बिकट होती. सततचे मानहानीकारक पराभव व संघाची विस्कटलेली घडी यामुळे चेन्नई संघाची संपूर्ण मानसिकता बिघडल्याचे जाणवत होते. या सामन्या अगोदर झालेल्या मुंबई इंडियन्स सोबतच्या सामन्यात चेन्नईचा पुरता फज्जा उडाला होता. त्यामुळे आरसीबी विरूध्दच्या सामन्यात चेन्नईला कोणीही विजयाचे दावेदार गणले नव्हते. परंतु त्या सामन्यात चेन्नईच्या संघाने प्रथम गोलंदाजी, क्षेत्ररक्षण व नंतर फलंदाजीत अफलातून कामगिरी करत बलाढय आरसीबीला चारीमुंडया चित करत गुणतालिकेत आघाडीवर जाण्याचे आरसीबीचे स्वप्न भंगवले.

चेन्नईकडून कोरोना व्हायरसचे शिकार ठरलेले वेगवान गोलंदाज दिपक चाहर व सलामीवीर ऋतूराज गायकवाड यांनी संघाला विजय मिळवून देणारी करामत केल्याने चेन्नईने दोन गुणांसह आपल्या खात्यात ८ गुण करत प्ले ऑफच्या आशा जिवंत केल्या. मात्र त्या सर्वस्वी इतर संघाच्या कामगिरीवर आधारीत असल्याने त्यांच्या आशांना सुरूंग लागायला वेळ लागला नाही.

चेन्नई व आरसीबी यांच्यातील सामन्यानंतर या सत्रात गुणतालिकेत अव्वल असलेल्या मुंबई इंडियन्स व सातव्या स्थानावरील  राजस्थान रॉयल्स यांच्यात एक मोठ्या धावसंख्येचा रोमहर्षक सामना झाला. खेळातील सर्वच क्षेत्रात प्रबळ असलेल्या मुंबईला या सामन्यात नाट्यमयरित्या पराभूत व्हावे लागले. नियमित कर्णधार रोहीत शर्माच्या गैरहजेरीत मुंबईचे नेतृत्व किरॉन पोलॉर्डने केले. मुंबईने इशान किशन, सुर्यकुमार यादव यांच्या मजबूत खेळानंतर हार्दिक पंडयाच्या तडाखेबाज खेळाने मोठी धावसंख्या रचली खरी. परंतु त्यानंतर या सत्रात उशीराने राजस्थान संघात सामील झालेल्या बेन स्टोक्सने मागील चार सामन्यातील अपयशाचे उट्टे या सामन्यात भरून काढीत चालू सत्रातील स्वत:ची मोठी खेळी साकारताना वादळी शतक करून राजस्थानला बलाढय मुंबईवर आश्चर्यजनक विजय मिळवून दिला.

राजस्थान या विजयाचे २ गुण मिळून १० गुणांसह सहाव्या स्थानावर आल्याने त्यांचे चालू आयपीएल सत्रातील भवितव्य जीवंत राहीले आहे. या अकल्पीत पराभवाने मुंबईचे सध्या तरी काही नुकसान झाले नसले तरी रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात आरसीबीवर विजय मिळवून आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचे स्वप्न बघणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जच्या आशेला मोठा सुरूंग लागला. आजवर चेन्नईने खेळलेल्या सर्वच आयपीएल सत्रात कमीत कमी प्ले ऑफ फेरी गाठली होती. या स्पर्धेतील त्यांच्या निराश जनक कामगिरी मुळे यंदा त्यांची परंपरागत बाद फेरी हुकली. चेन्नईचा आजवरचा आयपीएल इतिहास खरोखर सुवर्णमय असाच आहे. या स्पर्धेचे तीन विजेतेपद व पाच उपविजेतेपद मिळवून चेन्नईने दैदिप्यमान यश मिळविले होते. मात्र या वर्षी त्यांच्या संघाला सुरूवातीपासूनच अनेक संकंटांनी घेरल्याने यंदा त्यांना आपल्या लौकीकाला साजेसा खेळ करता आला नाही. त्यामुळे चेन्नईच्या चाहते व हितचिंतकांबरोबरच समस्त क्रिकेट जगताला धक्का बसला आहे. 
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close