shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केकेआर ठरले आरसीबीचे वेठबिगार...!!

तेराव्या आयपीएल सत्राच्या ३९ व्या सामन्यात बुधवारी रात्री कोलकाता नाईट रायडर्स ( केकेआर ) व रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू (आरसीबी ) यांच्यात सामना झाला. परंतु हा खऱ्या अर्थाने केवळ सामनाच झाला. केकेआरने आरसीबीला कोणतीही टक्कर न देता आरसीबी समोर सपशेल गुडघे टेकले. हा सामना या सत्रातील निच्चांकी धावसंख्येचा सामना ठरला.  या सामन्यापूर्वी बारा गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या आरसीबीने केकेआर वरील सहज सोप्या विजयाने आपल्या खात्यात दोन गुणांची वाढ करत प्ले ऑफ फेरी जवळ जवळ पक्की केली. ३९ चेंडू व आठ गडी राखून मिळविलेल्या या विजयात आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज सामनावीर ठरला, परंतु त्यांच्या इतरही काही खेळाडूंनी चमकदार खेळ केला त्या विषयी प्रस्तुत लेखात आपण जाणून घेऊ या.

आरसीबीच्या विजयाचा मुख्य शिल्पकार ठरलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पॉवर प्लेमध्येच केकेआरच्या फलंदाजीचे कंबरडे मोडून आरसीबीचा विजय निश्चित केला होता. मागील काही सामन्यात कामगिरीत सातत्य नसल्याने संघात आत बाहेर राहीलेल्या सिराजने या सामन्यात नवा चेंडू हातात मिळताच धारदार व भेदक मारा करताना केकेआरचे ३ अव्वल फलंदाज स्वस्तात गुंडाळले. त्याने चार षटकात केवळ आठ धावा देताना आयपीएल क्रिकेटच्या इतिहासात हाणामारीच्या पॉवर प्लेच्या षटकात सलग दोन षटके निर्धाव टाकून ऐतिहासीक विक्रम नोंदविला.
यजुवेंद्र चहल हा लेगस्पिनर आरसीबीचा अतिशय भरवशाचा व संघाला हवे तेंव्हा बळी मिळवून देण्यात वाकबगार झाला आहे. या सामन्यातही त्याने आपल्या फिरकीचे सुंदर जाळे विणून आरसीबीच्या फलंदाजांना धावांसाठी मोताज केले. शिवाय चार षटकात केवळ १५ धावा देताना दिनेश कार्तिक व पॅट कमिन्स हे महत्वाचे मोहरेही टिपले.

चहल प्रमाणेच आरसीबीचा हुकुमाचा एक्का बनलेला ऑफस्पिन गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर प्रत्येक सामन्यात अतिशय सुंदर गोलंदाजी टाकत आहे. या सामन्यातही त्याने सुंदर मारा करताना आपल्या कोट्यातील चार षटकात फक्त १४ धावा देऊन केकेआरचा कर्णधार व प्रमुख फलंदाज आयोन मॉर्गनचा महत्वाच्या क्षणी बळी टिपून केकेआरला संकटात टाकले.

आपले पहिलेच आयपीएल सत्र खेळताना सलामीवीर देवदत्त पडीक़्कलने स्वतःचा वेगळाच ठसा उमटविला आहे. या सामन्यात आपला अनुभवी सलामी जोडीदार आरोन फिंच सोबत सात षटकात ४६ धावांची सलामी देताना केकेआरच्या गोलंदाजांची हवाच काढून घेतली. देवदत्तच्या २५ धावा आरसीबीकडून कोणत्याही फलंदाजाने काढलेल्या वैयक्तीक सर्वाधिक धावा ठरल्या

या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीची कर्णधार म्हणून प्रत्येक चाल यशस्वी ठरली. आपल्या गोलंदाजांचा खुबीने वापर करताना त्याने केकेआरचे विजयाचे स्वप्न उध्वस्त करताना चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना गुरकित मान सोबत अतूट अशी ३९ धावांची भागीदारी करताना स्वतः १७ चेंडूत नाबाद १८ धावा फटकविल्या.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close