हरियाणाच्या फरिदाबादमधील सिही गावांत राहाणाऱ्या छोट्या चणीच्या आक्रमक मनोवृत्ती असलेल्या राहुल तेवतीयाने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना विंडीजचा जलदगती गोलंदाज सॅल्यूट मास्टर शेल्डन कॉट्रेलला सामन्याच्या निर्णायक क्षणी एका षटकार पाच षटकार ठोकून राजस्थानला अशक्य कोटीतला विजय मिळवून देत एका रात्रीत हिरो बनला.
लाजाळू स्वभावाचा असलेला राहुल एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मला असून त्याचे वडिल फरिदाबाद न्यायालयात वकीली करतात. भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज विजय यादव हा राहुलचा बालपणापासूनचा प्रशिक्षक आहे. सर्व भारतीय पालकांप्रमाणे राहुलचे पालकही तो मोठा खेळाडू बनावा हे स्वप्न बघत होते. किशोरावस्थेत असताना तो नेहमी यजुवेंद्र चहलशी स्पर्धा करायचा. परंतु कोच विजय यादव यांना तो निव्वळ लेगस्पीनरच नाही तर उपयुक्त फलंदाजही बनावा असे वाटत होते. तसे प्रयत्न करून त्यांनी त्याला योग्य तो आकार दिलाही.
राजस्थान विरूध्दच्या सामन्यात ३१ चेंडूत झंझावाती ५३ धावांची खेळी करणारा तेवतीया लहानपणापासून क्रिकेटच्या प्रत्येक क्षेत्रात चंचल होता. त्या वेळेस त्याचे प्रशिक्षक विजय यादव यांनी भाकित केले होते की, हा मुलगा त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे एक दिवस स्टार बनेल. पंजाबविरूध्दच्या निर्णायक खेळीनंतर आरसीबीविरूध्दही १२ चेंडूत २४ धावांची स्फोटक खेळी करत त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तत्पूर्वी आपल्या लेगस्पिन गोलंदाजीच्या बळावर तीन बळी मिळवित चेन्नई सुपर किंग्जवर राजस्थानला सनसनाटी विजय मिळवून दिला.
सुरुवातीपासूनच फलंदाजी पहिली पसंत असलेला राहुल सध्या आयपीएल मध्ये करत असलेल्या करामती बघून त्याचे प्रशिक्षक विजय यादव अजिबात अचंबीत नाहीत. कारण यापूर्वी त्याने याच प्रकारे पंजाबला दोनदा विजय मिळवून दिले होते. आयपीएल जसजसे पुढे सरकू लागले तसतसे त्यातील रंजकता व प्रतिस्पर्धा वाढत चालली आहे. आपलाच संघ बाद फेरीत पोहोचावा असे प्रत्येक खेळाडूला वाटत असल्याने सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी त्यांच्यावर तणाव असल्याचेही जाणवू लागले आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे रविवारी अकरा ऑक्टोबरला हैद्राबाद व राजस्थान यांच्यातील सामन्यात दिसले. या सामन्यात राजस्थानचा राहुल तेवतीया व हैद्राबादचा वेगवान गोलंदाज खलील अहमद यांच्यात चांगलीच चकमक झडली. ते बघून हैद्राबादचा कर्णधार डेव्हीड वॉर्नर व पंचांना मध्यस्थी करावी लागली.
या वादाचं खरं कारण असं होतं की, तेराव्या सत्राच्या २६ व्या सामन्यात रविवारी दुबईत झालेला हैद्राबाद व राजस्थान यांच्यातील सामना उत्कंठावर्धक स्थितीत पोहोचला होता. राजस्थानला जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात आठ धावांची गरज होती. राजस्थानची राहुल तेवतीया व रियान पराग ही जोडी लढत होती. त्या दरम्यान अंतिम षटकाच्या चौथ्या चेंडूवर राहुलने फटका मारून एक धाव घेतली. वॉर्नरने चेंडू अडविला व गोलंदाज खलील अहमदकडे परत दिला. या दरम्यान तेवतीया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करताच खलीलने त्याला अडवून काहीतरी म्हंटले. यावर राहुल नाराज झाला आणि त्यानेही खलीलशी वाद घालण्यास सुरुवात केली. नंतर पंच व वार्नरने प्रकरण मिटवले आणि त्यानंतर पुढच्याच चेंडूवर रियान प्रयागने षटकार मारून सामना जिंकला व वाढू पाहणाऱ्या वादावर पडदा टाकला.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

