तेराव्या आयपीएल सत्राच्या चाळीसाव्या रात्री शारजाच्या छोटया मैदानावर सनरायझर्स हैद्राबाद व राजस्थान रॉयल्स यांच्यात एक महत्वाचा सामना पार पडला या सामन्यापूर्वी हैद्राबाद सातव्या तर राजस्थान सहाव्या स्थानावर होते. परंतु इतिहास व आकडे व परिस्थिती सर्व विरोधात असताना हैद्राबादचा कर्णधार डेव्हीड वॉर्नरने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. तेंव्हा वॉर्नरच्या निर्णयावर सर्वांनी भुवया उंचावल्या होत्या. कारण वार्नरच्या संघाने या सत्रात कधीही धावांचा पाठलाग यशस्वी पार केला नव्हता. शिवाय त्याच्याकडे यावेळी फलंदाजीचा भार वाहणारा केन विल्यमसनही उपलब्ध नव्हता. त्यामुळेमधली फळी आणखीच कमजोर बनली होती.
या सर्व शंकास्पद परिस्थितीत वॉर्नरने प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले. संघात प्रथम स्थान मिळालेल्या वेस्ट इंडियन कर्णधार जेसन होल्डरने अप्रतिम मारा करताना संजू सॅमसन, स्टिव्हन स्मिथ व रियान पराग यांचे महत्वाचे बळी मिळवून राजस्थानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले व राजस्थानला स्वस्तात गुंडाळले.
त्यानंतर सामन्याला कलाटणी देणारी खरी कामगिरी केली ऑस्ट्रेलियाचा पदच्युत कर्णधार व राजस्थान रॉयल्स विद्यमान कप्तान स्टिव्हन स्मिथने. हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल की सनरायझर्स हैद्राबादने जिंकलेल्या सामन्याला राजस्थानचा कर्णधार स्टिव्हन स्मिथने कलाटणी कशी दिली ?
हैद्राबादचा डाव सुरू झाल्या नंतर त्यांचे सलामीवीर जय विरू म्हणून ओळखले जाणारे कर्णधार वॉर्नर व इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बॅरिअस्टो सामन्याच्या पहिल्या दोन षटकातच जोफ्रा आर्चरचे बळी ठरले असताना हैद्राबादच्या तंबूत घबराट पसरली होती व जोफ्रा आर्चर अक्षरशः आग ओकत होता. पंरतु नेमके त्याच वेळेस राजस्थानचा कर्णधार स्मिथने क्रिझवर असलेले दोन्ही फलंदाज नवे व भांबावलेले असताना आर्चरचा भन्नाट मारा बंद करून अनाकलनीय चाल खेळली. नेमके तिथेच सामना त्याच्या हातून गेला. कारण त्यानंतर मनिष पांडे व विजय शंकरने संयमी आक्रमण करत आपले बळी शाबूत ठेवत राजस्थानच्या प्रत्येक गोलंदाजाला फोडून काढत षटकार चौकांराची मैदानभर उधळण केली. ज्या जोफ्रा आर्चरने हैद्राबादची सलामी जोडी झटक्यात बाद केली होती त्याच आर्चरच्या शेवटच्या षटकात विजय शंकरने सलग तिन चौकार ठोकत त्याचीही लक्तरे वेशीला टांगली.
शिवाय स्मिथने संघ निवड करताना अनेक केल्या. जो बेन स्टोक्स आजमितीला जगातला सर्वोत्तम फिनिशर आहे हे सर्व जग जाणत असतानाही स्मिथ स्टोक्सला गेले चार सामने सातत्याने सलामीला पाठवत आहे, व तो सतत अपयशी ठरत आहे. तरीही या सामन्यात त्याला सलामीला पाठवले व तो परत एकदा अपयशी ठरला. तीच बाब जोस बटलरची तो नियमीत सलामीवीर असताना त्याला मधल्या फळीत पाठवत आहे. तो सुद्धा सतत अपयशी ठरत असल्याने राजस्थानचा संघ सोपे वाटणारे सामने हारत आहे. तर जो राहुल तेवतीया तुफान फॉर्मात आहे त्याला फलंदाजीला पाठविण्यास केला जाणारा विलंबही शंकास्पद वाटतो.
याच स्मिथने मागच्या सामन्यात आरसीबी विरुद्ध हातात असलेला विजय शेवटचे दोन षटके कोणाला द्यावे या गोंधळात मोठी चूक केली.जे १९ वे षटक भेदक ठरणाऱ्या जोफ्रा आर्चरला न देता देता जयदेव उनाडकटला दिले व त्याने धावांची खैरात वाटत अंतिम षटकात जेमतेम चार धावांचे रक्षण करण्याचे काम आर्चरवर ठेवले. मात्र जोमातल्या डिव्हीलर्सने सामना सर्वांच्या डोळ्या देखत ओढूण नेला.
हे सहज जिंकू शकणारे दोन सामने हक्काचे चार गुण गमावल्याने राजस्थान रॉयल्सची गुणतालिकेत सातव्या स्थानावर घसरण झाली. त्यामुळे राजस्थानचे या सत्रातील आव्हान जवळ जवळ संपुष्टात आल्यातच जमा झाले आहे आणि या सर्व परिस्थितीला स्मिथचे वेंधळे नेतृत्वच जबाबदार आहे. मागच्या सत्रात विशेष चुका करत नसलेल्या अजिंक्य राहाणे ला कर्णधार पदावरून हटवून राजस्थान रॉयल्स संघ प्रबंधनाने नेमके काय साधले ?

