अहमदनगर । ८ ऑक्टोबर :
युनिसेफ (युनायटेड नेशन्स प्रणित बाल संरक्षण-विकास संघटना ) द्वारे घोषित केलेला ‘आंतरराष्ट्रीय बालिका दिवस’ येत्या ११ ऑक्टोबर रोजी नगर जिल्ह्यात अनोख्या पद्धतीने साजरा होणार आहे. या दिवशी सकाळी ११ वाजता स्नेहालयातील ‘मालाला अभियानाचे’ नेतृत्व करणाऱ्या मुली बालिकांच्या हक्कांची (कोरोना संसर्गाच्या स्थितीत ) सद्य परिस्थिती, त्यांच्या शिक्षणातील अडथळे, आरोग्य ,बालविवाह आणि लैंगिक अत्याचारा चे वाढते प्रकार, यांबद्दल संवेदनशील नागरिकांशी ऑनलाइन खुला संवाद करणार आहेत.उपक्रमाच्या संयोजिका श्रीमती जॉयस कोनोली , कावेरी रोहोकले ,बेबीताई केंगार आणि निक कॉक्स यांनी ही माहिती दिली.
आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचा या वर्षीचा विषय आहे, ‘ माझा आवाज, आपले समान भविष्य’. किशोरवयीन बालिकांच्या संदर्भात एका सुरक्षित आणि विकासपोषक जगाची निर्मिती संदर्भात मुली विचार आणि अनुभव व्यक्त करतील. अन्याय आणि अत्याचार यांचा मुकाबला केलेल्या यशवंत बालिका यावेळी आपले अनुभव खुलेपणाने मांडतील.
नोबेल पारितोषिक विजेत्या बालहक्क कार्यकर्त्या कू. मलाला युसूफझाई यांनी स्थापन केलेल्या" मलाला फंड्स ", या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत स्नेहालय संस्थेने वंचित समूहातील मुलींच्या शिक्षणाबद्दल मागील ५ वर्ष सातत्याने शिक्षण अभियान राबविले. प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यातील झोपडपट्ट्या ,दलित वस्त्या, भटके-विमुक्त समुदाय, अल्पसंख्यांक समाज येथे मुलींसोबत शिक्षण हक्काचे काम केले. स्नेहालय संस्था महिला आणि बालकांच्या शिक्षणाद्वारे सक्षमीकरण करते.
वर्ष २०१९ मध्ये, ‘शिकवा, सक्षमव्हा, नेतृत्व करा’ हे अभियान नगर जिल्ह्यात राबविण्यात आले. जिल्ह्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयातून मलाला अभियानाचे प्रतिनिधित्व’ करणाऱ्या मुलींची निवड करण्यात आली. या अभियानात नेतृत्व क्षमता असलेल्या किशोरवयीन मुलींची निवड करण्यात आली. मुलींचे हक्क-अधिकार, समाजातील स्थान, शिक्षणाचे महत्व, आदी विषयांबद्दल त्यांना प्रशिक्षित करण्यात आले.
स्नेहालय पुनर्वसन संकुल , शहरातील झोपडपट्टीतील स्नेहालयाच्या बालभवन प्रकल्प आणि स्थानिक शाळा - महाविद्यालयातून शिक्षण घेणाऱ्या मुलींनी हे ऑनलाइन संमेलन आयोजित केले आहे.कोरोना साथीत मुलींच्या शिक्षणाची वास्तविकता, त्यांना शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी आणि आव्हाने समजून घेणे , हे या संमेलनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या समस्यांवरील संभाव्य उपाययोजना आणि त्यात नागरी समाजाची भूमिका या कार्यक्रमातून स्पष्ट व्हावी असा प्रयत्न आहे. सकाळी ११ वाजता स्नेहालयचे मानद संचालक डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या बीज भाषणाने उपक्रमाचा प्रारंभ होईल.
या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन किशोरवयीन मुलींना आणि मुलींच्या शिक्षणासाठी धडपडणार्या कार्यकर्त्यांना करण्यात येत आहे. कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी होण्यासाठी https://www.facebook.com/Snehalaya लिंकचा वापर करावा.
सहभागी व्यक्ती मुलींच्या शिक्षण समस्यांवर आपले विचार-सूचना कार्य्राक्रमा दरम्यान कॉमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करू शकतात. इच्छुकांना कु. संगीता सानप यांच्याशी 7620431413 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

