shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बेडशिंग येथील अवचर कुटुंबाला मदतीची अपेक्षा..घर जळाले, संसार उघड्यावर पडला..!!

इंदापूर (१२ ऑक्टोबर) : इंदापूर तालुक्याच्या बेडशिंग गावातील रहिवाशी असलेल्या विष्णू जोतिराम अवचर या शेतकऱ्याचा संसार सध्या उघड्यावर पडला आहे. रविवारी (४ ऑक्टोबर) पहाटे सव्वा पाचच्या सुमारास राहत्या घराला अचानक आग लागली. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नसली तरी, जगण्याची सर्व साधने मात्र भस्म झाली आहेत. सरकारी मदतीची अपेक्षा असली तरी ती कधी, किती आणि कशी मिळणार याची शास्वती देणार तरी कोण?

इंदापूर तालुक्यातील बेडशिंग गावचे रहिवाशी असलेल्या विष्णू जोतिराम अवचर यांच्या राहत्या घराला रविवारी (४ ऑक्टोबर) पहाटे सव्वा पाचच्या सुमारास अचानक आग लागली. काही कळेपर्यंत सर्वकाही भस्म झाले. पती, पत्नी आणि दोन मुले असलेल्या अवचर कुटुंबाचे आगीमध्ये कपडे, कागदपत्रे, वेगवेगळ्या धान्याची पोती, दोन तोळे सोने, भांडी, नवीन घर बांधण्यासाठी काढलेले कर्ज व उसनवारीने आणलेले एकूण एक लाख तीस हजाराच्या रोख रकमेसह अंदाजे चार लाखांचे नुकसान झाले आहे.

लॉकडाऊनमुळे आर्थिक कंबरडे मोडलेल्या या शेतकरी कुटुंबाचे घर आगीत भस्मसात झाल्याने होत्याचे नव्हते झाले आहे, संसार उघड्यावर पडला आहे. बाहेर बांधलेली जनावरे आणि अंगातील कपड्यांशिवाय काहीही उरले नाही. आगीचे नेमके कारणही कळू शकले नाही. सध्या दुसऱ्यांनी दिलेल्या डब्यावर जेवणाचा प्रश्न सुटतोय. शेजाऱ्यांकडून मिळणारी मदत तुटपुंजी आहे. तलाठ्यांनी पंचनाम्यात चार लाखांचे नुकसान नमूद केले असले तरी शासनाकडून दहा वीस हजारांपेक्षा जास्त मदत मिळत नाही असा मोफत सल्लाही दिला आहे. ते देखील शासन कधी देणार याची शास्वती देणार तरी कोण? संकटात सापडलेल्या अवचर कुटुंबाला आता तुमच्या मदतीची अपेक्षा आहे.
close