बीड । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे:-
ग्रामविकास विभागातील भ्रष्ट अधिकार्यांमार्फत उमेद अभियानाची बाह्य संस्थेस विक्री थांबवावी या प्रमुख मागणीसाठी आज दुपारी हजारो महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढून महिलांनी आपला संताप व्यक्त केला. जगण्याची उमेद विकू नका, असेल उमेदचा आधार कमी होईल सावकाराचा भार, महिलांचा अभिमान उमेद अभियान, भिक नको हक्क हवाय अशा घोषवाक्यांचे फलक हाती घेऊन महिला मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्या होत्या. दरम्यान मुकमोर्चा जिल्हा कचेरीसमोर दाखल होताच खा.प्रितमताई मुंडे यांनी मोर्चाला संबोधित करत उमेद अभियानातील महिलांची भुमिका मांडून त्यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टिका केली. कोरोनासाठी निधी नाही. उमेद अभियानासाठी पैसे नाहीत, शेतकर्यांना मदत दिली जात नाही मग सरकारचा पैसा चालला कुठे? असा प्रश्न त्यांनी उपस्थितीत केला.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर आज दुपारी ग्रामविकास विभागाच्या उमेद अभियानातंर्गत हजारो महिलांनी मुकमोर्चा काढला. हातात घोषवाक्याचे फलक घेऊन सहभागी झालेल्या महिला आंदोलकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान राज्यात 2011 पासुन सुरु आहे. महिलांच्या संस्था उभा करणे, बचत गट व प्रभाग संघ या माध्यमातून महिलांची क्षमता बांधणी करणे, आर्थिकदृष्ट्या समावेशन करणे व शाश्वत उपजिविका निर्मित करणे हे चार प्रमुख कार्य पार पाडले जाते. या अभियानातंर्गत राज्यात 4 लाख 78 हजार 204 बचत गट तयार झाले असुन त्यामध्ये 49 लाख 34 हजार 601 कुटूंबातील महिला सहभागी झालेल्या आहेत. सर्व काही अत्यंत पारदर्शकपणे सुरु असतांना अभियानाच्या सीईओनीं 10 सप्टेंबर 2020 रोजी पत्र काढून कर्मचार्यांचे करार पुनर्रनियुक्ती थांबवली. ज्यामुळे अभियानाचे काम ठप्प झाले आहे.
स्वत:च्या फायद्यासाठी काही भ्रष्ट अधिकारी अभियान विक्रीस काढून बाह्य संस्थेकडे देत आहेत. सदरील विक्री थांबवावी, पुनर्रनियुक्ती तात्काळ मिळावी, बाह्य संस्थेला कर्मचारी नियुक्तीचे अधिकार देवू नये, कंत्राटी कर्मचार्यांची सर्व पदे कायम ठेवावी यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.

