shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगर- मनमाड महामार्ग... असंख्य खड्ड्यांमुळे प्रवास ठरू लागलाय जीवघेणा...! ४० कोटीची मंजुरी पण काम केव्हा सुरू होणार...?

अहमदनगर । रमेश जेठे 

नगर :- नगर शहरातून जाणाऱ्या नगर-मनमाड महामार्गावर ठिकठिकाणी  भरावह खड्डे पडले आहेत. अंधारामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत. असंख्य खड्ड्यांमुळे या महामार्गावरील प्रवास जीवघेणा ठरू लागला आहे. नगर शहराच्या हद्दीतून जाणारा नगर-मनमाड महामार्ग अत्यंत खराब होऊन त्यावर काही ठिकाणी  फुट- दोन फुट मोठमोठे खड्डे पडले आहेत. हा राज्य महामार्ग क्र.१० तातडीने दुरूस्ती करण्याची गरज आहे. नगर शहर व नागापूर एमआयडीसीला जोडणारा हा महामार्ग असून येथून दररोज हजारो वाहने जातात. एमआयडीसीमध्ये जाणाऱ्या कामगारांना सुद्धा याच महामार्गाचा उपयोग करावा लागतो.


पत्रकार चौक ते एमआयडीसीपर्यंत अनेक ठिकाणी हा महामार्ग खड्डेमय झाला आहे. नाका, बोल्हेगाव फाटा, अशा विविध ठिकाणीही महामार्गावर खड्डे पडल्याचे विदारक चित्र आहे. त्यामुळे येथून प्रवास करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच रात्रीच्या वेळी या महामार्गावरील बहुतांश पथदिवे नादुरुस्त झाल्यामुळे बंद असतात. त्यामुळे रात्रीच्या अंधारात येथून प्रवास करणे अधिकच जोखमीचे झाले आहे. महामार्गावर असणारे खड्डे, अंधार,पाऊस यामुळे  दररोजच्या अपघातात वाढते प्रमाण  आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून लवकरात लवकर या राज्य महामार्गाची दुरुस्ती करून येथील पथदिवेही सुरू करण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, पावसाळा सुद्धा संपण्यास आला आहे. त्यामुळे तातडीने या महामार्गाचे काम हाती घेण्याची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त करण्यात येऊ लागली आहे.


अवजड वाहतुकीमुळे होताहेत नेहमी अपघात..

रात्रीच्या वेळी नगर-मनमाड महामार्गावर नगर शहरामध्ये प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांची संख्या जास्त असते. ही अवजड वाहने प्रचंड वेगाने महामार्गावरून जात असतात. तर, दुसरीकडे दुचाकीचालक, चारचाकी चालक महामार्गावरील खड्डे चुकवत, कसरत करीत येथून प्रवास करतात. त्यामुळे दुचाकी, चारचाकी
चालकांना महामार्गावरून वेगाने जाणाऱ्या अवजड वाहनचालकांमुळेही धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावर सातत्याने अपघात होत आहेत.

सदर राज्य महामार्गाचा पायाच कच्चा झाला आहे. त्यामुळे फक्त वर वर कितीही खर्च झाला तरी हा महामार्ग दुरूस्त होणे कठीणच आहे. त्यासाठी रस्ता तळापर्यंत उखडून टाकून कायमस्वरूपी काॅन्करीटचा रस्ता बनवण्यात यावा. तरच हा रस्ता कायमस्वरूपी टिकून राहिल.अन्यथा या रस्त्याचा शासकीय अधिकारी,कर्मचारी यांना फक्त दुरूस्तीचा नेहमी नेहमी खर्च दाखवण्यासाठीच फायदा होईल.  प्रवाशांना फारसा फायदा होईल असे वाटत नाही..?

आता सार्वजनिक बांधकाम विभाग, जागतिक बॅंक प्रकल्प विभाग व लोकप्रतिनिधी काय करतात याकडे जनताजनार्दनाचे लक्ष लागून आहे.
close