सावळीविहीर( प्रतिनिधी) :
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था वतीने दिनांक २४ऑक्टोबर पासून सुरु असलेल्या श्रींसाईबाबांची पुण्यतिथी उत्सवाची सांगता आज काल्याच्या कीर्तनानंतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या हस्ते दहीहंडी फोडून झाली. यावेळी प्रतीनुसार रिक्षा जोडी करण्यात आली यापेक्षा जोडी द्वारे 3 लाख 55 हजार 580 रुपये देणगी संस्थांनला प्राप्त झालीआहे.
आज सोमवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी उत्सवाच्या सांगता दिनी पहाटे ०४.३० वाजता काकड आरती, त्यानंतर पहाटे ०५.२० वाजता श्रीं चे मंगल स्नान व शिर्डी माझे पंढरपूर ही आरती झाली. सकाळी ०६.३० वाजता संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे व त्यांची सुविद्य पत्नी सौ.संगिता बगाटे यांच्या हस्ते गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा करण्यात आली.
तर उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे व त्यांची सुविद्य पत्नी सौ.वैशाली ठाकरे यांच्या हस्ते समाधी मंदिरात श्रीं ची पाद्यपुजा करण्यात आली. सकाळी १०.०० वाजता मंदिर कर्मचारी संभाजी तुरकणे यांचे गोपाळकाला कीर्तनानंतर दहीहंडी फोडण्यात आली. त्यानंतर दुपारी १२.१० वाजता श्रीं ची माध्यान्ह आरती झाली. सायंकाळी ०६.०० वाजता श्रीं ची धुपारती तर रात्रौ १०.३० वाजता शेजारती झाली.
श्रीं च्या पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी रुढी परंपरेनुसार आयोजित करण्यात आलेल्या प्रतिकात्मक भिक्षा झोळीत साईभक्तांनी भरभरुन दान दिले. यामध्ये गहु, तांदुळ, बाजरी, ज्वारी, तुरदाळ, मुगदाळ, मसूरदाळ, हरभरा, हरभरादाळ, रवा, शेंगदाणा, गुळ, साखर, शुध्द देशी तुप व खाद्य तेल आदींव्दारे २,८५,२७२/- रुपये व रोख रक्कम ७०,३०८/- रुपये अशी एकुण ३,५५,५८०/- रुपये इतकी देणगी भिक्षा झोळीव्दारे प्राप्त झाली. तसेच श्री पुण्यतिथी उत्सवाच्या औचित्यावर हैद्राबाद येथील साईभक्त सुनिल शहा यांनी १५१५ ग्रॅम वजनाची सुमारे ९१ हजार रुपये किंमतीची चांदीची परडी संस्थानला देणगी स्वरुपात दिली.
हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावर्षी कोरोनामुळे साईभक्तांना मंदिर दर्शनासाठी बंद असल्यामुळे येथे साईभक्तांची दरवर्षाप्रमाणे गर्दी नव्हती, साई पालख्याही आल्या नव्हत्या.

