कारखान्याची केली पाहणी - आयुक्तांपुढे कामकाजाचे सादरीकरण...
शहाजीनगर : दि.१८ नोव्हेंबर २०२०. शहाजीनगर येथील निरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या चालू सन 1920-21 च्या हंगामातील उत्पादित 1लाख 1 व्या साखर पोत्याचे पूजन राज्याचे साखर आयुक्त मा. शेखर गायकवाड व सौं. वंदना शेखर गायकवाड या उभयतांच्या हस्ते आणि कारखान्याचे संस्थापक, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांचे उपस्थितीमध्ये मंगळवारी (दि.17) करण्यात आले. तत्पूर्वी साखर आयुक्तांनी कारखान्याची पाहणी केली.
पोती पूजन कार्यक्रमानंतर कारखान्याच्या एकूण कामकाजाचे, प्रगतीचे व चालू गळीत हंगामातील उद्दिष्टांचे प्र.कार्यकारी संचालक सुधीर गेंगे पाटील यांनी साखर आयुक्तांपुढे सादरीकरण केले. यावेळी मार्गदर्शन करताना मा.शेखर गायकवाड यांनी कारखान्याच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले व अधिकारी वर्गाला काही सूचनाही केल्या. त्यांनी भविष्यकाळात इथेनॉल साखर कारखानदारीला आधार देईल असे भाष्य केले. तसेच साखर उद्योग संदर्भात सतत अपडेट राहिले पाहिजे असे आवाहनही साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले.
याप्रसंगी मा.हर्षवर्धन पाटील यांनी कारखान्याच्या कामकाजाचा आढावा घेतला तसेच साखर उद्योगाच्या सद्यस्थितीचा भाषणात उहापोह केला.यावेळी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, संचालक मंडळ व अधिकारी उपस्थित होते.

