सावळीविहीर( प्रतिनिधी) :
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राहाता तालुक्यातील मुदत संपलेल्या 25 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
राहाता तालुक्यातील बाभळेश्वर, भगवतीपुर, कोल्हार बु., लोणी बु., लोणी खु., ममदापुर, गोगलगांव, हणमंतगाव, नांदुर, पाथरे बु., तिसगांव, आडगांव बु., अस्तगांव, एकरुखे, जळगांव, केलवड, पिंपळवाडी, पिंप्री लेाकाई, रामपुरवाडी, रांजणगांव खु.,वाळकी, सावळीविहीर खु.,शिंगवे, चंद्रापुर व हसनापुर या 25 ग्रामपंचायतींच्या मतदार यादी 25 सप्टेंबर,2020 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. प्रसिध्द करण्यात आलेल्या या मतदार यादीनुसार ग्रामपंचायत वॉर्डनिहाय मतदार यादी 1 डिसेंबर,2020 रोजी ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी सजा, मंडळ कार्यालय, पंचायत समिती व तहसिल कार्यालय येथे प्रारुप यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. यासंदर्भात हरकती व सुचना दाखल करण्याचा कालावधी 1 ते 7 डिसेंबर,2020 असून 10 डिसेंबर,2020 रोजी अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येईल.
राहाता तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीमध्ये 301 सदस्य निवडून द्यायचे असून 163 महिला सदस्य असतील. एकूण 99 हजार 864 मतदार या निवडणूकीसाठी मतदान करणार आहेत. संबधित गावातील नागरिकांनी तसेच मतदारांनी यादीचे अवलोकन करावे असे आवाहन राहाता तहसिलदार कुंदन हिरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. दरम्यान या राहाता तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीची निवडणूक लवकरच होणार असल्यामुळे या सर्व ग्रामपंचायतीच्या गावांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये आता निवडणुकीचे वारे सुरू झाले आहे. अनेक जणानी आतापासूनच या निवडणूकसाठी तयारी सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार मतदार यादी प्रसिद्ध होताच निवडणुकीच्या तयारीला लागले आहे.
त्यामुळे या 25 गावांमधील इच्छुक उमेदवार छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहत असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीचे वारे आता या 25 गावांमध्ये जोरदार सुरू असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. जसजशी थंडी पडू लागली आहे तसे रात्रीच्या ओल्या पार्ट्यानाही या गावांमध्ये आता ऊत आला आहे .मात्र कोरोना संदर्भात कोणीही दक्षता घेताना दिसून येत नसल्याचेही आढळत आहे.

