shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आयपीएल संघ बदलल्यानंतर नेत्रदिपक कामगिरी करणारे खेळाडू..!!



 सन २०२० या वर्षातील नियोजित वेळेत होऊ न शकलेली आयपीएल स्पर्धा उशीराने का होईना युएईत संपन्नतेच्या मार्गावर आहे. कदाचित हा लेख तुमच्या हाती येईपर्यंत आयपीएलच्या तेराव्या सत्राचा विजेताही तुम्हाला माहीती झाला असेल. सन २०२० हे वर्ष " कोरोना व्हायरस वर्ष " म्हणून कायम आठवणीत ठेवले जाईल. या वर्षात कोणीही कल्पना न केलेल्या सनसनाटी घटना घडल्या आहेत. त्याच पार्श्वभूमिवर आयपीएलचे आयोजन करण्यात आले.  आयपीएल मधील सर्वात लोकप्रिय संघ चेन्नई सुपर किंग्जला प्ले ऑफ पूर्वीच आयपीएलमधून गाशा गुंडाळावा लागला. हीच या स्पर्धेतील सर्वात मोठी चुटपूट लावणारी बाब ठरली. कारण चेन्नईने यापूर्वी भाग घेतलेल्या प्रत्येक आयपीएल सत्रात किमान प्ले ऑफ फेरी गाठली आहे.  


चेन्नई नंतर राजस्थान रॉयल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर्सही प्ले ऑफ मध्ये पोहचण्यासाठी सर्व दारूगोळा जवळ असतानाही प्ले ऑफचा भोजा करू शकले नाही. ही देखील या सत्रातील आश्चर्यकारक गोष्ट म्हणावी लागेल. या सत्रात दिल्ली कॅपिटल्सने अंतिम फेरी गाठली. त्यांचा संघ कागदोपत्री जरी प्रबळ दिसत असला तरी त्यांच्या कामगिरीत सातत्य हा प्रकारच नसल्याने त्यांच्या कामगिरीकडे लोक संशयानेच बघत आहेत.

 या सर्व गडबडीत एका गोष्टीकडे फार कमी लोकांचे लक्ष गेले आहे. ती म्हणजे मागील काही सत्रात विशिष्ट फ्रँचाईजी कडून खेळणारे खेळाडू ती फ्रँचाईजी सोडून यंदाच्या सत्रात दुसऱ्या फ्रँचाईजीकडे गेले. त्या खेळाडूंनी नव्या संघात गेल्यानंतर अतिशय अप्रतिम कामगिरी केली. त्यामुळे त्या खेळाडूंच्या कामगिरीकडे बघून जुन्या संघ प्रबंधनाला पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. 

 ज्या खेळाडूंनी नव्या संघाकडून खेळताना  नेत्रदिपक कामगिरी करून जुन्या संघ मालकांना आश्चर्याचा धक्का दिला त्या खेळाडूंविषयी या लेखात जाणून घेऊ या.मागच्या सत्रात किंग्ज इलेव्हन पंजाबचे नेतृत्व करणारा रवीचंद्रन आश्विन संघाची कामगिरी उंचविण्यात यशस्वी ठरला नव्हता व स्वतःही छाप सोडणारी कामगिरी करू न शकल्याने पंजाबने त्याला आपल्या बंधनातून मुक्त केले. मात्र यंदा दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या आश्विनने गोलंदाजीत अतिशय चमकदार कामगिरी करताना १४ सामन्यात १३ बळी घेतले विशेष म्हणजे त्याने अतिशय कंजुष मारा करताना प्रतिस्पर्ध्यांना एकाएका धावेसाठी मोताज केला. हिच त्याची जादूगिरी दिल्लीला अंतिम फेरीचा दरवाजा उघडण्यास फायदेशीर ठरली.

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टोईनस मागील सत्रात रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू कडून खेळला. तेथे त्याला १० सामने खेळण्याची संधी मिळाली. त्यामध्ये त्याला २११ धावा काढता आल्या व गोलंदाजीत केवळ दोन बळी मिळाले होते. त्यानंतर आरसीबीने त्याला रिटेन करण्यास नकार दिला. मात्र दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना त्याच्या कामगिरीत निखार आला. त्याने दिल्लीकडून सोळा सामन्यात ३५२ धावा फटकविल्या व गोलंदाजीत १६ बळी घेतले. स्टोईनसच्या या शानदार कामगिरीच्या बळावर दिल्लीला अंतिम फेरी गाठण्यात यश मिळाले.

 इंग्लंडचा डावखुरा अष्टपैलू खेळाडू सॅम करन मागील सत्रात किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळला. तेथे त्याने ९ सामन्यात दही बळी घेत त्याच्या परीने जोरदार प्रयत्न केले. सॅम नवोदीत असल्याने पंजाबने त्याला रिटेन करणे गरजेचे होते, परंतु पंजाबने त्याला रिलीज केले. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने त्याला खरेदी केले. चेन्नईचा संघ भले या सत्रात अपयशी ठरला, मात्र सॅम करन त्यात सर्वाधीक यशस्वी खेळाडू ठरला. सॅमने १४ सामन्यात १३ बळी घेताना एका अर्धशतकासह १८६ धावाही आपल्या खात्यात जमविल्या. करनच्या या आश्वासक कामगिरीमुळे पुढील सत्रात त्याचे चेन्नई संघातील स्थान पक्के झाले.

 मागील सत्रात दिल्लीकडून खेळणारा न्युझिलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने केवळ पाच बळी मिळविल्याने दिल्लीने त्याला सन २०२० च्या सत्रासाठी त्याच्यावर बोलीच लावली नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सने त्याला खरेदी केले. मुंबईच्या ताफ्यात सामील झाल्यानंतर बोल्टचे नशिब उजळले. मुंबईकडून १४ सामने खेळताना त्याने २२ फलंदाजांना बाद केल्याने मुंबईला सतत दुसऱ्या वेळी अंतिम फेरी गाठता आली.

 मागील सत्रात आपल्या धारदार गोलंदाजीने १४ सामन्यात १९ बळी घेणाऱ्या मोहम्मद शमीला दिल्लीने रिटेन केले नाही. मात्र पंजाबने त्याला संधी देऊन त्याच्यातील अग्नीला फुंकर घातली. याचे फळ म्हणजे पंजाबच्या गोलंदाजीत भेदकाता निर्माण झाली. पंजाबसाठी शमीने १४ सामने खेळताना २० फलंदाजांना बाद करत पंजाबसाठी प्रभावी कामगिरी केली.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close