सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीतला एक सोनेरी क्षण..!!
२४ एप्रिल १९७३ रोजी जन्म झालेला सचिन रमेश तेंडूलकर १६ नोव्हेंबर १९८९ रोजी वयाच्या १६ वर्ष व २०५ व्या दिवशी पाकिस्तान विरोधात कराची येथे पदार्पणाचा कसोटी सामना खेळला. त्यानंतर त्याची महान क्रिकेट कारकिर्द १६ नोव्हेंबर २०१३ रोजी विंडीज विरुध्द मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर थांबली. या २४ वर्षांच्या दिर्घ कारकिर्दीत सचिनच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. परंतु छोटया चणीचा हा महान खेळाडू अनेक खडतर प्रसंगावर मात करून यशस्वी झाला. सक्रिय आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्त झाल्या नंतर सचिनला त्याच्या प्रदिर्घ देशसेवेसाठी भारताचा सर्वोच्च नागरी " भारतरत्न " पुरस्कार जाहीर झाला होता. भारतरत्न मिळविणारा सचिन हा भारताचा पहिला क्रिड़ापटू ठरला. यावरून सचिनच्या शानदार कामगिरीची कल्पना येते.
सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त झाला तेंव्हा फलंदाजीतील असंख्य विक्रम त्याच्या नावावर होते. त्यात प्रामुख्याने सर्वाधिक कसोटी व एकदिवसीय सामने खेळण्याचा विश्वविक्रम, क्रिकेटच्या दोन मोठ्या प्रारूपात सर्वाधिक धावा, शतके, अर्धशतके या महाविक्रमां बरोबरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक करणारा तो जगातला एकमेव द्वितीय खेळाडू बनला. इतकेच नाही त्याच्या बॅटच्या करामती इतकीच किमया गोलंदाजी करताना त्याच्या बोटांनी केली आहे.जेंव्हा विरूध्द संघाचे फलंदाज बाद होत नसत तेंव्हा सर्व प्रयत्न करून थकलेले कर्णधार सचिनच्या हातात चेंडू सोपवायचे व सचिनही आपल्या कर्णधार व संघाला निराश न करता आपल्या गोल्डन आर्मने करिश्मा करायचा. त्याच्या याच जादूई गोलंदाजीने कसोटीत ४६, वनडेमध्ये १५४ असे २०० बळी त्याच्या नावावर आहेत.
सहाशेच्यावर आंतरराष्ट्रीय सामने, ३४ हजारावर धावा, शंभर शतके, दोनशे बळी अशी अफलातून कामगिरी करणारा तो जगातला एकमेव क्रिकेटपटू असून त्याचा हा अखंड विक्रम भविष्यात कोणी मोडू शकेल असा खेळाडू नजरेच्या आसपासही दिसत नाही. बहुदा तसा खेळाडू घडणेही फार अवघड गोष्ट आहे.सचिनच्या या अद्वितीय कामगिरी बरोबरच त्याचे मैदानावरील वर्तन नेहमी सर्वांचा आदर करणारे व संयमी होते. प्रत्येक बिकट प्रसंगी त्याने तोंडापेक्षा आपल्या खेळानेच समोरच्याला प्रत्युत्तर दिले. त्यामुळे त्याच्या निवृत्तीनंतर ७ वर्षांनीही त्याचे नाव आदराने घेतले जाते.
सचिन क्रिकेटच्या मैदानावर अनेक अविस्मरणीय डाव एक फलंदाज म्हणून खेळला. परंतु २४ नोव्हेंबर १९९३ रोजी वयाचे २० वर्ष व ७ महीने असताना त्याने आपल्या अफलातून गोलंदाजीच्या बळावर भारताला एक अशक्यप्राय सामना जिंकून दिला. त्या घटनेला आज २७ वर्ष पूर्ण झाले आहेत. प्रस्तुत लेखात त्याच अविस्मरणीय कामगिरीवर आपण एक सोनेरी नजर टाकूया.
२४ नोव्हेंबर १९९३ या दिवशी कोलकात्याच्या ईडन गार्डनवर हिरो चषकाचा उपांत्य सामना बलाढय दक्षिण आफ्रिका व भारत यांच्या दरम्यान दिवस रात्र खेळला गेला. त्या सामन्यात भारताचा कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीनने ९० धावांची शानदार खेळी केली तरीही दक्षिण आफ्रिकेच्या धारदार गोलंदाजीसमोर भारताचा डाव १९५ धावांवरच गडगडला. त्यामुळे द. आफ्रिकेेसमोर १९६ धावांचे लक्ष होते. द. आफ्रीकेचे ४९ व्या षटका अखेर ८ बाद १९० धावा झाल्या होत्या व अष्टपैलू खेळाडू ब्रायन मॅकमिलन ४८ धावांवर खेळत होता. त्याच्या जोडीला बऱ्यापैकी फलंदाजी करणारा वेगवान गोलंदाज फॅनी डिव्हीलर्स होता. सामन्याचे निर्णायक शेवटचे षटक टाकायला कर्णधार अझहरकडे सक्षम गोलंदाज नसल्याने त्याने तरण्याबांड सचिनकडे मोर्चा वळविला.
पन्नासाव्या षटकाच्या पहील्या चेंडूवर ब्रायन मॅकमिलनने फटका मारला तेंव्हा दुसरी धाव घेताना डिव्हीलर्स धावबाद झाला. त्यानंतर शेवटचा फलंदाज अॅलन डोनाल्डला सचिनने तीन चेंडू ( डॉट ) निर्धाव टाकले. पाचव्या चेंडूवर डोनाल्डने कशीबशी एक धाव काढून मॅकमिलनला स्ट्राईक दिली. शेवटच्या चेंडूवर ४ धावांची गरज असताना मॅकमिलन मोठा फटका मारण्यात अपयशी ठरला. मात्र त्या चेंडूवर एकच धाव निघाल्याने भारत दोन धावांनी विजयी झाले व नवखा सचिन चेंडूच्या जोरावर हिरो बनला. पुढे जात अंतिम सामन्यात भारताने विंडीजला हरवून हिरो कप पटकविला. परंतु सचिनच त्या विजेतेपदाचा खरा हिरो म्हणून पुढे आला.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

