shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आयपीएल मधील प्लेऑफचा इतिहास..!!

बघता बघता तेरावे आयपीएल सत्र केवळ चार सामन्यानंतर समाप्त होणार आहे. कोरोना महामारीच्या काळात भारतापेक्षा काहीशा सुरक्षित असलेल्या संयुक्त अरब अमिरातीच्या वाळवंटात विनाप्रेक्षक सदर सामन्यांचे आयोजन करण्यात आले. ५६ सामन्यांच्या साखळी सामन्यातून चार अव्वल संघ प्ले ऑफसाठी निवडले गेले असून त्यातील दोन सर्वोत्तम अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील व विजेता  संघ तेराव्या आयपीएल सत्राचा चमचमता करंडक उंचावेल.

सन २००८ मध्ये सुरू झालेल्या आयपीएलने सामने खेळविण्याचे अनेक स्वरूपं बघितले. विविध नियमांमुळे आकर्षणाची केंद्र ठरलेल्या आयपीएल मध्ये जगातील कोणत्याही टि-२० लिगच्या तुलनेत सर्वात अगोदर स्ट्रॅटेजिक टाईम आऊट, ऑरेंज कॅप, पर्पल कॅप, तसेच यंदाच्या सत्रापासून तिसऱ्या पंचाद्वारे नोबॉल देण्याची पद्धत सुरू आली. त्यामुळे खेळाची रंजकता आणखीच वाढली.

 याच श्रृंखलेचा एक भाग म्हणजे सेमी फायनल ऐवजी प्ले ऑफ पद्धत सुरू करण्यात आली. सन २००८ मध्ये स्पर्धा सुरू झाल्या नंतर सन २०११ च्या चौथ्या सत्रापासून प्ले ऑफची पद्धत सुरू करण्यात आली. या नव्या नियमामुळे मोठया कष्टाने बाद फेरीत पोहोचलेल्या चारही संघांना योग्य न्याय मिळू लागला व त्यामुळे स्पर्धेच्या विश्वसनीयतेत कमालीची वाढ झाली.

ङप्ले ऑफ म्हणजे काय ? ते आपण जाणून घेवू या. स्पर्धेच्या साखळी सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करणारे चार संघ प्ले ऑफ साठी पात्र ठरतात. प्ले ऑफ फेरी अंतिम सामन्यात खेळणारे संघ निवडते. प्ले ऑफ मध्ये तीन प्रकारे सामने होतात. क्वॉलीफायर-१, एनिमिनेटर व क्वॉलीफायर-२.क्वॉलीफायर १ मध्ये साखळीत गुणतालिकेत अव्वल असलेले दोन संघ आपसांत भिडतात व यातील विजेता थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरतो. त्यानंतर तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर असलेल्या दोन संघात एलिमिनेटर सामना खेळला जातो. यातील विजेता संघ क्वॉलीफायर-२ मध्ये पोहोचतो. तेथे त्याचा सामना क्वॉलीफायर-१ मध्ये हरलेल्या संघाशी होतो. मग यातील विजेता क्वॉलीफायर-१ मधील विजेत्याशी अंतिम सामना खेळतो व त्या सामन्यातून आयपीएलचा नवा विजेता जगासमोर येतो.

 पूर्वीची बाद फेरी व प्ले ऑफची बाद फेरी यातील फरकही आपण थोडक्यात समजून घेऊ या. जुन्या संरचनेनुसार साखळीत अव्वल राहीलेले चार संघ बाद फेरीसाठी पात्र ठरायचे. त्यातील क्रमांक एकचा संघ क्रमांक चारशी तर क्रमांक २ व ३ मधील संघात लढत व्हायची. या सामन्यांना उपांत्य फेरीचे सामने म्हणून संबोधले जायचे, व या दोन सामन्यातील विजेत्या संघात अंतिम सामना होऊन विजेता ठरायचा. या प्रकारात काही संघांवर अन्याय होत असे. परंतु प्ले ऑफची पद्धत सुरू झाल्यापासून अव्वल चार संघांना समान न्याय मिळू लागला. क्वॉलीफायर-१ मध्ये हरलेल्या अव्वल दोन क्रमांकातील संघाला स्पर्धेतील त्यांच्या चांगल्या कामगिरीचे फळ क्वॉलीफायर-२ मध्ये खेळून मिळाल्याने त्यालाही विजेतेपदाचे स्वप्न पूर्ण करता येऊ लागले.

सन २०११ मध्ये सुरू झालेल्या प्लेऑफ नियमानुसार आरसीबी व सीएसके हे दोन संघ अव्वल स्थानी होते तर मुंबई इंडियन्स व केकेआर अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांवर होते. आयपीएलच्या इतिहासातील पहिल्या प्लेऑफमधील पहील्या क्वॉलिफायरमध्ये चेन्नईने आरसीबीला हरवून थेट अंतिम फेरी गाठली. तर एलिमिनेटरमध्ये मुंबईने केकेआरला हरविले. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या क्वॉलीफायरमध्ये आरसीबीने मुंबईला हरवून अंतिम फेरी गाठली. तेथे चेन्नईने आरसीबीला आस्मान दाखवून विजेतेपद पटकविले.

 यंदाच्या आयपीएल सत्रात मुंबई प्रथम स्थानी असून दुसऱ्या क्रमांका वरील दिल्ली सोबत त्यांचा पहिला क्वॉलिफायर सामना होईल तर तिसऱ्या स्थानावरील हैद्राबाद चौथ्या क्रमांकावरील आरसीबीशी एलिमिनेटरमध्ये दोन हात करेल. क्रिकेट रसिकांना याच दोन सामन्यांच्या आधारे क्वॉलिफायर दोन व अंतिम फेरीत पोहोचणारे संघ समजतील.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close