तेरावी आयपीएल स्पर्धा युएईत सुरू असून त्या स्पर्धेचा अंतिम सामना दहा नोव्हेंबरला होऊन यंदाचा विजेता संघ सर्वांना माहिती होईलच. आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या लांबलचक दौऱ्यावर जाणार असून त्या दौऱ्यात तीन वनडे, तीन टि -२० व ४ कसोटी सामने या दौऱ्यात भारताचा संघ खेळणार आहे.कसोटी मालिका ही आयसीसीच्या कसोटी विश्व अजिंक्यपद स्पर्धेचा एक भाग असणार असून या दौऱ्या दरम्यान भारताचा विद्यमान कर्णधार विराट कोहली पत्नीच्या प्रसुती निमित्त मायदेशी परतू शकतो. त्या आशयाची रितसर कल्पना त्याने बीसीसीआयला दिली आहे.
परंतु या आयपीएल स्पर्धेदरम्यान काही खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने त्यांची संघात निवड झाली नाही व काही खेळाडू आयपीएलमध्ये खराब कामगिरीनंतरही निवडले गेले आहेत तर काही खेळाडू नेत्रदीपक कामगिरीनंतरही डावलले गेल्याने वातावरण तापले आहे. प्रस्तुत लेखात ज्या खेळाडूंच्या निवडीमुळे वाद उदभवले आहेत त्यावर एक प्रकाशझोत टाकूया.
भारताच्या सफेद चेंडूच्या संघाचा उप कप्तान व मुंबई इंडियन्सच्या यशाची कमान उंचावर नेणारा रोहीत शर्मा आयपीएल स्पर्धेदरम्यान हॅमस्ट्रिंगमुळे त्रस्त झाल्याने आयपीएलच्या उत्तरार्धातील चार सामने संघाबाहेर होता. त्याच दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. वनडे, टि-२० व कसोटी या तीन पैकी एकाही संघात निवड झाली नाही.
त्याचे कारण बीसीसीआयकडून सदर हॅमस्ट्रिंगची दुखापतच सांगण्यात आली. परंतु रोहीत या सगळ्या घडामोडींच्या काळात आयपीएलचा सनरायझर्स हैद्राबाद विरूध्दचा सामना व पहिला क्वॉलीफायर सामना खेळला. यात भले त्याच्या बॅटने कोणतीही करामत केली नसली तरी त्याने संपूर्ण सामन्यात सुंदर क्षेत्ररक्षण व शानदार नेतृत्व केले. नेमके हेच कारण वादाचे कारण बनले. रोहीत जर खरोखर फिट नसता तर या सामन्यात खेळू शकला असता का ? शिवाय ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या भारताच्या कुठल्याही संघात त्याची निवड का झाली नाही ?
हे प्रकरण भारतीय क्रिकेटमध्ये वादाचा बिंदू ठरू शकतो. यावर एकच पर्याय आहे की, रोहीतला दौऱ्यावर घेऊन जावे व तिथे त्याची पुन्हा फिटनेस टेस्ट घ्यावी मग त्यातील निर्णय सर्वांना मान्य असेल. रोहीत भारताचा सर्वात अनुभवी व महत्वाचा खेळाडू असून त्याच्या निवडी संदर्भात जर कोणतेही राजकारण केले जात असेल तर ते संघाची एकजूट व मनोधैर्यावर दुष्पपरिणाम करू शकतो.
भारताचा अव्वल कसोटी यष्टीरक्षक वृद्धीमान साहामांस पेशींच्या दुखापतीमुळे आयपीएल मधील महत्वाचे एलिमिनेटर व क्वॉलीफायर- २ सामना खेळू शकला नाही. त्याचा मोठा फटका सारायझर्स हैद्राबादला बसला. साहाला साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरूध्द दुखापत झाली होती. तरीही तो मुंबई इंडियन्स विरूद्धचा शेवटचा व त्याच्या संघासाठी महत्वाचा असलेला सामना खेळला होता.
त्या सामन्यात त्याने कर्णधार डेव्हिड वॉर्नरसह नाबाद दिडशतकी सलामी देत संघाला मुंबईला दहा गडी राखून विजय मिळवून देत मोलाची कामगिरी केली होती. त्यानंतर केलेल्या तपासणीत आढळले की त्याची दुखापतग्रेड एकची असून ती ठिक व्हायला चार आठवडे लागतात. जर हीच दुखापतग्रेड -२ ची झाल्यास त्याला नीट व्हायला दोन महिन्या पेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. त्यामुळे १७ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी त्याची उपलब्धता सर्वस्वी बीसीसीआय व निवड समितीवर अवलंबून असेल.
कसोटी संघात यष्टीरक्षक म्हणून असलेल्या रिषभ पंतची कामगिरी गेल्या काही दिवसात व आयपीएलमध्ये समाधानकारक नसल्याने साहाची उणीव मोठया प्रमाणात जाणवू शकते. शिवाय संघासोबत संजू सॅमसन हा दुसरा यष्टीरक्षक असला तरी त्याला कसोटीचा नसलेला अनुभव संघाला आणखी अडचणीत आणू शकतो.
वरूण चक्रवर्ती या मिस्ट्री स्पीनरने आपल्या करामती फिरकीच्या बळावर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या भारताच्या टि-२० संघात स्थान मिळविले खरे पण तोही खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे संघासाठी उपयुक्त ठरेल का ? हा मोठा प्रश्न संघ प्रबंथनासमोर पडला आहे.
सन २०१९ च्या सत्रात किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला मोठी रक्कम देऊन खरेदी केले, मात्र प्रत्यक्षात त्याला एकच सामना खेळायला दिला. यंदाच्या सत्रात केकेआर कडून संधी मिळताच आपल्या फिरकीच्या करामतीने त्याने संघाला चांगले यश मिळवून दिले. परंतु आयपीएल पुर्वीच झालेली त्याची दुखापत उफाळून वर आली. त्यामुळे त्याचा आगामी ऑस्ट्रेलिया दौरा अनिश्चिततेच्या भोवऱ्यात गुरफटला आहे. त्याच्या खांद्याला झालेली लॅबर्म टियर ही दुखापत बरी व्हायला साधारणता सहा आठवडयांचा कालावधी लागू शकतो.
या भल्या मोठया दौऱ्यासाठी निवडलेल्या संघात सलामीवीर पृथ्वी शॉ, यष्टीरक्षक रिषभ पंत, अजिंक्य राहाणे या फॉर्मात नसलेल्या खेळाडूंना निवडून संघ अडचणीत येण्याची शक्यता आहे तर फॉर्मात असलेल्या सुर्यकुमार यादव, ईशान किशन यांना डावलल्याने त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जाण्याची शक्यता आहे.
कोरोना व्हायरसच्या दुष्परिणामाची भिती लक्षात घेऊन संघाने मोठा ताफा चालविला असताना सुर्यकुमार यादव व ईशान किशनला नेले असते तर मोठा आर्थिक बोजा बीसीसीआयवर पडला नसता.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

