shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अंधश्रध्दा धुडकावत मुंबई इंडियन्स ठरली बाजीगर..!!

मुंबई इंडियन्स म्हणजे आयपीएल व आयपीएल म्हणजेच मुंबई इंडियन्स असे म्हंटले तरी वावगे ठरू नये. असे सोदाहरण सिद्ध करून मुंबई इंडियन्सने संपूर्ण क्रिकेट जगतालाच भुरळ घातली आहे. जगातील सगळ्यात भव्यदिव्य क्रिकेट लिग असणारी आयपीएल स्पर्धा तेरा पैकी तब्बल पाच वेळा जिंकून मुंबई इंडियन्सने आयपीएलमधील आपले निर्विवाद वर्चस्व साबीत केले. मुंबई इंडियन्सने गतवर्षी मिळविलेले जेतेपद राखताना चेन्नई सुपर किंग्जच्या पराक्रमाशी बरोबरी करताना आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. 

 मुंबईचा कर्णधार रोहीत शर्मा तथाकथीत आजारातून बरा होऊन सहीसलामत संघात परतल्यानंतर तिसऱ्या सामन्यात आपल्या बॅटने करामत करण्यात यशस्वी झाला. आयपीएल मध्ये दोनशे सामने खेळणारा तो धोनीनंतरचा दुसराच खेळाडू बनला. मात्र त्याने या महोत्ससवी सामन्यात विजय मिळवून धोनीला मागे टाकले. तर आयपीएलमध्ये आपल्या फ्रँचाईजला पाच विजेतेपद मिळवून देणारा तो एकमेवद्वितीय कर्णधार बनला.

 सन २०१३ ला एका नवख्या संघाची जबाबदारी खांद्यावर पडल्यानंतर तरणाबांड रोहीत डगमगला नाही तर त्याने डबल ताकदीने स्वतःमेहनत केलीच शिवाय संघ सहकाऱ्यांना विश्वासात घेत त्यांना सर्वोत्तम कामगिरी करण्यास प्रेरित केले आणि मग त्यानंतर त्याने चमत्कारांची मालिकाच सुरू केली. कर्णधार पदाचा कोणताही अनुभव नसताना आपल्या कर्णधार पदाच्या पहिल्याच वर्षी त्याने संघाला थेट विजेतेपदाची गिफ्ट दिली. त्यानंतर त्याने दर वर्षा आड एक विजेतेपद मिळवित आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्सचा दबदबा निर्माण केला.

सन २०१३, २०१५, २०१७ व सन २०१९ या विषय अंकी वर्षात मुंबईने विजेतेपद मिळविल्याने सर्व क्रिकेट शौकीन, पंडित व खेळाडूत एक संभ्रम म्हणा किंवा अंधश्रध्दा पैदा झाली होती की मुंबईचा संघ विषय अंक असलेल्या वर्षीच विजेतेपद मिळवू शकतो. त्यामुळे या सत्रात सुरेख कामगिरी करून स्पर्धेत अव्वल राहूनही अंतिम सामन्यातील यशाबद्दल सर्वच जण सांशक होते. त्याला सबळ पुरावा म्हणजे सन २०१० मध्ये अंतिम सामन्यात चेनईकडून हार स्विकारावी लागली होती. त्यामुळे सन २०२० या सम अंकी वर्षात मुंबई विजेता ठरणारच नाही असा बऱ्याच जणांचा समज बनला होता. मात्र मुंबईच्या सर्वच खेळाडूंनी प्रामाणिकपणे जोरकस प्रयत्न करत सर्व अंधश्रद्धांना तिलांजली दिली. मुंबईने यंदा सम अंकी वर्षात विजेतेपद मिळविले असले तरी येथे एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते की, मुंबई इंडियन्सवर विषय संख्या जरा जास्तच फिदा दिसते. त्याचं कारण म्हणजे यंदाचं हे आयपीएलचं तेरावं सत्र असून १३ हा अंकही विषम असल्याने मुंबईला विजय मिळाल्याने कोणीही आश्चर्य मानण्याचे कारण नाही. तसेच पुढील वर्ष सन २०२१ खरोखरच विषम अंक असलेले वर्ष असल्याने मुंबई इंडियन्स आपले विक्रमी सहावे विजेतेपद मिळवून विजेतेपदाची अनोखी हॅट्रीक केल्यास नवल नसावे.

आयपीएल म्हणजे आठ संघात खेळले जाणारे महाभारतच असून या महायुद्धात मुंबईला विजय मिळवून देणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या पाच पांडवांच्या कामगीरीवर या लेखात एक नजर टाकूया. मुंबईचा हुकुमाचा एक्का असलेला विचित्र शैलीचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहा या सत्रातही मुंबईच्या यशाचा शिल्पकार ठरला. आपल्या धारदार व अचूक गोलंदाजीच्या बळावर त्याने १५ सामन्यात २७ विरोधी फलंदाजांना बाद करत आपली बादशाहत राखली. बुमराहने यंदा दोन वेळा सामन्यात चार बळी घेण्याचा कारनामा केला.

न्युझिलंडचा डावखुरा जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्टनेही बुमराहच्या बरोबरीने अतिशय तिखट मारा करताना पॉवर प्लेमध्येच विरोधी संघांचे कंबरडे मोडले. तसेच शेवटच्या डेथ ओव्हर्स( हाणामारीच्या ) षटकातही फलंदाजांना जेरीस आणले. मुंबई इंडियन्सकडून पहिलेच सत्र खेळणाऱ्या बोल्टने १५ सामन्यात २५ बळी घेत भल्याभल्या फलंदाजांचे नट बोल्ट ढिले करून मुंबईच्या यशाची पायाभरणी केली.

झारखंडचा तरणाबांड यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनने शानदार फलंदाजी करताना मिळेल त्या नंबरवर खेळत षटकारांची उधळण करत धावांची रास ओतली. भारताच्या कोणत्याही प्रारूपाच्या राष्ट्रीय संघाकडून न खेळलेल्या किशनने या सत्रात मुंबईकडून सर्वाधिक ५१६ धावा फटकविल्या.  चार अर्धशतकांसह १४ सामन्यात ५७ ची सरासरी व १४५ चा स्ट्राईक त्याचा क्लास दाखवून गेलाच शिवाय संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक ३० षटकार मारून त्याने आपली अनोखी ओळख निर्माण केली.

द.आफ्रिकेचा सलामीवीर व यष्टीरक्षक फलंदाज डावखुऱ्या क्विंटन डिकॉकने स्पर्धेच्या सुरुवातीला संघर्ष करत कामगिरीत सुधारणाच केली नाही तर आपल्या कामगिरीचा आलेख शिखरावर नेला. डिकॉकने १६ सामन्यात ३६ ची सरासरी व १४० च्या स्ट्राईक रेटने चार अर्धशतकांसह ५०३ धावा बनविताना स्टंप्सच्या मागेही सुरेख कामगिरी करताना १८ झेल व चार फलंदाज यष्टीचित केले.

सुर्यकुमार यादव या सत्रात मुंबईसाठी खऱ्याखुऱ्या सुर्यासारखा तळपला. त्याच्या मधल्या फळीतील जबाबदार खेळाने सर्वच जण प्रभावित. त्याच्या १६ सामन्यात ४० ची सरासरी, १४५ चा स्ट्राईक रेट व ४ अर्धशतकांसह केलेल्या ४८० धावा फार मौल्यवान होत्या. अंतिम सामन्यात रोहीत शर्माचा बळी जाऊ नये म्हणून त्याने केलेले बलिदान त्याला मोठी वाहवा देऊन गेल्या. परंतु या बलिदानामुळे त्याची या सत्रात ५०० धावा बनविण्याची संधी हुकली. त्यामुळे सर्वच जणांना मोठी चुटपुट लागली.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close