shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतीय क्रिकेटला उज्वल भविष्य असल्याचे संकेत देणारी तेरावी आयपीएल स्पर्धा...!!



            आयपीएलचे तेरावे सत्र कोरोना महामारीच्या सावटाखाली एकदाचे निर्विघ्न पार पडले आणि सर्वानी सुटकेचा निश्वःस सोडला. जवळ जवळ दोन महीने चाललेला हा आयपीएलचा तेरावा महासंग्राम यंदा भारता ऐवजी युएई मध्ये खेळविण्यात आला हे आपल्याला माहितच आहे. 

या स्पर्धेत विजेतेपद मिळविलेल्या मुंबई इंडियन्ससह सर्वच संघानी जुन्या जाणत्या अनुभवी खेळाडूंसह ताजा दमाच्या सळसळत्या रक्ताच्या तरुणांही वाव दिला होता. त्यातील काही खेळाडूंनी संधीचा जोरदार लाभ घेत आपल्या अस्तित्वाची जाणीव क्रिकेट रसिकांसह भारताच्या निवड समितीला करून दिली आणि आश्चर्याची बाब म्हणजे केवळ एवढया याच आयपीएल सत्रातील नेत्रदिपक कामगिरीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्स कडून खेळलेला किमयागार फिरकीपटू वरूण चक्रवर्ती व आपल्या सटीक यॉर्करने भल्याभल्या फलंदाजांची भंबेरी उडविणाऱ्या सन रायझर्स हैद्राबादचा वेगवान गोलंदाज टि नटराजनने आगामी होऊ घातलेल्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघात स्थान मिळविले. 

या दोघांव्यतिरीक्त आणखी काही खेळाडू आहेत की, त्यांच्या या सत्रातील चांगल्या कामगिरीच्या जोरावर त्यांच्यासाठी भारताच्या वनडे, टि-२० व कसोटी या तीन पैकी कमीत कमी एका संघाचे तरी दरवाजे उघडू शकतो. प्रस्तुत लेखात अशाच काही भारताचे भविष्य ठरू पाहणाऱ्या खेळाडूंविषयी जाणून घेऊ या.

मागील ४ ते ५ वर्षांपासून सातत्याने खेळ करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या सुर्यकुमार यादवने या सत्रात आपल्या बॅटने जोरदार हिसका दिला. सुर्यकुमार यादवच्या शैलीदार खेळाने मुंबई इंडियन्सला सामने जिंकून देणारी कामगिरी वारंवार झाल्याने आयपीएल दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या भारतीय संघात त्याचे नाव नसल्याने निवड समितीवर सर्वच स्तरातून सडकून टिका झाली होती. त्यामुळे येत्या काही दिवसात सुर्यकुमार यादव भारताच्या मुख्य संघात दिसल्यास आश्चर्य मानू नका.

सुर्यकुमार यादवने आयपीएलच्या सन २०२० च्या सत्रात ४८०,  सन २०१९ मध्ये ४२४ व सन २०१८ मध्ये ५१२ धावा कुटल्या आहेत. शिवाय रणजी करंडक व भारतातील प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याची कामगिरी दृष्ट लागण्यासारखी आहे.रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू कडून या सत्रात प्रथमच अंतिम संघात स्थान मिळालेल्या वीस वर्षीय सलामीवीर देवदत्त पडीक्कलने धमाकेदार फलंदाजी करताना १५ सामन्यात १२४.८० च्या स्ट्राईक रेटने ४७३ धावा फटकविल्या. त्यामध्ये ५ सणसणीत अर्धधशतके ठोकली होती. विशेष म्हणजे देवदत्त पडीक्कलला आरसीबीने केवळ २० लाखात खरेदी केले होते.

रूण चक्रवर्ती या अदभूत फिरकी गोलंदाजाला सन २०१९ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने मोठी रक्कम देऊन संघात घेतले खरे पण एकच सामना खेळायला देऊन संघातून मुक्त केले. त्यानंतर केेकेआरने ८.४ कोटी रूपये मोजून आपल्या ताफ्यात ओढले. केकेआरच्या विश्वासाची जाणीव ठेवत त्यानेे १३ सामन्यात १७ बळी घेतले. शिवाय दिल्ली विरूध्द २० धावात पाच बळी घेत या सत्रात ५ बळी घेणारा एकमेव गोलंदाज ठरला. शिवाय एकाच सत्रात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला त्रिफळा बाद करणारा एक मात्र गोलंदाज बनला. त्याच्या या शानदार कामगिरीची पावती त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या टि -२० संघात निवड होऊन मिळाली. परंतु त्याचे दुर्देव असे की, आयपीएल मध्ये खेळतानाच त्याच्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याचा ऑस्ट्रेलिया दौरा हुकला.

ऋतुराज गायकवाड या महाराष्ट्राच्या सलामीवीरास चेन्नई सुपर किंग्जने २० लाखात खरेदी केले. परंतु युएईत पोहोचताच तो कोविड -१९ चा शिकार झाला. सुदैवाने या महाभयंकर आजारातून सुखरूप सुटताच त्याने भरकटलेल्या सीएसकेला शेवटी शेवटी विजयी आस्वाद चाखायला देताना सहा सामन्यात ३ अर्धशतकांसह २०४ धावा जमविताना १२०.७१ चा स्ट्राईक रेट राखला. विशेष म्हणजे सीएसकेच्या शेवटच्या तीन विजयांचा शिल्पकार ठरताना तीन सामनावीर पुरस्कारही मिळविले. ऋतुराज गायकवाडचे महाराष्ट्र व भारत अ संघासाठीही प्रदर्शन उल्लेखनीय ठरल्याने भविष्यात तो भारतीय संघात येऊ शकतो.

सुरुवातीच्या दोन सामन्यात दुखापतीमुळे संघात संधी न मिळालेल्या छोटया चणीच्या झारखंडच्या यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने या सत्रात संघात जिथे संधी मिळेल तिथे उत्कृष्ठ कामगिरी बजावली. विशेष म्हणजे कोणाच्या खिजगणतीत नसतानाही त्याने स्पर्धेत सर्वाधिक ३० षटकार ठोकले. या सत्रात त्याने १४ सामन्यात १४५.७६ च्या स्ट्राईक रेजे मुंबई कडून सर्वाधिक ५१६ धावा बनविल्या. सर्वोच्य ९९ धावांची खेळी करताना त्याने चार अर्धशतकेही लगावले. भविष्यात तो कायम अपयशी ठरणाऱ्या निवड समितीच्या लाडक्या रिषभ पंतला भक्कम पर्याय ठरू शकतो.

या शिवाय राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या हरियाणाच्या राहुल तेवतीयाने आपल्या बॅट व बॉलने शानदार खेळ दाखविला.किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणाऱ्या शिडशिडीत बांध्याच्या वेगवान गोलंदाज अर्शदिपने आपल्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

 सनरायझर्स हैद्राबादकडून खेळणाऱ्या वेगवान गोलंदाज टी नटराजनने आपल्या धारदार यॉर्कर्सवर विरोधी फलंदाजांनाच नव्हे तर भारताच्या राष्ट्रीय निवड समितीलाही बोल्ड केले. त्याची फलनिष्पत्ती म्हणजे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचा तो सदस्य आहे.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close