क्रिकेट हा सांघिक व अनिश्चिततेचा खेळ आहे. आयपीएलच्या तेराव्या सत्रात आपण हा अनुभव घेतलाच आहे. ५६ साखळी सामने संपल्यानंतर कोणते चार संघ प्ले ऑफ खेळणार हे स्पष्ट झाले. त्यानंतर प्ले ऑफ मधील अतिशय महत्वाचा पहिला क्वॉलीफायर गुणतालिकेतील दोन अव्वल संघ मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्या दरम्यान दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळविण्यात आला. या सामन्यात जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत पोहोचणार असल्याने दोन्ही संघात चुरशीची लढत होईल अशी प्रत्येक क्रिकेट रसिकाची अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात दिल्लीचा बार फुसका निघाला.
या सामन्यात नाणेफेकीचा कौल वगळता कोणतीही बाब दिल्लीच्या मनासारखी झाली नाही. खेळाच्या सर्वच क्षेत्रात बलाढय असलेल्या मुंबई इंडियन्सने सामन्याच्या पहिल्या चेंडूपासूनच आपले इरादे स्पष्ट केले व शेवटपर्यंत तेच धोरण राबवून त्यांनी दिल्लीला संपूर्ण सामन्यात डोके वर काढण्याची कधीही संधी दिली नाही. त्यामुळे परिणाम व्हायचा तोच झाला. दिल्लीला या एकतर्फी सामन्यात सणसणीत पराभव स्विकारावा लागला. या विजयाने मुंबई इंडियन्स सहाव्या वेळेस अंतिम फेरीत पोहोचली आहे. तर दिल्लीला अंतिम फेरीत पोहोचण्याची आणखी एक संधी उपलब्ध होणार आहे.
कर्णधार रोहीत शर्मा व किरॉन पोलॉर्ड हे महत्वाचे खेळाडू शुन्यावर बाद झाले असले तरी मुंबईने फलंदाजीत आपली दादागिरी कायम राखली तर गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट दुखापतग्रस्त झाला तरी मुंबईने दिल्लीला मोठा पराभव देण्यात कुठलीही कसर सोडली नाही. या चालू सर्वात सत्रात मुंबईचा दिल्लीवरचा हा तिसरा एकतर्फी विजय ठरला.
प्रस्तुत लेखात आपण मुंबईच्या विजयात चमकलेल्या ताऱ्यांविषयी जाणून घेऊ या.
मुंबईचा जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराहने आपल्या धारदार व नियंत्रीत माऱ्याने दिल्लीच्या फलंदाजीचे कंबरडेच मोडून टाकले. त्याने आपल्या चार षटकांच्या कोट्यात केवळ १४ धावा देऊन चार मौल्यवान खेळाडू डगआऊटमध्ये पाठविले. यामध्ये शिखर धवन, श्रेयस अय्यर, मार्कस स्टोईनस व डॅनियल सॅम्स यांचा समावेश होता. बुमराहने धवनला टाकलेला चेंडू इतका अप्रतिम होता की, यावर जगातला कोणताही फलंदाज बाद झाला असता.
भारताच्या राष्ट्रीय संघात प्रवेशाचा प्रबळ दावेदार असलेला यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनने संघाचा घसरलेला डाव सावरत आपल्या आक्रमक फलंदाजीचा हिसका दिल्लीच्या नामांकीत गोलंदाजांना दाखवत अवघ्या ३० चेंडूत नाबाद ५५ धावा ठोकताना ३ षटकार व चार चौकार फटकविले. या सत्रात अवघे बारा सामने खेळणारा किशन यंदाच्या आयपीएल मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज बनला आहे.
सुर्यकुमार यादवने आपल्या फलंदाजीतील सातत्य या सामन्यातही कायम राखताना मुंबईच्या डावाला आकार देत स्वतःची धावसंख्या पाचशेपर्यंत फुगवली. यादवने ३८ चेंडू खेळून ५१ बनविताना सहा चौकार व दोन षटकारांची उधळण केली.चांगल्या सुरुवातीनंतर मुंबईची धावगती घसरतेय असे वाटत असताना दोन सामन्यांच्या विश्रांतीनंतर संघात परतलेल्या हार्दिक पांडयाने आपले कुंगफू पांडे हे रूप पुन्हा एकदा साकारले. फक्त १४ चेंडूच्या अल्पशा खेळात त्याने पाच षटकारांचा वर्षाव करताना नाबाद ३७ धावा टोलविल्या व मुंबईला २०० धावांचा पल्ला गाठून दिला.
मुंबईचा द. आफ्रिकन यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डिकॉकने या सामन्यातही आपला फॉर्म शाबूत ठेवताना दिल्लीच्या गोलंदाजांचा पहिल्या चेंडू पासूनच समाचार घेतला. त्याने २५ चेंडूत आक्रमक खेळत ४० धावा फुटल्या. या दरम्यान त्याने पाच चौकार व एक षटकार मारला.
न्यूझिलंडचा जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्टने या सामन्यात दिल्लीच्या डावातील पहिल्याच षटकात आग ओकणारी गोलंदाजी करताना निर्धाव षटकासह पृथ्वी शॉ व अजिंक्य राहाणे यांना शुन्यावर चालते करत दिल्लीला डोके काढण्याची संधीच दिली नाही. मात्र दुर्देवाने त्याला दुखापतग्रस्त झाल्याने दोन षटकानंतर त्याला मैदान सोडावे लागले. मात्र त्याने करून दिलेल्या शानदार सुरूवातीनंतर मुंबईच्या इतर गोलंदाजांनी दिल्लीला पराभवाच्या खाईत ढकलले.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

