shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आयपीएल मध्ये सहभागी संघाचे प्रशिक्षक घेतात गलेलठ्ठ मानधन..!!

इंडियन प्रिमीयर लिग म्हणजेच आयपीएल स्पर्धा ही जगातील सर्वात लोकप्रिय व मोठी लिग म्हणून गणली जाते. हे आपण सर्वजण जाणून आहातच. या स्पर्धेशी निगडीत प्रत्येक जण मालामाल होत असतो. आयपीएलचे तेरावे सत्र नुकतेच युएईमध्ये संपन्न झाले. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू पॅट कमिन्स हा १५.५ कोटी रुपये कमावून या सत्रातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्यासाठी ही बोली लावली होती. कमिन्स शिवाय अनेक खेळाडू कोटयाधिश झाले तर बरेच नवखे व नवोदित खेळाडू कमीत कमी वीस लाख रुपये कमवून लखपती बनले. इतकेच नाही तर स्पर्धेत सहभागी आठ संघाच्या प्रत्येक सपोर्टींग स्टाफ मेंबरलाही घसघसीत मानधन मिळाले आहे. 

प्रत्येक संघात एक हेड कोच म्हणजे मुख्य प्रशिक्षक असतो. या प्रमुख प्रशिक्षकाला देश विदेशातून आलेल्या खेळाडूंना एक संघ म्हणून एकजीव करायचे व त्यानंतर त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करवून घ्यायची अवघड जबाबदारी असते. त्यामुळे या हेड कोच महोदयांनाही अवघ्या दोन महिन्यांसाठी गलेलठ्ठ मानधन दिले जाते. तर मग चला बघू या कोणत्या प्रशिक्षकाला यंदाच्या आयपीएल सत्रात किती मानधन मिळाले.

 रिकी पाँटींग हा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार. त्याच्या नेतृत्वात कांगारू दोनदा विश्वविजेते बनले. मुंबई इंडियन्सकडून तो एक खेळाडू म्हणूनही खेळला. सक्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर तो मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक बनला. त्याच्या मार्गदर्शनाखाली मुंबई इंडियन्सने सन २०१५ च्या सत्रात विजेतेपद मिळविले. त्यानंतर सन २०१७ मध्ये दिल्ली कॅपिटल्सने त्याला प्रशिक्षक बनविले. त्यांनतर सन २०२० च्या सत्रा अखेर तोच दिल्लीचा प्रशिक्षक होता. त्याच्या अनुभवाच्या जोरावर दिल्लीला प्रथमच अंतिम फेरी गाठता आली. परंतु प्रबळ मुंबई इंडियन्ससमोर दिल्लीची दाळ काही शिजली नाही. तरीही पाँटींग या सत्रात ३.४ कोटींची माया जमवून गेला.

न्यूझिलंडचा माजी यष्टीरक्षक, फलंदाज व यशस्वी कर्णधार असलेला ब्रेंडन मॅकलम एक स्फोटक फलंदाज म्हणून सुपरिचित होता. आयपीएल मध्ये तो केकेआर, कोची टस्कर्स, सीएसके, आरसीबी व गुजरात लायन्स्सकडू खेळला. सन २०२० मध्ये त्याने प्रथमच प्रशिक्षक म्हणून केकेआरची कमान सांभाळली. त्याचा संघ स्पर्धेत अपेक्षित कामगिरी करू शकला नाही तरी त्याच्या गंगाजळीत ३. ४ कोटी रूपये जमा झाले.

ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्रयू मॅकडोनाल्ड हा स्वतः ४ कसोटी सामने खेळला. त्यामध्ये त्याने २१.४० च्या सरासरीने १०७ धावा जमविल्या तर गोलंदाजीत ९ बळी मिळविले. अशी सुमार कामगिरी असतानाही तो सन २०२० च्या सत्रात राजस्थान रॉयल्सचा हेडकोच बनला. शेवटी व्हायचा तोच परिणाम झाला. राजस्थान संघात चांगले खेळाडू असूनही या मॅकडोनाल्ड महाशयांना प्ले ऑफ फेरी राजस्थानला गाठवून देण्यात अपयश आले. तरीही त्याच्या अकौंटमध्ये ३.४ कोटी रुपये जमा झाले.

स्टीफन फ्लेमिंग हा न्यूझिलंडच्या महान कर्णधारांत गणला जातो. सन २००० मध्ये त्याच्याच नेतृत्वात चॅम्पीयन्स ट्रॉफीच्या रूपात न्यूझिलंडला आयसीसीची एकमेव स्पर्धा जिंकता आली. चेन्नई सुपर किंग्जच्या खात्यात त्याच्याच मार्गदर्शनाखाली तीनदा आयपीएल करंडक जमा झाला आहे. मात्र यंदा प्रथमच फ्लेमिंगचे प्रशिक्षण फळास आले नाही, मात्र त्याला त्याचे मानधन ३.४ कोटी रूपये मिळालेच.

आयपीएलच्या पहिल्या दोन सत्रात आरसीबी व पंजाब कडून खेळलेला ऑस्ट्रेलियाचा सायमन कॅटीच एक फलंदाज म्हणून विशेष चमकला नसला तरी सन २०१९ मध्ये तो केकेआरच्या कोचिंग स्टाफमध्ये साहाय्यक प्रशिक्षक म्हणून रुजू झाला. मग सन २०२० मध्ये तो कोहली आणि कंपनीच्या आरसीबीचा मुख्य कोच बनला. तोही आरसीबीचे भाग्य बदलू शकला नाही. तरीही ४ कोटींचा बँक बॅलन्स त्याच्या खात्यात वाढला.

अनिल कुंबळे भारताचा आजवरचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज असून एक खेळाडू म्हणून पहिल्या तीन सत्रात तो आरसीबीकडून खेळला. क्रिकेटपटू म्हणून आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने मुंबई इंडियन्सचे दोन वर्ष प्रशिक्षक पद भूषविले. एक वर्ष भारताच्या राष्ट्रीय संघाचेही प्रशिक्षकपद त्याने भूषविले. सन २०२० त्याने किंग्ज इलेव्हन पंजाबची कमान सांभाळली. परंतु त्याचे चेले बाद फेरी गाठण्यात अपयशी ठरले. तरीही पंजाबने त्याला ४ कोटी रूपये मानधन दिले.

इंग्लंडचा ट्रेव्हर बेलिसने सन २०२० च्या सत्रात सन रायझर्स हैद्राबादचे प्रशिक्षकपद भूषविले. याच ट्रेव्हर बेलिसचे वैशिष्टये म्हणजे तो आयपीएल इतिहासातला एकमेव कोच आहे की, क्रिकेटपटू म्हणून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. याच बेलिसच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडने सन २०१९ चा विश्वचषक जिंंकला. बेलिसच्या ज्ञानाचा फायदा उठविण्यासाठी खास करून जुन्या जाणत्या अनुभवी टॉम मुडीला सनरायझर्स संघ प्रबंंधनाने हटविले. कदाचित सनरायझर्सने दिलेले २.२५ कोटी मानधन बेलिसला रुचले नसल्याने एसआरएच निर्णायक क्षणी कोलमडले.

श्रीलंका संघाकडून कसोटी व एकदिवशीय सामन्यात प्रत्येकी दहा हजारांपेक्षा अधिक धावा काढणारा माजी कर्णधार महेला जयवर्धने सन २०१७, १८, १९ या तिन वर्षी मुंबई इंडियन्सचा फलंदाजीचा प्रशिक्षक होता. तर सन २०२० च्या सत्रात त्याने हेड कोच म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडताना मुंबईला पाचवे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचे मार्गदर्शन केले. मात्र त्याच्या कष्टाचे फळ म्हणून त्याला केवळ २.२५ कोटी रुपये मिळाले.
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close