नेवासा: प्रतिनिधी
प्रशासकीय कामकाज करतांना “डीआयएलआरएमपी” सर्व्हर मधील येत असलेल्या अडचणीमुळे तलाठ्यांची डोकेदुखी वाढली असून मोठा त्रासही सहन करावा लागत आहे कामकाजात ही अडथळे निर्माण होत असल्याने डिजिटल सिग्निचर तहसीलला जमा करणार असल्याचे निवेदन महाराष्ट्र राज्य तलाठी संघ नेवासा यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
याबाबत तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना दिलेल्या निवेदनात तलाठी संघाने म्हटले आहे की डीआयएलआरएमपी सर्व्हर मशीन हे मागील एक महिन्यापासून स्पीड नसल्याने तसेच बहुतांश बंदच असल्याने तलाठी यांच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे,सर्व्हर रोज कार्यालयीन सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत स्पीड हा कमीच असतो कधी कधी तर तो बंदच असतो,त्यामुळे शेतकऱ्यांना सात बारे उतारे देणे शक्य होत नाही,ई फेरफारची कामे ही प्रलंबित आहे.दररोज तेच तेच उत्तर ऐकून खातेदार ही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे तलाठी व शेतकरी यांच्यात वादाची परिस्थिती निर्माण होत असल्याने मंडलाधिकारी व तलाठी हे तणावाच्या स्थितीत आहे.
सर्व्हर स्पीड बाबत वरिष्ठांना कळविण्यात येऊन ही समस्या दूर होण्यासाठी कायमची उपाययोजना करण्यात यावी अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा,निवासी नायब तहसीलदार संजय परदेशी यांना निवेदन देतेवेळी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अहमदनगर उपविभागीय उपाध्यक्ष सोपानराव गायकवाड,नेवासा तालुकाध्यक्ष अनिल गव्हाणे,सरचिटणीस बद्रीनाथ कमानदार उपस्थित होते.


