shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लष्करी भरतीचे रॅकेट उघडकीस; लष्कराच्या कर्मचाऱ्यासह तिघे पोलिसांच्या ताब्यात.

पुणे:-लष्करी भरतीच्या परीक्षेत पास करून देतो म्हणत तरुणांकडून लाखो रुपये उकळून त्यांची फसवणूक करणारे मोठे रॅकेट लष्करी गुप्तहेर विभाग आणि पुणे पोलिसांनी उघडकीस आणले आहे. या प्रकरणात किमान 19 तरुणांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी लष्कराच्या एका कर्मचाऱ्यासह तिघांना ताब्यात घेतले आहे.
वेनसिंग लालासिंग रावत (वय 45 रा. पिंगळे वस्ती, मुंढवा), रवींद्र राठोड (रा. राजस्थान) आणि लष्कराच्या भरती कार्यालयातील कर्मचारी जयदेव सिंह परिहार अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. सदर प्रकरणात अक्षय महेश साळुंखे याच्या तक्रारीवरून वानवडी पोलीस ठाण्यात भा.द.वि. 420, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी या संदर्भातील माहिती दिली. वानवडी येथे होणाऱ्या सैन्य भरतीच्या लेखी परीक्षेत काही मुलांची लाखो रूपयांची फसवणूक करण्याच्या तयारीत काही जण असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांना मिळाली.

त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट दोन व युनिट पाचची दोन पथके तसेच लष्करी गुप्तहेर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळून काल रात्री सापळा लावला आणि वेनसिंग लालासिंग रावत, रवींद्र राठोड आणि लष्करातील हवालदार जयदेव सिंह परिहार यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी करण्यात आल्यानंतर तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली.

हवालदार जयदेव सिंह परिहार यांनी कॅम्प येथील लष्कराच्या कार्यालयात परीक्षेचे हॉल तिकीट घेण्यास आलेल्या त्यातील काहींना हेरून, “माझी लष्करातील मोठ्या अधिकाऱ्यांशी ओळख आहे. मी तुम्हाला पास करून देतो,” असं सांगितलं. तसेच “तुमचे काम झाल्यावर मला प्रत्येकी एक ते दोन लाख द्या,” असं सांगून त्या मुलांची मूळ कागदपत्रे स्वत:च्या ताब्यात घेतली. सिलेक्ट होणाऱ्या मुलांना ठरलेली रक्कम दिल्यानंतरच त्यांची मूळ कागदपत्रे परत केली जाणार होती.

मागील 15 दिवसांपासून मुलांचे लोहगाव या ठिकाणी शिक्षक नेमून क्लास घेण्यात आले. हा सर्व प्रकार ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडून समोर आला आहे. या तिघांची अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
close