shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतीय क्रिकेटमधील हे पाच पांडव ऑस्ट्रेलियात यशस्वी ठरतील ?

कोरोना व्हायरसच्या जीवघेण्या प्रकोपाच्या कालावधीतच नऊ महिन्यांच्या मोठया अंतराने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी भारताचा संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. दोन महिने चालणाऱ्या या भरगच्च दौऱ्यात भारत प्रत्येकी तीन एक दिवसीय सामने व टि -२० सामने खेळणार असून सफेद चेंडूच्या खेळानंतर विश्व अजिंक्यपदासाठीच्या श्रृंखले अंतर्गत ४ कसोट्यांची मोठी मालिकाही भारत ऑस्ट्रेलियाविरूध्द खेळणार आहे.

 येत्या २७ नोव्हेंबरला एकदिवसीय सामन्याने दौऱ्याला अधिकृत दौऱ्याला सुरूवात होईल. सन २०१८-१९ मध्ये भारताने जेंव्हा ऑस्ट्रेलियाचा दौरा केला तेंव्हा वनडे मालिकेत भारताने बाजी मारली होती, तर कसोटीत भारत प्रथमच ऑस्ट्रेलियात मालिका जिंकण्यात यशस्वी झाला होता. त्या दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेबाबत चर्चा करायची ठरले तर एक बाब लक्षात येईल की ती मालिका भारत २-१ असे जिंकले होते. 

त्या मालिकेत भारताकडून महेंद्रसिंग धोनी. रोहीत शर्मा, विराट कोहली व यजुवेंद्र चहल यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. परंतु यंदा परिस्थिती वेगळी असून धोनी निवृत्त झाला तर रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याने संघाबाहेर आहे. अशा परिस्थितील भारतीय क्रिकेटमधील खाली चर्चा करणार असलेले पाच पांडव भारताला मागच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात कितपत सहाय्य करतात हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

तेराव्या आयपीएल सत्रात दिल्लीला अंतिम फेरीत पोहचविण्यात महत्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या डावखुऱ्या शिखर धवनला यंदा रोहीत शर्माच्या अनुपस्थितीत महत्वाची भूमिका साकारावी लागणार आहे. या आयपीएल सत्रात धवनने १७ सामन्यात ४४ च्या सरासरीने २ शतके व ४ अर्धशतकांसह ६१८ धावा बनविल्या होत्या. त्याच्याकडून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत अशाच कामगिरीची अपेक्षा तमाम क्रिकेटप्रेमींसह भारतीय संघाची असणार आहे.

भारताचा कोणता खेळाडू जर सर्वात जास्त फॉर्मात असेल तर तो आहे यष्टीरक्षकाची नवीन भूमिका साकारणारा फलंदाज लोकेश राहुल. तेराव्या आयपीएल सत्रात १४ सामन्यात ६७o धावांसह मानाची ऑरेंज कॅपही त्यानेच पटकविली आहे, शिवाय मागच्या न्यूझिलंड दौऱ्यात त्याने चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात त्याची कामगिरी कशी घडते यावरही भारताच्या यशाचे गणित अवलंबून असेल.

सन २०२० च्या सुरुवातीला न्यूझिलंड दौऱ्यात अपयशी ठरलेला भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहने आयपीएलच्या तेराव्या सत्रात सर्वच विरोधी संघांचे बारा वाजविताना सटीक यॉर्कर व गोलंदाजीत आणलेल्या वैविधतेने १५ सामन्यात १५च्या इकॉनॉमी रेटने २७ बळी घेत मुंबई इंडियन्सला विक्रमी पाचव्यांदा अजिंक्य बनविले. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील जलदगती खेळपट्टयांवर तो यशस्वी व्हावा अशीच तमाम भारतीयांची अपेक्षा असणार आहे.

यजुवेंद्र चहल हा भारताचा प्रमुख फिरकी गोलंदाज असून नुकत्याच झालेल्या आयपीएल सत्रात आरसीबीचे प्रतिनिधीत्व करताना १५ सामन्यात २१ बळी घेत सर्वाधिक बळी घेणाऱ्यांत पहिल्या पाच गोलंदाजात त्याचा समावेश होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियात त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असणे साहजिकच आहे.

धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सन २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात न्यूझिलंडविरुद्ध खेळल्यानंतर दुखापत ग्रस्त झाला होता त्यानंतर तो प्रथमच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात सफेद चेंडूच्या खेळासाठी निवडला आहे. गोलंदाजी टाकण्या इतपत त्याची फिटनेस नसल्याने कसोटी संघात त्याचा समावेश नाही.  याच हार्दिकने सन २०२० च्या आयपीएलमध्ये विजेत्या मुंबई इंडियन्ससाठी अनेकदा सामना जिंकून देणारा खेळ केल्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो आशेचा केंद्रबिंदू बनला आहे.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close