शुक्रवारी रात्री अबुधाबीच्या शेख जायेद स्टेडीयमवर तेराव्या आयपीएल सत्रातील एलिमिनेटरचा एक अतिशय महत्वपूर्ण सामना सनरायझर्स हैद्राबाद व रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू यांच्यात खेळविण्यात आला. या सामन्यातील विजेता संघ दुसऱ्या क्वॉलीफायरमध्ये भिडून अंतिम फेरी साठी पात्रा ठरणार आहे. त्यामुळे या एलिमिनेटर सामन्याला अतिविशेष महत्व प्राप्त झाले होते.
साखळीत स्पर्धेच्या पूर्वार्धात चांगल्या पैकी खेळ करून आरसीबी सात विजयासह १४ गुण मिळवून प्ले ऑफ मध्ये पोहोचण्याच्या काठावर आले होते. पण नंतरच्या पाच सामन्यातील चार पराभवाने त्यांचे प्लेऑफचे स्वप्नही अधांतरी लटकले होते. परंतु नशिब बलत्तर म्हणून की काय ? त्यांचा निकटचा प्रतिस्पर्धी कोलकाता नाईट रायडर्सपेक्षा धावगती थोडीसी सरस असल्याने आरसीबीला प्ले ऑफचे चार नंबरचे सिट मिळाले. परंतु एलिमिनेटरमध्ये त्यांची गाठ पडली शेवटचे ४ सामने जिंकून प्ले ऑफ फेरी गाठणाऱ्या जिगरबाज खेळ करणाऱ्या वॉर्नर सेनेशी.
एलिमिनेटरमध्ये नाणेफेकीपासूनच आरसीबीच्या विरोधात घटना घडायला लागल्या व शेवटी सामन्याचा निकालही विरोधातच गेल्याने विराट सेनेला चालू आयपीएल सत्रातील आपला गाशा गुंडाळावा लागला. आरसीबीचा कर्णधार विराट कोहली गेली आठ वर्षापासून आरसीबीचं नेतृत्व करत असून तोच एकमेव असा कर्णधार आहे की, इतके वर्ष नेतृत्व करूनही आपल्या फ्रॅन्चाइजला विजेतेपद मिळवून देऊ शकला नाही. त्याच्या बरोबरीने चेन्नई व मुंबईचे नेतृत्व करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने तीनदा तर रोहीत शर्माने विक्रमी चार वेळा मुंबई इंडियन्सला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले आहे.
वास्तविक कोहली भारताच्या राष्ट्रीय संघाचा विद्यमान कर्णधार असताना त्याच्याकडे अनुभवाची कुठलीही कमतरता नाही व सोबत त्याच्या मनपसंद संघ असताना तो धड भारताला आयसीसीचे विजेतेपद मिळवून देऊ शकत नाही ना आरसीबीला आयपीएलचे !
सध्या त्याची नेतृत्व करण्याची पद्धत बघता त्याला जास्त काळ आरसीबी आपल्या संघाची कमान देईल असे वाटत नाही. कारण आयपीएल सुरू होऊन तेरा वर्ष लोटले असले तरी तीनदा अंतिम सामन्यात जाऊनही त्यांना विजेतेपद मिळविता येऊ नये ही मोठी दुर्देवाची बाब आहे. विशेष म्हणजे शेवटचे आठ वर्ष कोहली महाशय कर्णधार असल्याने संघाच्या अपयशाची नैतिक जबाबदारी कोहलीचीच आहे.
विराट कोहलीला त्याची फ्रँचाईजी लिलावात संघ निवडताना हवी ती मुभा देते. तो त्याच्या आवडीनुसार संघ निवडतो मात्र त्याचा मनमानी स्वभाव त्या खेळाडूंना त्यांच्या मर्जीनुसार खेळ करण्यास मुभा देत नसल्याने व कोहली सामन्यात खेळण्यासाठी परिस्थितीला अनुसरून संघ निवडत नाही व संघात घेतलेल्या खेळाडूंना त्याच्या मर्जीनुसार खेळवत असल्याने आरसीबीला अद्यापही आयपीएलमध्ये यशस्वी होता आले नाही.
त्यातच तो स्वतःही त्याच्या फलंदाजीच्या क्रमवारीत धरसोडपणा करत असल्याने संघाला हवी तशी धावसंख्या गाठण्यात अडचणी येतात. आरसीबीची फलंदाजी केवळ स्वतः कोहली व एबी डिव्हीलर्स या दोघांवरच अधारीत असल्याने आरसीबीची फलंदाजी या दोघांच्या अपयशानंतर उघडी पडत गेली व त्याचा सर्वात मोठा परिणाम या सत्रातही विजेतेपदाविना त्यांना आयपीएलमधून मोकळ्या हाताने परतावे लागण्यात झाला.
कोहली संघ निवडण्याची हीच पद्धत भारताचा संघ निवडतानाही राबवत आहे. गेली काही वर्षापासून सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या सुर्यकुमार यादव, ईशान किशन यांना डावलून खोगीर भरती सिद्ध झालेल्या रिषभ पंतला तो पाठीशी घालत आहे. मधल्या फळीत सुर्यकुमार यादव चपखल बसत असताना त्याला जाणून बुजून न निवडण्याचे राजकारण नेमके कोण खेळतोय ? हेही न समजण्यापलीकडचे झाले आहे.
विराट कोहलीचा असाच मनमानी कारभार चालू राहीला तर त्याच्या नेतृत्वात ना आरसीबी आयपीएल जिंकू शकेल ना भारत आयसीसीच्या स्पर्धेत विश्वविजेता बनू शकेल. तेंव्हा आरसीबीच्या मॅनेजमेंटने कोहलीला नारळ देऊन भविष्यात त्यांना आयपीएल करंडक मिळवून देईल असा तरणाबांड व होतकरू कर्णधार नेमावा. तसेच आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जर कोहली नेतृत्व गुणात कमी पडून भारताला पराभव चाखावा लागल्यास कोहली ऐवजी आयपीएलचा विक्रमी विजेता कर्णधार रोहीत शर्माकडे भारतीय संघाची कमान देण्यास काही हरकत नाही. कारण रोहीत भारताचा आजवरचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेल्या महेंद्रसिंग धोनी सारखाच शांत, संयमी व थंड डोक्याने निर्णय घेणारा कर्णधार असून त्याच्या नेतृत्वात भारत नक्कीच आयसीसीच्या विश्वचषक स्पर्धांचे विजेतेपद मिळवू शकेन.
त्याचबरोबर आरसीबीच्या संघ प्रबंधनाने तत्काळ कोहलीचे नेतृत्व काढून एखादया होतकरू खेळाडूला त्याच्या जागी नेमावे यातच आरसीबीचे यश सामावले असेल.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

