खर्डा । प्रतिनिधी :
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे
दारू पिण्यासाठी घेऊन गेलेला एका मित्राने दुसऱ्या मित्राला इतर साथीदारांच्या मदतीने लुटण्याचा धक्कादायक प्रकार खर्डा या ठिकाणी घडला.या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मित्राने दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलिस स्टेशनला तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामखेड पोलीस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील खर्डा येथील फिर्यादी सुभाष अर्जुन गोलेकर वय ५० हा रविवार दिनांक 22 रोजी गोलेकर वस्तीवरून गावात कामानिमित्त आला होता. यावेळी आरोपी भगवान निवृत्ती जोरे हा त्याचा मित्र भेटला व त्याने फिर्यादीस दारू पिण्यासाठी येण्याचा आग्रह धरला त्यामुळे फिर्यादी व आरोपी हे दोघे मित्र मोटरसायकलवरून खर्डा गावाबाहेर भुम रोडवरील फारुख धाब्याच्या पाठीमागे पटांगणात दारू पिण्यासाठी बसले त्यानंतर काही वेळाने आरोपी बाजूला जावून कोणालाही तरी अज्ञात इसमाला फोन करून त्या ठिकाणी बोलावून घेतले.
त्या ठिकाणी आलेल्या अज्ञात इसमाने हातातील कसल्यातरी टणक वस्तूने फिर्यादी सुभाष गोलेकर यांच्या डोक्यावर मारहाण केली व गंभीर जखमी केले त्यानंतर आरोपी असलेला त्याचा मित्र भगवान निवृत्त जोरे यांनी त्याच्या छातीवर बसून फिर्यादीची 80 हजार रुपयांची सोन्याची चैन हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला हा गंभीर जखमी झाल्याने शुद्धीवर आल्यावर सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानुसार पोलिस पथकातील पोलिस उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा पोलीस हेड कॉन्स्टेबल नवनाथ भिताडे, कॉ. मनोज साखरे ,संजय लाठे,साई मस्के, बाजीराव सानप यांच्या पथकाने तातडीने ताब्यात घेतले असून इतर दोघाजणां विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी आरोपी भगवान जोरे यास अटक केली असून पुढील तपास प्रभारी पोलिस निरीक्षक महेश जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा हे करत आहेत.

