shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

'देवमय' या काव्यसंग्रहाचे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते प्रकाशन..!!



इंदापूर । प्रतिनिधी
इंदापूर (२४ नोव्हेंबर) : इंदापूर शहरातील  सेवानिवृत्त शिक्षक प्रा. महादेव चव्हाण यांनी लिहिलेला 'देवमय' हा काव्यसंग्रह महाराष्ट्र शासनाने नुकताच प्रकाशित केला. ८ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते राळेगणसिद्धी येथे करण्यात आलेले हे प्रकाशन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पध्दतीने पार पडले. या आधीही त्यांची २ पुस्तके महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केली असून, आणखी २ पुस्तके प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहेत.


कष्टातून शिक्षण घेणाऱ्या युवकांना आपले जीवन बदलून टाकण्याची प्रेरणा 'देवमय' या ग्रामीण बोलीभाषेत असणाऱ्या काव्य संग्रहातून मिळणार आहे. जीवनातील विविध टप्पे अपार कष्टातून पार करणाऱ्या एका सामान्य माणसाला आयुष्यात येणारे कटू अनुभव काव्यसंग्रहाचे लेखक प्रा. महादेव चव्हाण यांनी स्वतःच्या जीवनातील अनुभवाच्या माध्यमातून मांडण्याचा सुरेख प्रयत्न केला आहे. खडतर आयुष्य जगत असताना जीवनातील परिस्थितीचा, संस्कृतीचा, माणसामाणसांतील सहसंबंधांचा विचार काव्य संग्रहात त्यांनी व्यक्त केला आहे.

सर्व मानव एकाच माता पित्याची लेकरे आहेत. आणि सर्वांचा निराकार असणारा निर्माताही एकच असल्याच्या विचारातून प्रेरित इंदापूर शहरातील  असणारे प्रा. महादेव चव्हाण यांनी, जीवनाच्या खडतर प्रवासात सुख आणि दुःखात ज्या लोकांनी साथ दिली अशा लोकांना हा काव्यसंग्रह समर्पित केला असून, महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला हा काव्यसंग्रह वाचकांसाठी अवघ्या १५० रुपयांत उपलब्ध करून दिला आहे. तर स्नेहवर्धन प्रकाशनाकडे हा काव्यसंग्रह विक्रीसाठी उपलब्ध आहे.

ग्रामीण भाषेत असणाऱ्या या काव्यसंग्रहातील सर्वच कविता उत्कृष्ट आहेत, मात्र कारभारी, नवलाई, प्रेरक या कविता वाचकांना अधिक आकर्षित करतात. तर 'अंगारमाती' या कवितेत कोरोना सारख्या महामारीचे वास्तविक चित्रण करताना या महामारीला मनुष्यच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याआधी त्यांची, शाळेच्या आठवणी (आत्मचरित्र), रानमाळ (ग्रामीण कादंबरी) ही पुस्तके महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केली आहेत, तर ईर्षा (ग्रामीण कथासंग्रह), जावे त्यांच्या गावा (प्रवासवर्णन) ही पुस्तके प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहेत.
close