विद्याधर साळवे , राजगुरूनगर प्रतिनिधी ,
दि.०२-११-२०
राजगुरुनगर (ता.खेड) येथील रामभाऊ देवकर निर्मित व वळणवाट फिल्म्स प्रस्तुत " आयुष्य एक खडतर प्रवास..." या लघुपटाला रोशनी इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल 2020, औरंगाबाद येथे प्रथम मानांकन मिळाले आहे.
खेड तालुक्याच्या ग्रामीण भागातील स्थानिक कलाकार व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन राजगुरुनगर येथील रामभाऊ देवकर यांनी " आयुष्य एक खडतर प्रवास..." हा लघुपट तयार केला. वळणवाट फिल्म्स प्रस्तुत या लघुपटा मध्ये व्यसनमुक्ती हा विषय घेण्यात आला असून व्यसनाचे सामाजिक दुष्परिणामांचे चित्रण या लघुपटात दाखविण्यात आले आहे. हा लघुपट व्यसनमुक्तीवर प्रकाश टाकणारा असून व्यसन मुक्ति या सामाजिक विषयावर हा लघुपट झणझणीत डोळ्यात अंजन टाकणारा ठरला आहे. या लघुपटातील बालकलाकार तनिष्का सातकर हिला उत्कृष्ट बालकलाकारांचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
खेड तालुक्यातील शिवे गावात या लघुपटाचे संपूर्ण चित्रीकरण झाले असून या कामी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवे व ग्रामपंचायत शिवे यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे रामभाऊ देवकर यांनी सांगितले. या लघुपटासाठी सचिन बांगर, अमृता उत्तरकर, जिंदा शेख, मयुर मोरे, अमित बोंबले, सहाणे, वैभवी पोतदार, प्रशांत शेटे, अमर लष्करे, शिवाजी थिटे या कलाकारांनी परिश्रम घेतले. खेड तालुक्याच्या ग्रामीण भागातील कलाकारांनी परिश्रम घेऊन बनविलेल्या या लघुपटास रोशनी इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल 2020.औरंगाबाद, येथे प्रथम मानांकन मिळाल्यामुळे व राजगुरुनगर येथील बालकलाकार तनिष्का सातकर हिला सर्वोत्कृष्ट बालकलाकारांचा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे संपूर्ण खेड तालुक्यात या लघुपटाच्या टीमचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
------------------------------------------------------------------------------------------------

