तेराव्या आयपीएल सत्रात चेन्नई सुपर किंग्जला, कोरोना व्हायरस, सुरेश रैना, हरभजनसिंग या महत्वाच्या खेळाडूंची अनुक्रमे संघ सोडणे व संघात सामील न होणे, सुरुवातीला अंबाती रायडू व नंतर ड्वेन ब्राव्हो सारख्या खेळांडूना दुखापती व सततच्या पराभवाने ग्रासल्याने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. शेवटी काही सामन्यात त्यांनी विजय मिळवून आपली साख राखण्याचा प्रयत्न केला. परंतु स्पर्धेतून बाहेर होण्यापासून रोखण्यास न्यांना कोणीही रोखू शकले नाही.
चेन्नईच्या या पडझडीत दोनच खेळाडू विशेष चमक दाखवू शकले. त्यापैकी एक होता इंग्लंडचा सॅम करण व दुसरा भारताचा ऋतुराज गायकवाड. सॅम करण इंग्लंडकडून नियमीतपणे खेळत असल्याने त्याच्याकडून त्या अपेक्षा होत्याच. तर ऋतूराज गायकवाड हा भारताकडून कुठल्याही अधिकृत मग ते कसोटी, वनडे व टि -२० सामन्यात खेळलेला नाही. शिवाय या चालू सत्राच्या सुरुवातीलाच कोरोना व्हायरसने त्यालाही घेरले होते. आजारातून बरा होऊन सुखरूप परतल्यानंतर चेन्नईने त्याला सुरुवातीचा काही सामन्यात संधी दिली नाही. ज्या तीन सामन्यात त्याला संधी मिळाली त्या सामन्यात विशेष प्रभाव पाडू शकला नाही. त्यानंतर त्याला अंतिम अकरा जणांच्या संघातून वगळले गेले. यानंतर ऋतूराजने तंदुरुस्तीसह सरावाने खेळात निखार आणत पुन्हा संधी मिळताच तिचे दोन्ही हातांनी स्वागत करतच सोनेही केले.
कोविड-१९ वर यशस्वी पणे मात केलेल्या ऋतूराजने तेराव्या आयपीएल सत्रात उत्तरार्धात आरसीबी, केकेआर व पंजाब विरूध्द सलग तिन अर्धशतके ठोकून राष्ट्रीय संघाकडून अद्यापही संधी न मिळालेल्या खेळाडूंतर्फे अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू बनण्याचा बहुमान मिळविला.
तेराव्या आयपीएल स्पर्धेतून चेन्नई भले बाहेर गेले असले तरी ऋतूराजने आपल्या खेळाने छाप सोडली आहे. त्याने खेळलेल्या पाच सामन्यात पंजाबविरुद्ध नाबाद ६२ करताना चेन्नईला अनपेक्षित विजय मिळवून देत पंजाबला या आयपीएल सत्रातून गाशा गुंडाळण्यास भाग पाडले. या सत्रात भारताबाहेर (युएई ) सुरेख खेळ करणाऱ्या ऋतूराज गायकवाडचं भवितव्य कुठलंही राजकारण झालं नाही तर उज्वल दिसतं.
उजव्या हाताने शैलीदार फलंदाजी करणाऱ्या ऋतूराज गायकवाडचा जन्म ३१ जानेवारी १९९७ रोजी झाला. ऋतूूराजची आई व्यवसायाने शिक्षिका असून वडिल डीआरडीओ मध्ये अधिकारी आहेत. खेळाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या मोठ्या संयुक्त कुटुंबात तो वाढला आहे.सहा ऑक्टोबर २०१६ रोजी त्याने आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेटचा श्रीगणेशा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून केला. २ फेब्रुवारी २०१७ रोजी राष्ट्रीय टि २० स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळायला सुरुवात केली. "लिस्ट ए" क्रिकेटला २५ फेबूवारी २०१६ रोजी विजय हजारे स्पर्धेत महाराष्ट्रासाठी खेळून केली.
ऑक्टोबर २०१६ रोजी तो देवधर करंडक स्पर्धा खेळला. त्यानंतर २०१८ -१९ मध्ये भारताच्या ब संघात त्याची निवड झाली. डिसेंबर २०१८ मध्ये एसीसी इमर्जिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात संधी मिळाली. सन २०१८ च्या डिसेंबर महिन्यात आयपीएल लिलावात सन २०१९ च्या सत्रासाठी चेन्नई सुपर किंग्जने २० लाख रुपयांच्या बेस मनीवर खरेदी केले. वास्तविक त्या सत्रात त्याला प्रत्यक्ष अकरा जणांच्या अंतिम संघात संधी मिळाली नाही. परंतु तेथील अनुभवाचा लाभ उठवत रणजी स्पर्धेत महाराष्ट्राकडून व भारताच्या अ संघाकडून खेळत धावांचा रतीब घातला.
भारत अ संघाकडून खेळताना त्याने ' श्रीलंका - अ ' व 'वेस्ट इंडिज -अ संघाविरूध्द उत्कृष्ठ कामगिरी बजावली. त्या सत्रात त्याने ११२.८३ च्या सरासरीने ६७७ धावा बनविताना ११६.७२ चा स्ट्राईक रेट राखला.नाबाद ८७, नाबाद १२५, ९४, ८४, ७४, ३, ८५, २०, व ९९ धावांच्या खेळ्या साकारून त्याने निवड समितीच्या दारावर जोरदार दस्तक दिली.
ऑक्टोबर २०१८ च्या देवधर करंडक स्पर्धेत भारत ब संघाकडून तो निवडला गेला होता. डिसेंबर २०१८ मध्ये इमर्जींग टिम आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाचा सदस्य होता.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

