सन २०१३ चे आयपीएल सत्र मुंबई इंडियन्सच्या दिल्ली कॅपिटल्सवरील एकतर्फी व धमाकेदार विजयाने युएईमध्ये हर्षोषोल्हासात संपन्न झाले. जीवघेण्या कोविड-१९ च्या संसर्गाचे सावट असलेल्या या स्पर्धेने प्रेक्षकांविना सामने खेळण्याचा साहसी प्रकारही यशस्वी ठरला. दूरचित्रवाणीच्या माध्यमातून जगभरातील कोट्यावधी क्रिकेटप्रेमींनी या स्पर्धेच्या थेट प्रक्षेपणाचा आनंद लुटला. तेराव्या आयपीएल सत्रातील आठ सहभागी संघांनी या स्पर्धेपूर्वीच संघात देश विदेशातले मातब्बर खेळाडू आपापल्या संघात घेऊन आपली बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी खेळाडूंवर कोटयावधी रुपयांच्या बोल्या लावून लिलावात खरेदी केले. प्रत्यक्ष संघात अकरा जणांनाच खेळवायचे असते, तर प्रत्येक संघात अंतिम अकरा जणांत केवळ चार परदेशी खेळाडूच खेळवायचे असल्याने आपल्या ताफ्यातील सर्वच खेळाडूंना संधी देणे प्रत्येक संघ प्रंबधनांना अशक्य होऊन जाते. त्यामुळे काही खेळाडू अंतिम संघात खेळण्याच्या पात्रतेचे असूनही त्यांना राखीव खेळाडूंचे जॉकेट घालून डग आऊटमध्येच बसावे लागते.
सन २०१९ च्या बाराव्या आयपीएल सत्रात आपल्या जादूई फिरकीने सर्वांना प्रभावित करणाऱ्या नेपाळच्या लेगस्पीनर संदिप लामिछानेला सन २०२० च्या तेराव्या सत्रात एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. विशेष म्हणजे दिल्लीचा हुकमी लेगस्पीन गोलंदाज अमित मिश्रा दुखापतग्रस्त होऊन संघाबाहेर गेला तरी यंदा २० लाख रूपयांचे मोल मिळालेल्या संदिपने मागील सत्रात सहा सामन्यात आठ बळी मिळविले होते. त्याच रितीने वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू किमो पॉलही संपूर्ण स्पर्धेत संघासोबत पर्यटक म्हणूनच होता. याच किमो पॉलने बाराव्या आयपीएल सत्रात आठ सामन्यात ९ बळी मिळवून चांगल्या पैकी यश मिळविले होते. यंदा किमो पॉलला एकही सामना न खेळता ठरलेले ५० लाख रुपये मिळाले.
मुंबई इंडियन्स कडूनच मागच्या दोन सत्रात १३५ च्या स्ट्राईक रेटने ८९६ धावा ठोकणारा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ख्रिस लिन यंदा राखीव खेळाडू म्हणूनच संघासोबत राहीला. ख्रिस लिनसाठी मुंबई इंडियन्सने यंदा दोन कोटी रूपये मोजले होते. मागच्या सत्रात दिल्लीसाठी सात सामने खेळणारा वेस्ट इंडिजचा शेरफान रूदरफोर्डही दोन कोटी रूपये घेऊन मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूमचाच एक भाग बनून राहीला.
सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे संघ २०१२ पासून मुंबई इंडियन्सचा अविभाज्य घटक असलेला न्यूझिलंडचा वेगवान गोलंदाज मिचेल मॅकलेघन यंदा केवळ प्रवासी म्हणूनच वावरला. संपूर्ण सत्रात एकही सामना न खेळताही मॅकलेघन एक कोटी रुपये कमवून बसला.सनरायझर्स हैद्राबादने प्रत्येकी ५०-५० लाख रुपये खर्च करून खरेदी केलेला विंडिजचा डावखुरा फिरकी गोलंदाज फॅबीयन अॅलन व ऑस्ट्रेलियाचा डावखुरा जलदगती गोलंदाज बिली स्टॅनलेक याला एकाही सामन्यात खेळविले नाही.
दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज सन २०१२ पासून आयपीएल स्पर्धेत विविध संघानाकडून खेळला. एका सत्रात तर त्याने किंग्ज इलेव्हन पंजाबचे कर्णधारपदही भूषविले होते. यंदा त्याला राजस्थान रॉयल्सने ७५ लाख रूपयांत खरेदी केले. मिलरची १३८.७८ च्या सरासरीने केलेली १८५० धावा बनविण्याची कामगिरीही राजस्थान रॉयल्स संघ प्रबंधनाला प्रभावित करू शकली नाही. मिलरला केवळ एक सामना खेळायला मिळाला.
कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यात संधी मिळालेला अमेरिकेचा पहिला क्रिकेटपटू अली खान जखमी झाल्यानंतर त्याच्या जागेवर न्यूझिलंडचा यष्टीरक्षक फलंदाज टिम सिफर्टला संघात ५० लाख रूपये खर्च करून घेतले खरे मात्र एकाही सामन्यात खेळण्याची संधी त्याला मिळाली नाही.
किंग्ज इलेव्हन पंजाबने मागच्या सत्रात सहा सामन्यात ७ बळी घेणारा दक्षिण आफ्रिकन वेगवान गोलंदाज हार्डस विलजोनलाही यंदा एकाही सामन्यात खेळविले नाही. मात्र विलजोनला ठरलेली ७५ लाख रुपये किंमत त्यांना चुकती करावीच लागली.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

