shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तेराव्या आयपीएल सत्रातील सर्व संघाच्या कर्णधारांचे मानधन..!!

आयपीएलचे तेरावे सत्र युएईत संपन्न झाले. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने या वेळचे सत्र सहा महिने उशीराने भारताबाहेर घ्यावे लागले व ते कमालीचे यशस्वीही झाले. प्रेक्षकांविना म्हणजे रिकाम्या स्टेडीयममध्ये झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने विक्रमी पाचवे विजेतेपद पटकावून आपले आयपीएलमधील निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.

तेराव्या आयपीएलमध्ये आठ संघांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये देश विदेशातील खेळाडूंनी आपापल्या संघाचे प्रतिनिधित्व केले तर त्या संघांचे नेतृत्वही काही भारतातल्या तर काही परदेशी खेळाडूंनी केले. यंदाच्या सत्रात कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या नेतृत्वात स्पर्धेच्या ऐन मध्यावर खांदापालट करण्यात आली. केकेआरचे गेली दोन सत्रांपासून नेतृत्व सांभाळणाऱ्या दिनेश कार्तिक ऐवजी इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार ओएन मॉर्गनने नेतृत्व स्विकारले. परंतु कार्तिकने या सत्राच्या पूर्वार्धात कर्णधार म्हणून जी कामगिरी केली ती सुध्दा मॉर्गनला न जमल्याने केकेआरचे आव्हान साखळीतच जमा झाले. तर मुंबईचा नियमीत कर्णधार रोहीत शर्मा चार साखळी सामन्यात हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे खेळू न शकल्याने विंडीजचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलॉर्ड ४ पैकी ३ सामने जिंकून मुंबईचा यशोरथ बिघडू दिला नाही.


आयपीएलमध्ये खेळाडू लिलावाद्वारे निवडून त्यांचे मानधन तेथेच निश्चित होते. कोचिंग व सपोर्टींग स्टाफचे वेतन संबंधीत संघ प्रबंधन ठरवते. तर प्रत्येक संघांच्या कर्णधारांचा पगार त्यांच्या गुणवत्तेनुसार दिला जातो. तेराव्या आयपीएल सत्रातील सर्व संघांच्या कर्णधारांच्या सॅलरी विषयी या लेखात आपण जाणून घेणार आहेत.सन २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्विकारणाऱ्या रोहीत शर्माने त्याच वर्षी मुंबईला प्रथमच आयपीएल विजेते बनविले व त्यानंतर सन २०१५, १७, १९ व २० या वर्षी विजेतेपदाचा करंडक आपल्याकडे वळविला. आपल्या आठ वर्षांच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत रोहीतने विक्रमी पाच वेळा मुंबईला विजेतेपद मिळवून दिले. त्याचे फळ म्हणजे रोहीतचे कर्णधार पदाचे मानधन आहे १५ कोटी रूपये.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्हन स्मिथने सन २०१० पासून आयपीएल मध्ये खेळायला सुरुवात केली. आतापर्यंत तो चार संघाकडून खेळला असून सन २०२० च्या सत्रात तो राजस्थान रॉयल्सचा पूर्णवेळ कर्णधार होता. परंतु त्याचे नेतृत्व त्याच्या लौकीकाला साजेसे नव्हते. तरीही त्याला ठरल्या प्रमाणे १२ कोटी रूपये सॅलरीच्या रूपात मिळाले.

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार सन २००८ च्या पहिल्या सत्रापासून सीएसकेची धुरा सांभाळत असून सन २०१६ व १७ या दोन वर्षांचा बंदीकाळ वगळता अकरा पैकी ३ सत्रात सीएसकेने विजेते पद मिळविले. त्यात धोनीच्या नेतृत्व गुणांचा मोठा वाटा होता. आयपीएलच्या तेराव्या सत्रात प्रथमच सीएसकेला प्ले ऑफ मध्ये प्रवेश मिळाला नाही. मात्र धोनीला त्याचे १५ कोटी रूपये मानधन प्राप्त झाले.

भारताच्या राष्ट्रीय संंघाचा कर्णधार असलेला विराट कोहली आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू कडून खेळत आहे. आयपीएलच्या इतिहासात एकाच संघाकडून इतके वर्ष खेळण्याचा विक्रम त्याच्याच नावावर आहे. कोहली सन २०१३ पासून सीएसकेेचे नेतृत्व करत असून इतके वर्ष एकाच संघाचे नेतृत्व करूनही संंघाला एकदाही विजेतेपद मिळवून देण्यात अपयशी ठरलेला तो एकमेव कर्णधार आहे. तरीही त्याला सर्व संघांच्या कर्णधारांपेक्षा सर्वात जास्त म्हणजे १७ कोटी मानधन मिळते.

सन रायझर्स हैद्राबादचे नेतृत्व करणारा ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज डेव्हीड वॉर्नर सन २०१२ मध्ये सन रायझर्सला विजेतेपद मिळवून देण्यात यशस्वी ठरला असून आयपीएल मध्ये सर्वात जलद ५००० धावा काढणारा पहिला खेळाडू बनला आहे. यंदा त्याचा संघ क्वॉलीफायर -२ मध्ये पराभूत झाला. वॉर्नरला कर्णधार म्हणून १२ कोटी रुपये मानधन मिळते.

भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळलेला दिनेश कार्तिक आयपीएलमध्ये आतापर्यंत सहा विविध संघांकडून खेळला असून सन २०१८ मध्ये केेकेआरने त्याला आपल्या ताफ्यात घेतले व कर्णधारपदाची माळ त्याच्या गळयात घातली. परंतु या वर्षीच्या सत्राच्या मध्यान्हावर त्याने कर्णधारपद सोडले व उपकर्णधार बनने पसंत केले. त्याच्या ऐवजी इंग्लंडच्या ओएन मॉर्गनने केकेआरची जबाबदारी सांभाळली त्यापूर्वीच कार्तिकचे मानधन ७.४ कोटी ठरले होते. 

सन २०१८ मध्ये गौतम गंभीरने दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधार स्पर्धेच्या मध्यावरच सोडल्यानंतर मुंबईचा तफडफार फलंदाज श्रेयस अय्यरला दिल्लीच्या तख्तावर बसविण्यात आले. तेंव्हा अय्यर आयपीएल इतिहासातील सर्वात तरूण कर्णधार बनला. त्याने दिल्लीचे नेतृत्व स्विकारल्या पासून संघाच्या कामगिरीत फार मोठा बदल झाला असून यंदा दिल्लीने प्रथमच अंतिम फेरी गाठली. परंतु दुर्देवाने विजेतेपद मिळविण्यात त्यांना यश मिळाले नाही. 

सन २०१९ च्या सत्रात अतिशय सुरेख फलंदाजी करणाऱ्या केएल राहुलला त्याच्या चांगल्या खेळाची पावती देत किंग्ज इलेव्हनने त्याला रिटेन केलेच शिवाय पंजाबचे नेतृत्वपदही बहाल केले. त्याने या सत्रात सर्वाधिक धावा करत मानाची ऑरेंज कॅप पटकविली. परंतु त्याच्या संघाला कामगिरीत सातत्य  राखता न आल्याने प्ले ऑफ फेरीत स्थान मिळविता आले नाही. तरी त्याला कर्णधार पदाचे ११ कोटी रुपये मानधन मिळाले.
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close