स्वतंत्र मजदूर युनियनच्या सातत्यपूर्ण लढण्यास यश..!
मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गातुनही पदोन्नती नाकारणारे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे दि. 29 डिसेंबर 2017 चे पत्र रद्द करण्यासाठी स्वतंत्र मजदूर युनियन व मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून जो सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला त्यास यश आले आहे. दि. 16 डिसेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत साहेब यांनी 29.12.2017 चे पत्र रद्द करण्याची मागणी केली. त्यास उपसमितीने मंजूरी दिली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या दि 4 ऑगस्ट 2017 च्या निर्णयानंतर शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दि. 29.12.2017 रोजी बेकायदेशीर पत्र जारी करून मागासवर्गीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना जेष्ठतेप्रमाणे खुल्या प्रवर्गातुनही पदोन्नती मिळवण्यावर बंदी घातली होती.
या विरोधात स्वतंत्र मजदूर युनियनतर्फे मुंबईच्या आझाद मैदानावर 26 फेब्रुवारी 2018 रोजी प्रचंड धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर 18 डिसेंबर 2019 रोजी विधानसभेच्या नागपूर हिवाळी अधिवेशनावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला. त्याच्या परिणाम स्वरूप डॉ. नितीन राऊत साहेब यांच्या पुढाकारातून 21 जानेवारी 2020 रोजी हा मुद्दा मंत्रीमंडळ बैठकीत मांडण्यात आला. तत्पूर्वी स्वतंत्र मजदूर युनियनसोबत 17 जाने. 2020 रोजी डॉ. नितीन राऊत साहेब यांच्या मध्यस्थीने मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली. त्यानंतर 31 मे 2020 रोजी डॉ. नितीन राऊत साहेब यांचेसोबत स्वतंत्र मजदूर युनियनची बैठक नागपूर येथे संपन्न होऊन त्यांना पदोन्नती मधिल आरक्षण व मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना खुल्या प्रवर्गातुन पदोन्नती मिळण्यासाठी आवश्यक असलेले सर्वोच्च न्यायालयाचे सर्व निर्णय आवश्यक दस्तावेज मा. जे. एस. पाटील साहेब यांनी मंत्री महोदयांना सादर केले.
मंत्रीगट उपसमितीची बैठक होण्याआधीही मा. जे. एस. पाटील साहेब यांनी मंत्री महोदयांना ब्रीफिंग केले. त्यानुसार डाॅ. नितीन राऊत साहेब यांच्या प्रयत्नांना यश येऊन दि. 29.12.2017 चे पत्र मागे घेण्याचा निर्णय झाला. हे पत्र मागे घेण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत साहेब यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल स्वतंत्र मजदूर युनियन व मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने त्यांचे आभार व्यक्त केले आहे.
एन. बी. जारोंडे
( प्रसिद्धी सचिव - स्वतंत्र
मजदूर युनियन)

