(सेनगांव पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी कृष्णदेव पाटील)
हिंगोली। प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.१९,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी नुकतेच कृष्णदेव पाटील यांची नियुक्ती झाली असुन सेनगांव पोलीस स्टेशन अंतर्गत सध्या राजरोसपणे अवैध धंदे चालु असुन या अवैध धंद्यावर पाटील अंकुश बसविणार का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतुन व्यक्त केला जात आहे.
सेनगांव पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व बिटमध्ये अवैध व्यावसायिकाकडून मटका,जुगार,तितली भवरा,देशी दारु व बनावट दारु खुलेआम सुरू असुन तत्कालीन पोलीस निरीक्षकाला दिवाळी दरम्यान लगाम लावण्यात यश मिळाल्याचे दिसुन आले होते.परंतु दिवाळी संपताच अवैध व्यवसायिकांनी आपले डोके वर काढल्याचे पहायला मिळाले.सेनगांव पोलीस स्टेशन अंतर्गत सेनगांव शहरासह हत्ता(नाईक),साखरा, जयपुर, पानकनेरगाव आदी गावामध्ये बनावट देशी दारू विक्री,जुगार,मटका,तितली भवरा व गुटखा असे अवैध धंदे खुलेआम सुरु असल्याचे दिसुन येत आहे.या अवैध धंदा चालकावर अद्याप ही म्हणावी तशी कठोर कार्यवाही झाली नसल्यामुळे त्यांचे धाडस अधिकच वाढत चालले असल्याने ते अवैध धंदे खुलेआम चालवत असल्याचे दिसत आहे.सेनगांव पोलीस स्टेशन अंतर्गत ग्रामिण भागामध्ये लायसन्स धारक देशी विक्रेत्याकडून हे अवैध धंदेचालक देशीचे बाँक्स खरेदी करुन मोटारसायकल व्दारे घरपोच अवैध देशी दारु पोहचवित असल्याने किराना दुकान,पानटपरीवर वर सहज उपलब्ध होत असल्याने तरुण व्यसनाधीन होत असुन वाम मार्गाला लागत असल्याचे चित्र दिसत आहे.तर काही ठिकाणी मटका,तितली भवरा व जुगारामुळे तरुणाचे आयुष्य बरबाद होत आहे.
यावर्षी अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेले सोयाबीन,मुग,उडीद गेल्याने शेतकरी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असतांनाच अवैध धंद्यात वाढ झाल्याने भितीचे वातावरण पसरले असुन या अवैध धंद्यावर नुतन पोलीस निरीक्षक पाटील हे अंकुश बसविणार का? व केव्हा बसविणार हा प्रश्न सुज्ञ नागरीकातुन उपस्थित केला जात आहे.

