आजमितीला विराट कोहली जागतिक क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाज आहे. सचिन तेंडुलकरने केलेले बरेचसे विक्रम त्याने मोडले असून काही विक्रम तुटण्याच्या अगदी जवळ आले आहेत. मागील सहा वर्षांपासून तो भारताचा कसोटी कर्णधार असून सन २०१६ मध्ये त्याने धोनीकडून सफेद चेंडूच्या खेळातील नेतृत्वही हस्तांतरीत केले आहे.
भारतासाठी त्याने कसोटीत सर्वात यशस्वी कर्णधार म्हणूनही नाव कमावले आहे. परंतु त्यातील बरेचसे सामने मायदेशात फिरकीला धार्जिण्या खेळपट्टयांवर जिंकले असून परदेशात सन २०१८ मध्ये तत्कालीन कमजोर ऑस्ट्रेलियन संघाला ऑस्ट्रेलियात तसेच कमजोर विंडीज व श्रीलंकेला त्यांच्या देशात हरविले. एरव्ही परदेशात त्याच्या कर्णधारपदाची पार दुर्देशा झाली आहे. इतकेच नाही तर कर्णधार म्हणून त्याच्या नेतृत्वात भारताला आयसीसीची एकही मोठी स्पर्धा जिंकता आली नाही. शिवाय आयपीएल मध्येही गेले आठ वर्ष आरसीबीचे नेतृत्व करत असून एकदाही त्याला त्याच्या फ्रँचाईचीला विजेतेपद मिळवून देता आले नाही.
एक फलंदाज म्हणून महत्वाच्या सामन्यात त्याच्या अपयशाचा आलेखही उंचावत आहे ही बाब त्याच्या लौकीकाला साजेशी नाहीच शिवाय भारतालाही त्यामुळे नामुष्कीजन्य पराभवांना सामोरे जावे लागत आहे.
कर्णधार म्हणून तो संघात सतत बदल करत असतो. कसोटीत तर त्याने मागच्या कसोटीतला संघ फक्त एकदाच पुढच्या कसोटीत कायम ठेवला. यामुळे संघातील कोणत्याही खेळाडूला स्वतःचे स्थान सुरक्षित वाटत नसल्याने त्यांनाही मनाप्रमाणे खेळ करता येत नाही. संघ निवडीतील त्याची हीच मनमानी त्याच्या अपयशी नेतृत्वाचे मुख्य कारण आहे. संघाचा उपकर्णधार असलेला अजिंक्य राहाणे एक वेळ परदेशात उत्कृष्ठ खेळणारा खेळाडू म्हणून नावारूपाला आला असताना त्यालाही त्याने बऱ्याचदा संघातून वगळले, तीच गत चेतेश्वर पुजाराचीही झाली.
संघाचे मुख्य आधारस्तंभ असलेले हे दोन खेळाडूच जर असुरक्षित असतील तर त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आपण कोणत्या तोंडाने करणार ? रविचंद्रन आश्विन, उमेश यादव हे देखील याच धरसोड वृत्तीचे बळी असून भारताकडून त्रिशतक बनविणारा केवळ दुसरा फलंदाज बनलेल्या करुण नायरला सातत्याने संधी न दिल्याने नायर सारखा दमदार फलंदाज आज कुठे आहे ? जयंत यादव सारखा चांगला फिरकी गोलंदाज कसोटीत शतक ठोकूनही विराटच्या अवकृपेचा बळी ठरला.
या सारखे अनेक खेळाडूंचे उदाहरणं देता येतील की कोहलीच्या पक्षपःती धोरणामुळे त्या खेळाडूंची करिअर फुलण्याआधीच कोमेजली आहे. सुर्यकुमार यादव सारखा फलंदाज गेली ४-५ वर्षापासून देशांतर्गत स्पर्धेत सातत्याने धावांचे रतीब घालीत असताना त्याला भारतीय संघात घ्यायला निवड समितीला कोहली का सांगत नाही ? शिवम दुबे, विजय शंकर, यासारख्या दुय्यम दर्जाच्या खेळाडूला कोणाच्या पुण्याईने भारताकडून वारंवार निवडले जाते. सतत संधी देऊनही अपयशी ठरणाऱ्या रिषभ पंतला संघात भरपूर वाव कोणी दिला ? इतकेच नाही तर देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या प्रशिक्षक अनिल कुंबळेला पदच्युत करण्यात अग्रेसर कोण होते ? संघाचे फलंदाजी कोच म्हणून राहुल द्रविड व गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून झहीर खानची निवड होऊनही त्यांना विरोध करण्यात पुढे कोण होते ? एक प्रशिक्षक म्हणून सतत फेल होणाऱ्या रवी शास्त्रीची पाठराखण करण्यात कोण पुढे असतो ?
या सर्वांचे उत्तर एकच आहे, ते म्हणजे विराट कोहली ! स्वतःच्या मर्जीनुसार प्रशिक्षक कोणाला करायचे, कोणत्या खेळाडूला डावलायचे, निवडायचे संघा सोबत कधी राहायचे, संघाला त्याची गरज असताना स्वतःच्या खाजगी कामासाठी संघाला वाऱ्यावर सोडून जायचे या हेकड वागण्यामुळे भारतीय संघाची परदेशात मोठी परवड होत आहे. कोहली भारतीय संघाला " विराट कोहली लिमिटेड कंपनी " तर समजत नाही ना ?
विराटचे नेतृत्व संघासाठी सध्या तरी कोणत्याही कोनातून फायदेशीर ठरताना दिसत नसून विक्रमी पाच वेळा मुंबई इंडियन्सला आयपीएल करंडक जिंकून देणारा रोहीत शर्मा सफेद चेंडूच्या खेळासाठी प्रभावशाली पर्याय आहे. जर अजिंक्य राहणे ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या तीन कसोटीत यशस्वी ठरला तर त्याला पुढे नियमीत कसोटी कर्णधार करण्याचाही पर्याय निवड समितीसमोर उपलब्ध होऊ शकतो. कोहलीला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करून त्याच्या फलंदाजीतील अदभूत कलेचा लाभ भारतीय संघाला खुलेपणाने देऊ दिल्यास कोहलीला आपल्या खेळाचा आलेखही चांगल्या प्रकारे उंचावता येऊ शकतो.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

