सावळीविहीर(प्रतिनिधी):
श्री साईबाबाच्या दर्शनासाठी व शिर्डीमध्ये सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात साईभक्तांची दरवर्षी गर्दी होत असते. मात्र या वर्षी कोरोणामुळे काही अटी व शर्ती व बंधने आल्यामुळे साईभक्तांनी दर्शन पास घेऊन, तारीख व वेळ निश्चित करूनच शिर्डीकडे प्रयाण करावे व शिर्डीत विनाकारण गर्दी करण्याचे टाळावे व साई संस्थान प्रशासनाला सहकार्य करावे .असे आवाहन श्री साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी केले आहे.
श्री साईबाबा संस्थानचे वतीने आज रविवारी दुपारी मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन या पत्रकार परिषदेत सांगितले की, शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर कोरोणामुळे गेले काही महिने बंद होते .मात्र 16 नोव्हेंबरपासून, दिवाळी पाडव्यापासून श्री साईबाबांचे मंदिर भक्तांना दर्शनासाठी सुरू करण्यात आले आहे. शासनाने परवानगी दिल्यानंतर हे मंदिर सुरू करण्यात आले असले तरी काही अटी व शर्ती आहेत. त्याप्रमाणे मंदिरात साई भक्तांना दर्शनाची सोय करण्यात आली आहे. शिर्डीमध्ये गेल्या महिन्यात साडे तीन लाख भाविकांनी दर्शन घेतले आहे .गुरुवार ,शनिवार, रविवार व सुट्टीच्या काळामध्ये शिर्डीत साई भक्तांची मोठी गर्दी होत आहे. साधारण दररोज बारा हजार साईभक्तांना दर्शनाची संस्थानकडुन दररोज सोय केली जात आहे. मात्र दिवसेंदिवस शिर्डीत साई भक्तांची गर्दी वाढत असून दर्शन पास काउंटरवर 20 हजार लोकांची गर्दी होत आहे. त्यामुळे साईभक्तांनी शिर्डीत येण्या पूर्वीच ऑनलाईन दर्शन पास किंवा दर्शनाची तारीख व वेळ निश्चित करूनच शिर्डीत यावे.येथे गर्दी होवु नये . म्हणून प्रत्येक साईभक्तांनी दक्षता घ्यावी. दरवर्षी डिसेंबर महिन्यात सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाचे स्वागतासाठी मोठ्या संख्येने साईभक्त शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. अनेक साई पालखी येत असतात. त्यामुळे पदयात्रीनी ही यावर्षी कोरोणामुळे ऑनलाईन दर्शनपास घेऊनच व तारीख ,वेळ निश्चित करूनच शिर्डीत यावे.
सशुल्क पाससाठी पाच दिवस आगोदर व मोफत दर्शनासाठी ऑनलाइन पाससाठी दोन दिवस अगोदर पास काढता येईल. साईबाबा संस्थानच्या वेबसाईटवर दर्शन पास मिळेल. परंतु साईबाबा संस्थांननी पालख्यांना कोरोनामुळे यावर्षी दर्शनासाठी परवानगी दिलेली नाही व सुविधाही संस्थान करणार नाही, त्यामुळे पालख्यांचे व साई भक्तांची गैरसोय होऊ नये ,म्हणून पालखीत येणारा साईभक्तांनी दर्शन पास ऑनलाईन काढूनच श्री साई दर्शनाची तारीख व वेळ निश्चित करूनच शिर्डीत यावे व साईबाबा संस्थान प्रशासनाला सहकार्य करावे.असे आवाहन श्री साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी पत्रकार परिषदेत साईभक्तांना आवाहान केले आहे.

